तत्त्वज्ञानाने व तर्काने त्यांच्या बुध्दीस काठिन्य व कुशाग्रत्व आलेले होते. त्यामुळे आपल्या जिव्हाळ्याच्या तत्त्वाविरुध्द कोणी जात आहे असे पाहताच त्यांचा भडका उडे. त्यांस पुष्कळ लोक विचारीत, 'तुम्ही जरा मृदू का नाही लिहीत!' त्यावर 'मूल आडवे आले म्हणजे ते कापावे लागते!' असे टिळकांचे उत्तर असे. सरकारवर तशीच स्वजनांवर सणसणीत टीका करण्यात ते कधी कसूर करीत नसत. यामुळे पुष्कळांची मने दुखविली गेली. परंतु टिळक स्वत: या टीकांस वगैरे मनात थारा देत नसत; त्यांचे मन अंतरी निर्विकार असे. त्यांना वाटे टीकेपासून जे शिकावयाचे तेवढे शिकून आपल्याप्रमाणेच इतरही लोक टीका विसरून जात असतील; परंतु साधारण जनांची मने कोवळी असतात. गोखले या बाबतीत टिळकांच्या अगदी विरुध्द. प्रथम प्रथम त्यांची बाणी जहाल होती. परंतु 'असला फुटाणा उपयोगी नाही; भाषा साधी असून आतील विचार जोरदार असावे.' अशा रानड्यांच्या सांगीवरून त्यांनी फार बोध घेतला. दुस-याचे मन दुखावले असे ते स्वत: कधी बोलत वा लिहीत नसत. नरसोपंत केळकर यांनी गोखल्यांच्या गुणाचे पुढीलप्रमाणे सुंदर वर्णन केले आहे:- 'अॅरिस्टॉटल याच्या व्याख्येप्रमाणे गोखल्यांच्या गुणांनी अवगुण व गुणातिरेक या दोहोंमधला सुवर्णबिंदूचा बरोबर छेद केलेला होता. त्यांच्या अंगी धारिष्ट नव्हते, पण धैर्य उत्तम प्रकारचे होते. तीव्र मतभेदपात्रता होती, पण भांडखोरपणा नव्हता. शब्दात गोडी किंबहूना मवाळी होती, परंतु त्यांनी तोंडदेखलेपणा किंवा तोंडपुजेपणा केल्याचे कोणास माहीत नाही. वस्तुमात्रास होणारा त्यांचा शब्दस्पर्श मृदू होता, पण तत्त्वाला ते कठोर होते. त्यांना हातात मखमलीचे हातमोजे घातलेसे वाटले तरी त्यांच्या आत वळलेली मूठ लोखंडी किंवा पोलादी असे. ते अत्यंत सुविनीत असत पण कोणासही भिऊन वागत नसत.'
टिळकांमध्ये हा सुवर्णबिंदुच्छेद नव्हता. त्यांचे गुण सर्व धडाडीचे होते. ते आपल्या धडाक्याने विजेचा लोट उत्पन्न करावयाचे आणि या विजेपासून प्रचंड कार्य करून घ्यावयाचा त्यांचा मानस असे. टिळकांमध्ये गुणावगुण पराकाष्टेला पोचलेले होते. क्रांतिकारक लोकांस मध्यबिंदू माहीतच नसतो. पाऊल पाऊल जाणे त्यांच्या प्रकृतीस मानवत नाही; उड्या मारीत जोराने जावे असेच त्यांस वाटत असते. सर्वसाधारण जनतेस ते विचार करावयास अवसर देत नाहीत आणि जनतेसही चालढकल रुचत नाही. लोकांमध्ये विकार असतात आणि या विकारांस नवीन विचारप्रवर्तक आपल्या कार्यार्थ प्रवृत्त करीत असतात. अशा लोकांपैकीच टिळक होते. टिळक यांचा राज्यकर्त्यांवर थोडासुध्दा भरवसा नव्हता. राज्यकर्ते परकी; स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी आलेले; कोणीही परकी अधिकारी येवो तो बहुतेक आपल्या वळणावरच जावयाचा असा त्यांचा सिध्दांत असे. यामुळे या कपटी सरकाराशी आपणही कपटीच बनले पाहिजे; सरकारच्या सर्व कृत्यांकडे डोळ्यांत तेल घालून पाहिले पाहिजे, हे सरकार बंडासारख्या मार्गांनी सुध्दा उलथता आले तरी ते क्षम्य व न्याय्य आहे. अमुक शत्रु ना? मग त्यास चिरडण्यास मागेपुढे पाहू नये. श्रीकृष्णाचा भारतातील उपदेश असाच आहे; शिवाजी, रामदास या सर्वांस असेच वागावे लागले. असे वागावे तेव्हाच दास्यमग्न लोकांचा निभाव लागतो. ज्याच्या अंगात नैतिक व आत्मिक सामर्थ्य रोमरोमात भरलेले आहे असे सर्व राष्ट्र निर्माण होणे शक्य नाही, असे सांगणारे लोक, मानवी स्वभावाचे स्वत:चे अज्ञान मात्र दाखवितात. आशियातील लोकात जेव्हा वीरवृत्ती जोरावेल, तेव्हाच पाश्चात्यांच्या अधिकारलालसेस आळा बसेल. याच्या अगदी उलट नेमस्तांची विचारसरणी होती. आपण आधी स्वत:स सुधारले पाहिजे. ज्या गुणाच्या अभावामुळे आपले राज्य गेले ते गुण पूर्णपणे अंगी बाणल्याविना आपले राष्ट्र स्वत्व टिकवू शकणार नाही. त्याखेरीज बंडासारखे उपाय शक्य नाहीत. आपण संघटना करू या; भ्रातृभाव दाखवू या; उद्योगधंदे, नीतिमत्ता या सर्वांस प्रगती करू या. सरकारास अमुक एक द्या असे सांगताना जे मिळेल ते राखण्याची व झेपण्याची पात्रता आपल्या अंगात असली पाहिजे. रानडे, गोखले यांस खरोखरच वाटे की आपल्या लोकांची नैतिक अधोगती झाली आहे. गोखल्यांच्या प्रत्येक व्याख्यानात या गोष्टींवर जोर असे. रानडे म्हणत, 'Politics is not mere petitioning and memoiralizing for gifts and favours. Gifts and favours are of no value, unless we have deserved the concessions by our own elevations and our own struggles.' लोकांतील धैर्य, विश्वास बंधुप्रेम हे सर्व गुण नाहीसे होत चालले असे त्यांस दिसे. तेव्हा प्रथम देशाची नैतिक सुधारणा करू या असे त्यांचे म्हणणे असे. आपल्यास जर दैववशात सर्व हक आज मिळाले तर ते उपभोगण्यास आपण लायक नाही असे त्यांस मनापासून वाटे. तंटे, वैर, विरोध, मत्सर या दुर्गुणांनी आपणांस सर्व बाजूंनी घेरले आहे. आलस्य अद्याप गेले नाही; काम करण्याची हौस उत्पन्न झाली नाही. प्रातिनिधिक संस्थांचे महत्त्व जसे पटावे तसे पटलेले दिसत नाही. हे सर्व आपण नाहीसे केले पाहिजे. टिळक या गोष्टीकडे विशेष लक्ष देत नसत. आधी बाहेरचा दिंडीदरवाजा नीट करू या; मग घरांतल्या भिंतीचा गिलावा वगैरे करण्यास पुष्कळ वेळ आहे; आधी चोर शिरजोर होणार नाही याची व्यवस्था केली, की मग भावांभावांमधले तंटे मिटवण्यास पुष्कळ सवड़ आहे. आपण आपले तंटे मिटवीत असता या चोराने समयानुसार प्रत्येकाचा 'कैपक्ष' घेऊन दोघांसही भिकारी करणे व आपण त्याच्या कपटाला बळी पडणे हे फार अयोग्य व लाजिरवाणे आहे. आपण अशक्त असलो तरी चोराला दरडाविले पाहिजे असे टिळकांचे मत होते. गोखले म्हणत, 'या दरडावण्याचा काही उपयोग होणार नाही.' लजपतरावांनी आपल्या एका लेखात म्हटले आहे- 'If you threaten you must be in a position to carry out the threat. Else it is worse than useless.'