गोपाळरावांचे कॉलेजांतील काम जोराने चालू झाले. त्यांस प्रीव्हिय्सचे इंग्लिश शिकवावयास दिले. त्या वर्षी  सौदेचे लोकप्रिय नेल्सनचे चरित्र अभ्यासासाठी होते. नेल्सन दर्यावर्दी अधिकारी. या पुसतकात गलबतांच्या नाना प्रकारच्या भागांचे वर्णन आले आहे. देशावरच्या पुष्कळ विद्यार्थ्यांनी समुद्र पाहिलेला सुध्दा नसतो. त्यास प्रचंड गलबताची कल्पना नसते. गोपाळराव या गलबतांचे यथार्थ स्वरूप समजण्यासाठी स्वत: मुंबईस जाऊन ही माहिती मिळवून येत आणि मग विद्यार्थ्यांस सांगत. कोणतेही काम अंगावर पडले म्हणजे ते कायावाचामनाने करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजणारे लोक थोडेच असतात. कामाची वेळ मारणारेच पुष्कळ; परंतु गोपाळरावांचे हे ब्रीद नव्हते. मुलांस ते मनापासून शिकवीत. शिकविण्यासाटी घरी तयारी करीत. त्यांचा सकाळचा साडेसात ते साडेदहा हा वेळ घरी सिध्दता करण्यात जात असे. आपली जबाबदारी ओळखून काम करणारे असे मेहनती शिक्षक विरळा. परंतु उत्तम शिक्षक  सर्वांनाच होता येत नाही. सर्व विषय सारख्याच मनोरंजकतेने शिकविणे एकाद्यासच साधते. गोपाळराव जरी इंग्रजी शिकविताना पुष्कळ मेहनत घेत तरी मुलांच्या मनावर विषय उत्तम रीतीने त्यांस ठरविता येत नसे. आगरकर न्यायासारखाच बुध्दी आणि तर्कप्रधान विषय सुध्दा रसाळ करून सांगत. टिळकांना गणितातील तेत्त्व विद्यार्थ्यांस सहज  पटतील अशा रीतीने सांगता येत. तसे गोपाळरावांचे इंग्रजीविषयी नव्हते. ते सफाईदार व भराबर न अडखळता बोलत. परंतु वाङ्मय शिकविताना जी एक प्रकारची सहृदयता लागते ती व ग्रंथकाराचे मनोगताशी समरस होता येण्याची कला ही गोपाळरावांत नव्हती! केळकर हे इंग्रजीचे त्यावेळचे नामांकित शिक्षक. ते इंग्रजी विषय इतका उत्कृष्टपणे व सहजपणे विशद करीत की, मुले डोलू लागत. एखाद्या दृष्टांतानेच ग्रंथकाराचे हृद्गत ते मुलांस समजावून देत व एखादी मार्मिक कोटी करून मुलांची मने उचंबळवून सोडीत. विषयाशी शिक्षक तन्मय व्हावा लागतो, आणि मगच सहजोद्गार त्याच्या मुखावाटे बाहेर पडू लागतात. प्रो. केळकरांसारखे शिक्षक खुद्द इंग्लिशातही थोडे मिळतील असा त्यांचा लौकिक होता. परंतु अवघड भागावरच केळकर वेळ दवडावयाचे; सोपा भाग आला की, तासास तीनतीनशे कवितेच्या ओळी व्हावयाच्या. गोखले असे कधी करीत नसत. त्यांचे काम प्रमाणशुध्द आणि नेमस्त. टंगळमंगळ कशातही नाही. अगदी सोपा भाग आला तरी तोही विवरण करावयाचा. सर्वच भाग त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा. हे महत्त्वाचे वाक्य, खुणा करा वगैरे ते सांगावयाचे नाहीत. विद्यार्थ्यांना वाटावयाचे, सर्वच परीक्षेस करावयाचे की काय? परीक्षेसाठी अमुक अमुक मुद्दाम वाचा असे आपणांस शिक्षक सांगतील तर बरे असे विद्यार्थ्यांस वाटत असते, परंतु गोपाळरावांचे तसे नव्हते.  तसेच जेथे जेथे संदर्भ असेल - विशेषत: ऐतिहासिक संदर्भ - तेथे तो स्पष्ट करावयाचा, यामुळे त्यांची शिकवणूक परीक्षेसाठी जास्त उपयोगाची नसे. तसेच वाङ्मयाबद्दल मनात प्रेम किंवा भक्ती उत्पन्न करणे गोखल्यांस शक्य नसे. ते काम केळकरांनीच करावे; असो १८८६-८७ मध्ये गोपाळरावांनी दुसरा एक उद्योग आरंभिला होता. शाळांमधून उपयोग व्हावा म्हणून ते अंकगणितावर एक इंग्रजी पुस्तक लिहीत होते. ते पुरे झाल्यावर त्या त्या विषयांतील पंडितांना त्यांनी ते दाखविले. टिळकांची गणितात मती सूक्ष्म व दांडगी. त्यांनी हे पुस्तक छापवा असे उत्तेजन दिले. गोखले फक्त २१ वर्षांचे होते. त्यांस आनंद झाला व ते पुस्तक प्रसिध्द झाले. प्रथम ते रहाळकर आणि मंडळी यांच्याकडे दिले होते. पुढे ते मॅकमिलन् कंपनीकडे जाऊन या उपयुक्त पुस्तकाचा हिंदुस्तानभर प्रसार झाला. दरमहा १२५ रुपये या उपयुक् पुस्तकाचा हिंदुस्थानभर प्रसार झाला. दरमहा १२५ रुपये या पुस्तकाबद्दल मॅकमिलन् कंपनीकडून त्यांस पुढे मिळत असत. हे एक त्यांस कायमचे उत्पन्न जाले. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मुलीस ते मिळते. नुकतीच या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती प्रो. नाईक यांच्याकडून मॅकमिलन् कंपनीने प्रसिध्द केली आहे.

