मायलेकरांची ताटातूट झाली!! पतिपत्नीत दुजेपणा आला!!! सोजीर लोक घरांत घुसून देवाब्राह्मणांची नालस्तीही करीत. यामुळे पुण्यातील लोकांत असंतोष माजून राहिला. लोकांची मने क्रोधाने जळफळू लागली. तरुणांना त्वेष आला. आणि याचा परिणाम म्हणजे रँड व आयर्स्ट यांचे खून झाले. ही बातमी विजेप्रमाणे सर्वत्र पसरली. इंग्लंडातील वर्तमानपत्रे आणि हिंदुस्तानातील अॅंग्लो- इंडियन पत्रे 'सूड सूड' म्हणून ओरडू लागली. गोपाळराव या वेळेस इंग्लंडांत होते. त्यांच्या मित्रांची त्यांस खासगी पत्र गेली होती. त्यांस काही वर्तमानपत्रांचे अंक मिळाले होते. त्यांच्या मित्रांनी 'स्त्रियांची अब्रू घेण्यात येते; त्यांच्यावर जुलूम होतो' वगैरे मजकूर पत्रात लिहिला होता. इंग्लंडातील लोकांस ही खरीखुरी माहिती कळविली तर त्यांचा गरीब हिंदूंवर झालेला रोष नोकरशाहीवरच वळेलं असे गोखल्यांस वाटले. ते ही सर्व पत्रे वाच्छांस वाचून दाखवीत असत; त्यांच्या मित्रांस ही कुणकुण समजली. शेवटी जून महिन्याच्या अखेरीस या बाबतीत काय करावे हे ठरविण्यासाठी पार्लमेंट-गृहाच्या लायब्ररीच्या खोलीत काही मित्र जमा झाले. पहिल्या दोन बैठकी ज्या झाल्या त्यावेळी वाच्छा हे हजर होते. परंतु ज्या बैठकीत ही बातमी प्रसिध्द करावी. असे ठरले त्याच बैठकीस वाच्छांस हजर राहता आले नाही. आणि गोखले तर उतावीळ झाले होते. तिस-या बैठकीत जे ठरले ते त्यांनी वाच्छांस कळवून त्यांचा सल्ला घेतला असता तर भावी ापतीत टळली असती, परंतु उतावळेपणाने त्यांनी ती बातमी मँचेस्टर गार्डियन या वृत्तपत्रांत प्रसिध्द केली. पत्रांवर भरवसा किती ठेवावा, त्यांत ऐकीव गोष्टी किती असतील याचा सारासार विचार करून हे कृत्य झाले पाहिजे होते. परंतु होणारासारखी बुध्दि झाली आणि गोखल्यांनी सर्व मजकुरावर भिस्त ठेवून माहिती जाहीर केली. इंग्लंडमधील लोक स्वीस्वातंत्र्यांचे कैवारी. त्यांच्यामध्ये स्त्रियांस सर्वत्र मान. त्यामुळे स्त्रियांची अब्रू सोजिरांनी घेतली हे वाचून त्यांच्या पायाची आग मस्तकांत गेली. पार्लमेंटात प्रश्नोत्तरे झाली आणि मुंबई सरकारास 'खुलासा करा' अशी तार करण्यात आली. मुंबई सरकारने पुण्यातील सुमारे ५०० सदगृहस्थांकडे पंचप्रश्नात्मक पत्रिका पाठविल्या आणि या पाच प्रश्नांसंबंधी प्रत्यक्ष वा ऐकीव जी माहिती, जो पुरावा असेल तो सरकारला कळवावा असे लिहिण्यात आले. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की, एकही गृहस्थ पुढे झाला नाही. आणि पुढे येणार तरी कसा? आपलीच बेअब्रू आपल्या तोंडाने हिंद अंत:करणास बोलवत नाही. मलबारी हे याविषयी म्हणतात, ''No modest Hindu or Mahomedan lady will come forward to accuse, she would be assailant of her modesty. To ask her  or her  male relatives for proof is something like addition of insult to injury.'' जेव्हा कोणी काही सांगावयास धजेना तेव्हा अर्थातच निमित्तावार टेकलेल्या मुंबई सरकारने 'गोखल्यांची विधाने खोडसाळपणाची आहेत' अशी उलट तार केली. आता मात्र गोखल्यांवर कठीण प्रसंग आला. आपल्या मित्रांनी जे लिहिले ते अगदी खरे आहे अशी त्यांची मनोभावना त्यांस सांगत होती. मुंबईसरकारच्या आव्हानास 'ओ' देऊन कोणीच गृहस्थ पुढे कसा झाला नाही याचे त्यांस आश्चर्य वाटले. आपल्या लोकांत नीतिधैर्य नाही असे त्यांस वाटले असेल काय? इंग्लंडातील पत्रांनी गोखल्यांवर शिव्याशापांचा नुसता पाऊस पडला. पार्लमेंटात एका सभासदाने तर त्यांस Despicable perjurer म्हणजे खोटी व निंद्य कुभांडे रचणारा असा आहेर अर्पण केला. 'सहसा विदधीत न क्रियामविवेक: परमापदां पदम्' हा अमोल उपदेश संतापाच्या व भावनांच्या भरात दृष्टीआड झाला. आपल्या लोकांची दु:खे व जुलूम तेथील लोकांस कळावा या सध्देतूने त्यांनी सर्व केले. आपली विधाने खरी असे त्यांस वाटत होते, परंतु सज्जनांच्या अंत:करण प्रवृत्तीला कोठे जगात मान्यता मिळते? जे काय प्रत्यक्ष सिध्द होईल त्याच्यावर जगाचा भरवंसा, करावयास गेले एक आणि झाले भलतेच! इंग्लंडमध्ये सुरेख साक्ष दिली होती, परंतु ते यश पार नाहीसे झाले. परक्या देशात परकी लोकांचे वाक्यप्रहार सोसणे त्यांस भाग होते. त्यांचे मन द्विधा झाले. अंत:करण विदीर्ण झाले. ते हिंदुस्तानास यावयास निघाले. वाच्छांबरोबर युरोपला जाण्याचा आपला बेत त्यांनी रद्द केला. हिंदुस्तानात जाऊन आपल्यास आपली विधाने खरी करून दाखविता येतील काय हाच प्रश्न त्यांच्या अंतश्चक्षूंपुढे होता. बोटीवर त्यांस फार त्रास झाला. सिव्हिलियन लोक 'हाच आमचा शिपायांचे वाभाडे काढणारा' असे त्यांच्याकडे बोट दाखवून सांगू लागले. एका सिव्हिल सर्वंटाने मात्र त्यांच्या दुखावलेल्या मनास धीर दिला. गोखल्यांची बोट एडनला आली. एडनला काही मित्रांची पत्रे त्यां मिळाली. ही पत्रे ज्यांनी इंग्लंडमध्ये त्यांस पुण्यातील हलकल्लोळाची पत्रे लिहिली होती त्यात सदगृहस्थांची होती. आमची नावे सरकारात कळवू नका. आमच्या नावाची परिस्फुटता- वाच्यता न होऊ देण्याची खबरदारी घ्या अशी विनंती या पत्रात मोठया कळवळल्याने केली होती. गोखल्यांनी सर्व जबाबदारी आपल्याच शिरावर घेण्याचे नाही तरी ठरविलेच होते. आपली एक मानखंडना झाली तेवढी पुरे- आपल्याबरोबर इतरांची नको हाच उदार विचार त्यांनी मनात धरिला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel