औषधोपचार सुरू झाले. पहिले दोन तीन दिवस फारच काळजी वाटत होती. हळूहळू सुधारणा होत होती. काही दिवस अंथरुणावर पडणेच त्यांस भाग होते. कारण डॉक्टराने तसे सांगितले होते. ज्या घरात ते राहत असत त्याच घरात एक फार ममताळू पोक्त बाई होत्या. ज्या शेरिडनने हिंदुस्तानची करुण कहाणी पार्लमेंटात सांगितली त्या शेरिडनच्याच वंशातली ही बाई होती. तिचे नाव मिसेस कॉन्ग्रीव्ह. या बाईने गोपाळरावांची बरदास्त फार उत्तम ठेविली. शुश्रुषा खरोखर स्त्रियांनीच करावी. गोखल्याची जास्त उत्तम व्यवस्था घरीही झाली नसती. गोपाळराव प्रसन्न राहावे- त्यांचे मन चिंताग्रस्त नसावे यासाठी कॉन्ग्रीव्ह बाई खटपट करी. ती त्यांच्याजवळ बोलत बसे. तिच्याबरोबर बोलण्याचालण्याने गोखल्यांचा भिडस्तपणा जाऊन आता नैसर्गिक चौकसपणा व मोकळेपणा त्यांच्या वागणुकीत आला. ते पंधरा दिवसांनी हिंडू फिरू लागले. ३१ मे १८९७ रोजी युनिव्हर्सिटीतर्फे बोटिंगच्या शर्यती होणार होत्या. त्या पाहण्यास गोखले, वाच्छा व दादाभाई त्रिवर्ग गेले होते. दादाभाईंनी जरी ४०-४२ वर्षे इंग्लंडमध्ये काढली तरी ते ही गोष्ट पाहण्यास कधी गेल नव्हते. ही त्यांची विरक्तता पाहून गोपाळरावांचा आदर दुणावला. गोपाळरावांवर आध्यात्मिक परिणाम घडविणा-या तीन विभूतीपैकी एक दादाभाई होते हे मागे एके ठिकाणी आलेच आहे. बारीक सारीक गोष्टीकडेसुध्दा लहान मुलाप्रमाणे गोपाळरावांचे लक्ष असावयाचे. शिकवताना सुध्दा ते काही वगळावयाचे नाहीत. वाच्छा म्हणतात : Mr. Gokhale was a master of the minutest details.
इंग्लंडमधील प्रसिध्द व्यक्तींस भेटण्याची त्यांची फार इच्छा. मोर्ले साहेबांचे ग्रंथ त्यांनी फार मन:पूर्वक वाचले होते. या तत्त्वज्ञान भेटल्याशिवाय जाणे म्हणजे देवळात जाऊन देव न पाहण्यासारखे त्यांस वाटले असावे. त्यांस भेटून आपली धणी केव्हा तृप्त होईल, डोळयांचे पारणे कधी फिटेल असे त्यांस झाले होते. शेवटी एक दिवस ठरविण्यात आला, आणि गोखले व मोर्ले यांची गाठ पडली. बर्कविषयी, आयर्लंडच्या परिस्थितीविषयी त्यांचे बोलणे झाले. मोकळेपणाने त्यांनी चर्चा केली. शाळेतील एखाद्या आनंदोत्सवाची बातमी घेऊन जसा विद्यार्थी घरी धावत येतो तसे गोखल्यांचे झाले. पुष्कळ वेळा ते खरोखरच मुलाप्रमाणे वागत. मुलाचा उत्साह, जिज्ञासा व अकपटपणा त्यांच्या ठिकाणी अजूनही होता व मरेपर्यंत राहिला. यानंतर आयरिश पक्षाचा जॉन रेडमंड याचीही त्यांनी भेट घेऊन 'होमरूल' ची इत्थंभूत माहिती करून घेतली. सर डब्ल्यू. बेडरबर्न यांच्या मध्यस्थीने दुस-या पुष्कळ हिंदुस्तानच्या हितचिंतकांस ते भेटून आले.
जेथे कोठे मेजवानी किंवा खाना असेल तेथे गोखले आपली तांबडी गुलाबी पगडी घालून जावयाचे. पार्लमेंटमध्ये जाते वेळेसही आपले राष्ट्रीय शिरोभूषणच ते ठेवीन. पाय विलायती झाले तरी डोके हिंदुस्तानी ठेवावयाचे! केंब्रिज लॉजमध्ये दुस-या एक मिस् पायनी म्हणून बाई होत्या. त्यांनी गोपाळरावांचे नवीन नामकरण केले. कॉन्ग्रीव्ह बाईने गोपाळरावांची आजारीपणात शुश्रूषा केल्यामुळे कॉन्ग्रीव्ह बाईंचा पिंगट बच्चा - Brown Baby - त्या विनोदाने म्हणत. इंग्लंडमधील शिक्षणपध्दती कशी काय असते हेही गोपाळरावांस पाहावयाचे होते. केन साहेबांच्या खटपटीने त्यांस हे सर्व समजून घेण्यास सापडले. प्रथम डल्विच कॉलेजमध्ये ते गेले. तेथे अर्धा दिवस मोठया मजेत गेला. फराळ करतान प्रिन्सिपालना प्रश्नांवर प्रश्न विचारून गोपाळराव भंडावून सोडीत. नंतर बेडफर्ड या मुलींच्या कॉलेजात ते गेले. तेथे एक पार्शी बाई शिक्षकीण होत्या. मुलींच्या शिक्षणाबद्दल त्यांनी माहिती करून घेतली. केंब्रिज येथे या वेळेस परांजपे होते, त्यांस भेटण्यास गोखले अर्थातच विसरले नाहीत. सर वुइल्यम हन्टर या प्रसिध्द शिक्षणशास्त्रज्ञासही ते भेटले.