चांगल्या गोष्टीस लवकरच दृष्ट लागते. लहान मुलाला न्हाऊ माखूं घालून आई त्याच्या पाणीदार डोळयांस काजळ लावते. तो सुंदर दिसूं लागतो. आईला वाटते, माझ्या सोनुल्यावर दृष्ट पडेल; आणि ती त्यास गालबोट लाविते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरभराटत चालली होती. चिपळूणकर जरी गेले तरी त्यांच्या पाठीमागे टिळक, आगरकर,  आपटे, गोळे, धारप, नामजोशी, गोखले, भानू यांसारख्या विद्वानांनी संस्था अल्पावकाशातच नावारूपाला आणिली. संस्थेचे कॉलेज निघून ते आता सर्व विषय शिकविण्यास समर्थ झाले होते, संस्थेचे पैशाचे काम नामजोशी करीत होते. लोकांचा संस्थेवर लोभ जडला. पुण्यास संस्था भूषणभूत झाली. न्यू इंग्लिश स्कूलसारखी शाळा हिंदुस्थानात अन्यत्र क्वचितच असेल असे शेरेबुकात शाळा पाहणा-या अधिका-यांनी लिहून ठेविले. परंतु सर्व काळ सारखाच नसतो. या जोमाने वाढणा-या रोप्याला कीड लागत चालली. दोन भांडी एकत्र आली की त्यांचा आवाज व्हावयाचा. दोन फांद्या एकावर एक घासल्या त्यातून अग्नी बाहेर पडावयाचा. चार माणसे एकत्र होऊन काही दिवस गुण्यागोविंदाने राहताना दिसतात, परंतु अखेर स्फोट व्हावयाचा हे निदान आम्हा लोकांत तरी ठरलेलेच आहे. 'आरंभशूरा: खलु दाक्षिणात्या'  नाना प्रकारच्या कल्पना आम्ही पुढे मांडू- त्या पार पाडण्यासाठी कंबर बांधू, परंतु मध्येच काही तरी विघ्ने उत्पन्न होऊन हे हेतू जागच्या जागी राहतात. या कल्पना बुडबुडयाप्रमाणे विरून जातात. तडीस पोचविणारा एखादाच आमच्यात निघावयाचा असा लौकिक- दुलौकिक- आमचा फारा दिवसांचा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असे होणार अशी चिन्हे दिसू लागली. वाढत्या चंद्रास आजच ग्रहण लागणार, फोफावणा-या वृक्षास कीड लागणार असे वाटू लागले. प्रथम या संकटाचा उदभव मतामतांच्या गलबत्त्यात झाला. आगरकर व टिळक १८८२ च्या जुलै महिन्यात कारागृहात गेले. त्यांना १०१ दिवस एकत्र सहवास झाला. ''मनुष्य पहावा बसून आणि जमीन पहावी कसून'' अशी आपल्यामध्ये एक सुंदर म्हण आहे. आपण जेव्हा मनुष्याच्या जवळ पुष्कळ दिवस राहतो तेव्हाच त्याच्या स्वभावाचे सम्यक् व यथार्थ ज्ञान आपणास होते. वरवर होणारे ज्ञान, येता जाता होणारा बोध हा निर्विकल्प असतो; परंतु आपण त्या मनुष्याच्या सहवासात राहू लागलो की त्याच्या सर्व मताचे सविकल्पक ज्ञान आपणांस होऊ शकतो. आगरकर व टिळक यांचे कॉलेजमधील वादविवाद आता तुरुंगाच्या दारात सुरू झाले. शिक्षणाच्या झिरझिरीत वस्त्राखाली क्षणभर झाकून गेलेली त्यांची परस्परविरोघी मते येथे पुन: स्पष्ट बाहेर येऊ लागली आणि याचा परिणाम असा झाला की, ज्या वेळेस हे दोघे नरवीर कारागृहातून मुक्त झाले त्या वेळेस एकमेकांविरुध्द मने होऊन बाहेर पडले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel