[२]
वेस्संतर जातक


सुमेधपंडित ध्यानधारणादिकांत काल घालवून इहलोकांचें कर्तव्य संपल्यावर त्यानें देहविसर्जन केलें. तदनंतर निरनिराळ्या योनींमध्ये अनेक जन्म घेऊन एकदां तो शिबिराजवंशांत जन्मला.

शिबिदेशाच्या राजधानीत संजय नांवाचा राजा राज्य करीत होता. तो प्रजापालनांत इतका दक्ष होता, कीं, सर्व लोक त्याला आपल्या पित्याप्रमाणें मान देत असत. त्याला एक सर्वगुणसंपन्न पुत्र झाला. त्याचें नांव वेस्संतर असें ठेवण्यांत आलें. हाच आमचा बोधिसत्व होता. वेस्संतरानें अल्पवयांतच सर्व विद्यांचें आणि कलांचें ज्ञान संपादून आपल्या पित्याची आणि राष्ट्राची मर्जी संपादन केली. तेव्हां संजय राजानें आपल्या अमात्यांच्या सल्ल्यानें त्याला युवराजपदावर स्थापिलें. वेस्संतर आपल्या संपत्तीचा दानधर्मामध्यें उपयोग करूं लागला. दानधर्म हेंच त्याचें व्यसन होऊन बसलें. अल्पावकाशांतच त्याच्या दानशौर्याची वार्ता चोहींकडे पसरली.

त्या काळीं कलिंगदेशामध्यें भयंकर दुष्काळ पडला. पिण्याचें पाणी देखील मिळण्याची मारामार झाली. जिकडेतिकडे चोर्‍यांचा आणि रोगांचा सुळसुळाट झाला. तेव्हां तेथील राजानें दुष्काळनिवारणाचा उपाय काय, याचा विचार चालविला. त्याला त्याच्या अमात्यांनीं असा सल्ला दिला, कीं, शिबीच्या राज्यांत जो श्वेतवर्ण हत्ती आहे, त्याला या राष्ट्रामध्यें आणिलें असतां पाऊस पडून सर्वत्र सुभिक्ष होईल. त्याप्रमाणें राजानें आपल्या पदरच्या कांहीं ब्राह्मणांनां शिबि देशांत जाऊन संधि साधून वेस्संतरापाशीं त्या हत्तीची याचना करावी अशी विनंति केली. राजाज्ञेप्रमाणें ते ब्राह्मण शिबीच्या राजधानीप्रत येऊन वेस्संतरानें देशोदेशींच्या याचकवर्गांसाठी बांधिलेल्या धर्मशाळेमध्यें उतरले.

एके दिवशीं वेस्संतर त्या श्वेत हस्तीवर बसून नगरप्रदक्षिणा करीत होता. त्या समयीं त्या ब्राह्मणांनीं आपलें अंग धुळीनें माखून व आपला उजवा हात पुढें करून ‘वेस्संतराचा जयजयकार असो!’असें म्हटलें. वेस्संतरानें माहुताला हत्ती उभा करण्यास हुकूम केला व ब्राह्मणांना काय पाहिजे आहे असा प्रश्न केला.

ब्राह्मण म्हणाले, “आम्हांला दुसर्‍या कोणत्याहि गोष्टीची गरज नाहीं. हा एवढा हत्ती द्या म्हणजे झालें.”

वेस्संतर ताबडतोब हत्तीवरून खालीं उतरला व सर्व अलंकारासह वर्तमान त्या हत्तीला ब्राह्मणांच्या हवाली करून तेथल्या तेथें त्यानें त्यांच्या हातावर पाणी सोडिलें.

वाळलेल्या अरण्यांत वायुवेगानें पसरणार्‍या तीव्र दावानलाप्रमाणें ही वार्ता शिबीच्या राजधानींत पसरली. शिबीच्या सरदारांपासून तहत शेतकर्‍यांपर्यंत सर्व मनुष्यांनां अत्यंत दु:ख झालें. इतकेंच नव्हे, तर राजकुमाराचा त्यांनां अतिशय संताप आला. त्याच वेळीं लोकांचा समुदाय राजांगणामध्यें जमला, व त्यांच्या पुढार्‍यांनीं संजयराजाच्या कानावर युवराजाचा अपराध घातला. तो संतप्त जनसमुदाय पाहून राजा घाबरून गेला. तथापि आपण गलितधैर्य झाल्याचें न दर्शवितां जनसमूहाकडे वळून तो म्हणाला “तुम्हीं किती सांगितलें, तरी मी माझ्या प्रिय पुत्राचा वध करण्यास तयार नाहीं.”

तेव्हां ते म्हणाले “आम्ही वेस्संतराचा वध करण्याची विनंति करण्यासाठीं येथें जमलों नाहीं; परंतु ज्याअर्थी त्यानें आमच्या राष्ट्राचें शुभचिन्ह-श्वेतवर्ण हस्ती कोणाच्याहि सल्ल्यावांचून आपल्याच मतानें दान देऊन टाकला, त्याअर्थी त्याला आजच्या आज राजधानींतून घालवून दिलें पाहिजे. त्यानें आमच्या देशांतून जाऊन वंक नांवाच्या पर्वतावर तपश्चर्या करावी.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel