१८९६ मध्ये कलकत्त्यास राष्ट्रीय सभा होती. रानडे व गोखले ही गुरुशिष्यांची जोडी तेथे गेली होती. गोखल्यांविषयी रानडे यांस आता बरीच आशा वाटू लागली होती. हा पुढे मोठा मनुष्य होईल, राष्ट्राचा नेता होईल असे भविष्यकाळचे स्वप्न त्यांच्या दृष्टीस दिसू लागले होते. गोखल्यांची तेथे ओळख करून देताना ते म्हणाले : 'हा एक होतकरू तरुण असून हिंदुस्थानच्या पुढा-यांत याची गणना होईल!' हे त्यांचे शब्द अक्षरश: खरे ठरले, म्हणजे या सुमारास रानडयांस त्यांचे सर्व गुण, त्यांची योग्यता कळून आली असली पाहिजे; एरव्ही नेहमी जबाबदारपणे बोलणा-या व अवास्तव स्तुती न करणा-या रानडयांच्या तोंडून असे उद्गार बाहेर पडले नसते. ''स्तुति येति न मुखासि या असारा ज्या'' - असार म्हणजे पोकळ स्तुती अशा पुरुषांच्या तोंडून येत नसते. आज दहा वर्षे रानडयांजवळ ते शिकत होते. मनाने, बुध्दीने, हृदयाने शिकत होते. वागावे कसे, लिहावे कसे, बोलावे कसे, शांत राहावे कसे- या सर्वांचे धडे त्यांनी घेतले. रानडयांच्या तालमीत पूर्णपणे तयार झाले तेव्हा त्यांचे वय फक्त तीस वर्षांचे होते. या होतकरू तरुणास पुढल्याच वर्षी आपल्या गुरुजवळ शिकलेल्या विद्यत परीक्षा देण्याची वेळ आली. परीक्षा घेणारा तिऱ्हाईत असला म्हणजे परीक्षा जास्त कसोशीने होते. गोपाळरावांची परीक्षा इंग्लंडांत होणार होती. आणि त्या परीक्षेस जाण्याची ते तयारी करू लागले.