स्वभाव व गुणदोषमीमांसा
गोपाळरावांच्या आयुष्यक्रमाकडे नजर दिली तर आपण आश्चर्यचकित होतो. केवळ दृढनिश्चय व उद्योग यांच्या जोरावर मनुष्य काय करू शकतो हे त्यांनी मूर्तिमंत दाखवून दिले. १८८७ मध्ये हरिभाऊ आपटे आणि गोपाळराव यांचा स्नेह जमला. गोपाळरावांनी हरिभाऊंस सहज प्रश्न केला की ''हरिभाऊ, पुढे आपल्या आयुष्यक्रमात तुम्ही काय व्हावे असे तुम्हांस वाटते?'' हरिभाऊंनी गोपाळरावांस तोच प्रश्न केला. गोपाळराव म्हणाले, ''कॅबिनेट मिनिस्टर होऊन आपल्या देशाची कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे,'' ''समाजास सन्मार्गदर्शक असा विख्यात कादंबरीकार व्हावे अशी माझी इच्छा आहे,'' असे आपटे म्हणाले. गोपाळरावांची मनीषा पाहून आपट्यांस आश्चर्य वाटले. परंतु गोपाळरावांनी आपले ध्येय गाठले हे हरिभाऊंनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि त्यांस मोठे कौतुक वाटले. साम्राज्यात जी सन्मानाची जागा त्यांनी मिळविली, देशात जे त्यांनी महत्त्वाचे लोकनायकत्व पटकाविले हे सर्व त्यांस एकदम आयते वाढून आले नाही. एकेक पायरी चढत चढत ते वर गेले. हळूहळू सर्व फुलले. एकेक पाकळी उमलत होती. सरतेशेवटी सर्व फूल फुलून दशदिशात त्याचा सुवास दरवळून राहिला. वयाच्या अठराव्या वर्षांपासून त्यांच्या कामगिरीस प्रारंभ झाला. प्रोफेसर, सार्वजनिक सभेचे चिटणीस, बेल्वीकमिशनपुढील साक्षीदार, प्रांतिक कायदे- कौन्सिलातील सभासद, राष्ट्रीय सभेचे चिटणीस व अध्यक्ष, अखिल हिंदी राष्ट्राचे पुढारी, रॉयल कमिशनवरील मेंबर, परराष्ट्रात अधिकृत वकील, अनेक संस्थांचे संस्थापक अशा प्रकारे त्यांचा तीस वर्षांचा आयुष्यपट चितारला गेला. मृत्यूच्या वेळेस त्यांचे वय फक्त ४९ वर्षांचे होते. युरोपमध्ये व अमेरिकेमध्ये लोक सार्वजनिक कामात, देशाच्या कारभारात पन्नाशी उलटल्यानंतर पुढे येतात. परंतु हिंदुस्तानात पाहिले तर बुध्दी जास्त लवकर परिपक्व होते असे दिसते. अकबर राज्यावर आला त्या वेळेस तो अवघा तेरा वर्षांचा होता. शिवाजी महाराजांनी तोरण्यावर तोरण बांधिले त्या वेळेस त्यांस मिसरूडही फुटली नसेल. पहिला बाजीराव विसाव्या वर्षीच पेशवा झाला. आणि वीस वर्षांत आपल्या अतुल पराक्रमाने त्याने सर्वांस नमविले. पहिले माधवराव हे तर सोळा वर्षांचे असता पेशवे-पदावर अधिष्ठित झाले. आणि सर्व पेशवे मंडळात कार्यकर्ता असे नाव त्यांनी मिळविले; परंतु गाडी जोराने चालविली तर बैल थकून जातात, त्याप्रमाणे या नरवीरांचे देह लवकर थकतात, आधुनिक महाराष्ट्राकडे नजर दिली तरी हेच चित्र दिसते. चिपळूणकर, आपटे, आगरकर यांच्यासारखी रत्ने फारच लवकर दिवंगत झाली. त्यांचेच उदाहरण गोखल्यांनी गिरविले. गोखलेही हिंदुस्तानास फार दिवस लाभले नाहीत. परंतु केसरीतील मृत्यूलेखात अवतरण दिल्याप्रमाणे 'मुहूर्त ज्वलिंत श्रेयो न च धूमायितं चिरम्॥' पुष्कळ धुमसून आजूबाजूच्या लोकांस डोळे चोळण्यास लावण्यापेक्षा क्षणभर चमकावे आणि लोकांस मार्ग दाखवून द्यावा. गुलाब अल्पकाळ असतो, आणि सर्वांस रिझवितो; सुखवितो. परंतु तो कंटकासनावर असतो हे विसरुन चालणार नाही. 'न तपस्या तरि ना विकास' हे अबाधित तत्त्व आहे. टिळकसुध्दा त्यांच्यावर आलेल्या मानसिक, शारीरिक दगदगीला न जुमानता इतके दिवस जगले याचे कारण ते स्वत:च सांगत, की 'मी जात्या कठोर अंत:करणाचा आहे.' दगदगीचा मनावर व त्यामुळे देहावर ते फार परिणाम करून घेत नसत. गोखल्यांचे याच्या अगदी उलट होते. त्यांच्या मनावर फार परिणाम होईल. कार्य करीत असता, लढाया लढत असता गोखल्यांस मरण आले. त्यांच्या मृत्यूने सर्व देश हळहळला. क्षणभर सर्व लोक भेदभाव विसरून गेले. गोखल्यांनी आपल्या गुणांनी सर्वांची अंत:करणे काबीज केली. आपल्या अल्प आयुष्यक्रमांत ज्या महनीय गुणांनी त्यांनी ही अजरामर कीर्ती संपादन केली, त्या गुणांचे आपण थोडथोडे निरीक्षण करू या. या गुणांबरोबरच त्यांच्या उणिवा, त्यांचा स्वभाव, त्यांच्या कार्याची दिशा याचाही संक्षेपाने विचार करणे प्राप्त आहे.
त्यांच्या सर्व कामगिरीस पायाभूत झालेला गुण म्हणजे त्यांनी केलेला दांडगा अभ्यास. भावी कार्यास योग्य व क्षम होण्यासाठी, त्यांनी देहाची पर्वा केली नाही. सतत दहाबारा वर्षे न्या. रानडे व रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांच्याजवळ त्यांनी देशातील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांनी विशेषत: आकडेशास्त्राचा जोश्यांजवळ फारच कसोशीने अभ्यास केला. देशाची तरफदारी करणा-यास सर्व खडान्खडा माहिती असली पाहिजे, या दृष्टीने त्यांनी युरोपच्या इतिहासाचा फार मननपूर्वक अभ्यास केला होता. जुन्या राज्यपध्दती कशा अस्तित्त्वात आल्या आणि त्यात कसकसे फरक पडले यांचे त्यांनी काळजीपूर्वक ज्ञान मिळविले. वाच्छा म्हणतात :- ''Nothing so broadenss the mental horizon in politics as History. The angle of vision is greatly enlarged. Parochial views of men and things are superseded by catholic views. The parish is forgotten and all the world becomes his country. Nothing, therefore, is more valuable than history and no accomplishment is more suited to him who aims at being a better citizen than the same subject.''
गोखल्यांनी इतिहासापासून फार धडे घेतले. परंतु हे सर्व शिकून जर मांडता येत नसेल तर काय फायदा? म्हणून गोपाळरावांनी याही बाबतीत लहानपणापासून सक्त मेहनत घेतली होती. त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले. कोठे उत्तम शब्द, उत्तम वाक्य दिसले की ते यांनी औत्मसात केलेच. बर्कसारख्या महापंडिताच्या ग्रंथांतील उतारे त्यांस तोंडपाठ असत, या सर्व तयारीमुळे इंग्रजी भाषा त्यांच्या जिव्हाग्रावर खेळू लागली. त्यांची भाषा सोपी, सहजसुंदर, परंतु जोरदार आहे. बंगाली वक्त्यांमधील अलंकार आणि मेथांच्या भाषेतील विनोद व कोटिक्रम हे गुण त्यांच्या भाषेत नाहीत. परंतु सरलता आणि मनोहरता तिच्यामध्ये आहे. मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे 'कृताभ्यंगस्नाना कनकमणिभूषविरहिता। विराजे सिंदूरे धवलवसने भूपवनिता॥' अशी गोपाळरावांची वाग्वधू होती! गोखल्यांच्या १९०७ च्या आरंभीच्या उत्तर हिंदुस्थानातील दौ-याच्या वेळी हिंदुस्थान रिव्ह्यू त्यांच्या भाषेसंबंधी लिहितो:- ''We think his speeches do not rise to the level of oratory, and speaking broadly, they are inferior, as speeches, to the efforts of Mr. Lal Mohan Ghose, Babu Surendranath Banerjee and Sir. Pherojshah Mehta, among living Indians Mr. Gokhale's diction is chaste but one misses in it the almost classic phraseology of the Hon'ble Dr. Rash Behari Ghose. There is again no humour, no sarcasm, no lofty declamation, no piercing invective, such as characterised for instance, Mr. Lalmohan Ghosa's still famous speech on the Ilbert Bill delivered at Dacca nearly a quarter of century ago, In some respects, however, Mr. Gokhale is equalled by few and surpassed by none among his compatriots. In directness of expression and lucidity of exposition, in grasp of principles and mastery of detail, we hardly know his equal. Read his speeches full of eloquence, full of earnestness, vigorous masterpieces of sustained argument; there is hardly a superfluous word in them or any which one can easily improve. As a debator Mr. Gokhale is not equal to Sir, Pherojshah Mehta neither perhaps as a stateman. In the higher qualities of statesmanship, we think he is inferior only to Sir Pherojshah.''