या उद्गारांवरून मुसलमानांचे व हिंदूंचे ऐक्य हा प्रश्न त्यांस किती जिव्हाळ्याच्या वाटत होता हे दिसून येते. देशाच्या दुर्दैवाबद्दल ज्याचे हृदय अहोरात्र जळते, ज्यास क्षणभरही शांती मिळत नाही. त्याच्या देशभक्तीचे मोल आम्ही काय करणार? विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे:- 'स्वदेशभक्तीसंबंधाची माझी ही व्याख्या ठरलेली आहे. कोणत्याही महाकृत्याचे मुळाशी तीन गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट म्हणजे अंत:करणाची तळमळ: बुध्दीत किंवा तर्कशक्तीत वास्तविक काय अर्थ आहे? बुध्दी किंवा तर्कशक्ती काही पावले जाते आणि पुढील मार्ग आक्रमण करता न आल्यामुळे अडखळून पडते. स्फूर्तीचा झरा नेहमी अंत:करणातून वाहत असतो. बुध्दीला उघडण्याला अशक्य असलेले दरवाजे प्रेमच उघडू शकते. विश्वाच्या बुडाशी असलेली रहस्ये उघडी होण्याचा दरवाजा, प्रेम उघडू शकते. ह्यास्तव माझ्या भावी सुधारकांनो! माझ्या भावी स्वदेशभक्तांनो! तुमच्या अंत:करणास स्वदेशाबद्दल तळमळ लागली आहे काय? देवांचे आणि ऋषींचे कोट्यवधी वंशज जवळजवळ पशूंच्या पंक्तीला जाऊन बसले आहेत, याबद्दल तुमचे अंत:करण विदीर्ण होऊन जाते काय? देशातील लक्षावधी लोक भुकेने मरत आहेत; शेकडो वर्षांपासून क्षुधा पीडेमुळे तळमळत आहेत, हे पाहून तुमचे अंत:करण कळवळून जाते का? आकाशातील एखाद्या कृष्णवर्ण मेघाप्रमाणे जिकडे तिकडे अज्ञानांधकार पसरला आहे, याबद्दल तुमचे अंत:करण तिळतिळ तुटते का? या चिंतेमुळे तुम्हाला झोप येईनाशी झाली आहे का? तुम्हांला क्षणभर सुध्दा विश्रांती मिळेनाशी झाली आहे का? ह्या शोचनीय स्थितीचा विचार तुमच्या रक्तात भिनून जाऊन रक्तवाहिन्यांतून वाहू लागला आहे का? हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर तुमच्या अंत:करणातील चिंतनाचे विचार समान गतीने वाहू लागले आहेत का? या निदिध्यासामुळे तुम्ही जवळ जवळ वेडे बनला आहा का? आपल्याभोवती पसरलेले दु:ख हृदयात भिनून जाऊन आपले नाव, कीर्ती, बायकामुले, संपत्ती, इतकेच नव्हे तर आपली शरीरे यांच्याबद्दल तुम्हाला अजिबात विस्मरण झाले आहे का? अशी स्थिती होणे ही स्वदेशभक्तीची पहिली पायरी आहे.' गोखले ही पहिली पायरी चढून वर गेले होते. सरोजिनीच्या नवीन संदेशाने त्यांना नवचैतन्य प्राप्त झाले. नंतर काही वेळाने ते सरोजिनींस म्हणाले 'Stand here with me, with the stars and hills for witness and in their presence consecrate your life and your talent, your song and your speech, your thought and your dream to the mother-land. O poet, see visions from the hill-tops and spread abroad the message of hope to the toilers in the valleys.' सायंसमय होऊन शेवटचा रक्तिमा आजूबाजूच्या टेकड्यांवर पसरला होता. तो कमी होऊ लागून तारे चमकू लागले होते. अशा प्रशांत, गंभीर प्रसंगी दशदिशांस व तारकासमूहांस साक्ष ठेवून गोपाळरावांनी सरोजिनीस आपले तनमनधन देशास अर्पण करण्यास सांगितले. सृष्टीच्या वैभवापासून प्राप्त होणारे दिव्य संदेश, द-याखो-यांतून अंधारातून अडखळत, चांचपडत जाणा-या कार्यकर्त्यांस सांगण्यास त्यांनी सरोजिनीबाईस विनंती केली. पवित्र विचारांनी देशातील तरुणांची मने सोज्ज्वल करण्यास त्यांनी सरोजिनीस सांगितले. राष्ट्रीय ध्येये कवीशिवाय अन्य कोण शिकविणार? 'कविस्तु क्रान्तदर्शी' भविष्याकाळातील गोष्टी त्यास कल्पनाशक्तीने जवळ पाहता येतात व तद्नुरूप तो लोकांस मार्ग दाखवितो. ज्या वेळेस गोखले सरोजिनीस हे कर्तव्य शिकवीत होते तो देखावा किती हृदयस्पर्शी असला पाहिजे?
मुसलमानांचा प्रश्न सुटेल अशी आशा त्यांच्या मनात पुन: उद्भवली; वठलेल्या रोपट्यास पुन: अंकुर फुटले. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. उत्साहाने व हुशारीने नवीन कामकाज ते पाहू लागले.
१९१२ मध्ये दोन महत्त्वाची कामे गोपाळरावांच्या अंगावर पडली. ही कामे त्यांच्या अंतापर्यंत पुरली. आणि तरीही ती पुरी झाली नाहीतच. एक प्रश्न म्हणजे आफ्रिकेमध्ये हिंदी लोकांचा होणारा अमानुष आणि मनुष्यास काळिमा लावणारा छळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन.
१९१२ च्या जुलै महिन्यात हे कमिशन बसले. या कमिशनचे अध्यक्ष लॉर्ड इस्टिंग्टन हे होते. एकंदर १२ सभासदांचे हे कमिशन होते. चौबळ, गोखले, अबदुल रहिम (मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश) असे तिघे एकद्देशीय होते. या कमिशनला विशेषत: तीन गोष्टीत चवकशी करावयाची होती.
१ जे सनदी नोकर निवडले जातात, त्यांना शिकविण्याची पध्दत आणि पसंतीसाठी काही दिवस नौकरीवर नेमणे.
२ नौकरीच्या अटी, पगार, रजा, पेन्शन वगैरे.
३ युरोपियनेवर लोकांस सनदी नौकरीत जाण्यास किती व कसकसे अडथळे आहेत; आणि या सनदी नौकरीच्या, प्रांतिक आणि वरिष्ठ अशा दोन विभागण्या करण्यात काही फायदा आहे की नाही.
हे प्रश्न व तत्संबंधी इतर प्रश्न, सूचना वगैरे कामे या कमिशनला करावयाची होती. या कामाला आरंभ होण्याच्या आधी गोखल्यांस आफ्रिकेत जावे लागले.