हा लांबलचक उतारा देण्याचे कारण येवढेच की, टिळकांस इतरांचा द्वेष वाटे. त्यांस आपल्याहून दुसरा अधिक चांगला प्रोफेसर होईल ही भीती वाटे हे आक्षेप अत्यंत दुष्ट व फोल आहेत, हे आमच्याप्रमाणेच इतरांसही वाटते हे दाखविणे; असो, टिळकांनी अखेर डिसेंबर १८९० मध्ये आपला कायमचा राजीनामा दिला आणि ज्या बाळसेदार बाळाला आपल्या अंगाखांद्यावर खेळविले, ज्याच्यासाठी ११ वर्षे जिवापाडा श्रम केले ते बालक इतरांच्या स्वाधीन करून, मोठया कष्टाने परंतु धीराने आपल्या तत्त्वासाठी ते बाहेर पडले. ते बाहेर पडले हेच बरे झाले. कारण हा नरसिंह शाळेतच कोंडला गेला नाही हे देशाचे भाग्यच समजावयाचे. त्यांनी आपल्या केसरीने महाराष्ट्र खडबडविला आणि देशाबद्दलचे विचार सुतांत:करणांत जागे केले. 'टिळकांनी पहा आपला आजन्म सेवेचा करार न मानता कॉलेज सोडले, उभारलेली संस्था ते टाकून गेले, आपल्या मागे संस्थेचे काय होईल याची त्यांस फिकीरही वाटली नाही, असे उद्गगार पुष्कळांच्या लेखणीतून आणि तोंडातून ऐकू येतात, परंतु तत्त्वाचा खून करून संस्था चालविण्यापेक्षा ती संस्था समजा, मेली तरी तिच्याबद्दल टिळकांना तितके वाईट वाटले नसते. स्वामिभक्तीसाठी पन्नेला स्वपुत्राचा बळी द्यावा लागला. तत्त्वनिष्ठेसाठी टिळकांस स्वत:चे गोजिरवाणे अपत्य टाकणे भाग पडले. ही कठोरता म्हणजे कर्तव्यनिष्ठुरता. कर्तव्य कठोर असते; फुलांवर निजणे नव्हे किंवा हत्तीवर झुलणे नव्हे. याशिवाय संस्थेचा संबंध तोडून जर संस्थेच्या चालकांनी त्यांस एखादा विषय शिकवा, आमची अडचण आहे असे म्हटले असते तर त्यांनी कधी नाकारले नसते. त्यांच्या आठवणीत अशी गोष्ट दिली आहे: ''टिळकांनी जेसुइट तत्त्वाचा पुरस्कार करून स्वत:च वर्तमानपत्र चालवून खूप पैसा मिळविला.'' असाही एक आक्षेप आहे. परंतु जेसइट तत्त्व संस्थेला बंधक होते; संस्थेबाहेर नव्हते.स संस्थेबाहेर जेसुइट राहीने असे टिळक म्हणत नव्हते. तर संस्थेत राहिलो तर जेसुइटच राहीन आणि सर्वांनी राहिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे असे. संस्थेच्या बाहेर पडल्यावर त्यांच्यावर दुस-या जबाबदा-या, दुसरी कार्ये आली. आता त्यांचा संस्थेशी, तिच्या तत्त्वांशी काय वरे संबंध होता? तेव्हा याही आक्षेपास जागा आहे असे आम्हांला वाटत नाही. असो.
सोसायटीत आता एकवाक्यता झाली. आता सर्व सुधारकांचा मेळा जमला. काम सुरळीत चालू लागले. वादविवाद थांबले. शांतीचे राज्य झाले. परंतु गोपाळरावांवर आता नवीन जबाबदारी येऊन पडली. टिळक सोडून गेल्यावर टिळकांनी बाजू सावरणारे नामजोशी पण सोडून गेले. नामजोशी यांस संस्थेचे 'फॉरिन् सेक्रेटरी' असे विनोदाने म्हणत असत. त्यांच्या अंगात गुणही तसेच होते. अत्यंत खटपटी. सर्व जगात त्यांच्या ओळखी. समयसूचकता, प्रसंगावधान, कोणाशी कसे बोलावे व पैसे कसे काढून घ्यावे ही कला पूर्ण साधलेली - यामुळे संस्थेचे वर्गणी गोळा करण्याचे काम नामजोशांकडे असे. मनुष्यस्वभाव त्यांस फार चांगला कळे. त्यांच्या कामाचा धडाकाही तसाच असे. ते आपल्या पवित्र कार्यासासाठी, सरदार, दरकदार, संस्थानिक यांच्याकडे जाण्यासही कचरावयाचे नाहीत. त्यांची छाती दांडगी, आवेश जबरा. सर्वांपासून पैसा त्यांनी गोळा केला, परंतु ते गेल्यावर हे काम गोखल्यांच्या अंगावर पडले. १८९२ साली आपटे स्वर्गवासी झाले. आगरकर त्यांच्या जागेवर गेले. टिळक गेल्यावर गणित, इतिहास व अर्थशास्त्र आणि इंग्रजी हे विषय गोखले शिकवीत, परंतु हे कॉलेजमधील वाढलेले काम संभाळून सुट्टी आली की खास झोळी लावून गोपाळराव वर्गणी गोळा करण्यासाठी फिरत. पडेल ते काम नेटाने करायचे, माघार घ्यावयाची नाही हा त्यांचा स्वभाव, फंड जमविण्याचे काम किती कठीण असते हे ते करणाराच समजते. नाना मतांच्या व नाना दृष्टीच्या लोकांची गाठ पडते. समजूत घालावी लागते. हुज्जत घालावी लागते. शिक्षणासाठी या पवित्र कार्यासाठी मदत मागावयास गेले तरी त्यातही वाईट पाहणारे लोक नसतात असे नाही. वाइटाकडेच दृष्टी ठेवणारे लोक असतात. वाईट सापडलेच नाही तर ते शंका प्रदर्शित करतात. कोणी स्तुती करितो तर कोणी निंदा करतो. 'हे आले आता देशाचा उध्दार करणारे! काय ध्वजा लाविल्या आहेत हो यांनी? अक्कल तर पहा यांची, यांची काय कुवत आहे देशास वर आणण्याची? या प्रकारची निंदाप्रचुर परुषोत्तरे सहन करावी लागतात. कधी गुलाब सुखवितो, तर कधी काटे दुखवितात. असले अनुभव जगाची नीट ओळख करून देतात. मनुष्याशी कसे वागावे हे समजून येते. थोरांच्या ओळखी होतात. निरनिराळे विचारप्रवाह दिसतात, सर्व इलाखाभर त्यांनी वणवण केली, आणि मिळेल ते तुळशीपत्र सोसायटीच्या चरणी वाहिले. १८९५ मध्ये कॉलेजची नवी इमारत झाली; १८९५ मध्ये वसतिगृहे बांधण्यात आली. परंतु वर्गणीरुपाने पुरेसा पैसा गोपाळरावांनी मिळविल्यामुळे संस्था कर्जबाजारी झाली नाही. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. त्यांस कॉलेजमधील सर्व काम झेपेना. गणितासाठी ते शिक्षक धुंडाळू लागले, आणि मुंबईस त्यांच्याबरोबर बी. ए. झालेले धोंडोपंत कर्वे यांस त्यांनी सोसायटीत आणले. १८९५ मध्ये सोसायटीवर फार मोठी आपत्ती कोसळली. सोसायटीवरच नाही तर सर्व महाराष्ट्रावर कोसळली. प्रथम इंग्रजीचे प्रख्यात शिक्षक प्रो. केळकर हे मृत्यूमुखी पडले आणि दु:खे येऊ लागली म्हणजे एकदम येतात हे दाखविण्यासाठीच जणू काय प्रि. आगरकर यांसही काळाने उचलून नेले. उदार हृदयाचा, निष्कलंक आचरणाचा, थोर मनाचा, जबरदस्त लेखणीचा, स्वजनहितासाठी तळमळणारा, दारिद्याची खिजगणती न करणारा असा महापुरुष- सत्पुरुष कोणाला चटका लावून जाणार नाही !