[३]
मघाची गोष्ट

आता बोधिसत्वानें शीलपारिमतेची पूर्तता कशी केली, याचें एक उदाहरण सांगतों.

हजारों वर्षांपूर्वी आमचा बोधिसत्व मगधदेशामध्यें मचल नांवाच्या गांवांत एका शेतकर्‍याच्या कुटुंबांत जन्मला. त्याचें नांव त्याच्या आई-बापांनी मघ असें ठेविलें होतें. मघ जेव्हां वयांत आला, तेव्हां आपल्या गांवांतील लोकांचा आपस्वार्थीपणा पाहून त्याचें मन फार कळवळलें. त्यानें आपल्या गांवांतील रस्ते साफ करावे, घाण असेल ती नेऊन बाहेर टाकावी, पिण्याच्या पाण्यांत घाणेरडें पाणी जाऊं नये म्हणून विहिरीला कठडा बांधावा, व अशींच इतर लोकोपयोगी कामें करावीं; परंतु त्याच्या या कृत्यांचें चीज न होतां गांवांतील लोक त्याला दोष लावीत असत. ते चावडीवर किंवा दारूच्या दुकानांत जमले असतां म्हणत “काय हो! हा वेडा पोरगा मध! आपलीं घरचीं कामें सोडून चालला रिकाम्या उठाठेवी करावयाला! एकट्याच्यानें कधीं सगळ्या गांवाचें हित झालें आहे काय? आपण भले कीं आपला उद्योग भला, असें वागावयाचें टाकून गांवाचें कल्याण करावयाला लागला आहे! काय करावयाचें आपल्याला सर्व गांव घेऊन? मघाला आपल्या मूर्खपणाचा कधींना कधीं पश्चात्ताप करावा लागेल!”

मघाची जरी उघडउघड निंदा होत होती, इतकेंच नव्हे, त्याचे आप्तइष्ट देखील त्याच्या विरुद्ध होते, तरी त्यानें आपलें कर्तव्य सोडिलें नाहीं. मघानें एके दिवशीं एकादा रस्ता साफ करावा व दुसर्‍या दिवशीं आसपासच्या घरांतील बायकांनीं केरकचरा तेथें टाकावा. एकाद्या वयोवृद्ध गृहस्थानें, ही घाण कशाला करतां, असें म्हटलें असतां त्या म्हणत “अहो, तुम्हाला काय याचें? तो मेला मघ आहेना? तो येईल आणि करील साफ!”

मघानें पुन: दोनचार दिवसांनीं यावें, आणि ती जागा साफ करावी. मघाच्या या आत्मसंयमनाचा परिणाम जुन्या पिढीवर कांहींएक झाला नाहीं; परंतु मघ हा चांगल्या मार्गाला लागला नसेल कशावरून? अशी एकदोन तरुणांनां शंका येऊं लागली. मघ आपल्या घरच्या कामांत कांहीं व्यत्यय येऊं देत नसे. घरचें शेतीचें काम आटपून राहिलेला वेळ तो जनसेवेंत घालवीत असे; गांवांतील इतर लोक फुरसतीच्या वेळीं दारूच्या गुत्त्यांत किंवा चावडीवर जमून गप्पा मारण्यांत आपला वेळ घालवीत असत. इतकेंच नव्हे, तर दारूच्या व्यसनानें त्यांचीं घरचीं कामें देखील नीट होत नसत. शिवाय मारामारीमध्यें आणि फिर्यादी-अर्यादीमध्यें त्यांच्या वेळाचा अपव्यय होत असे, तो निराळाच.

वर निर्दिष्ट केलेल्या दोन तरुणांमध्यें एके दिवशीं पुढील संवाद झाला. पहिला तरुण म्हणाला “कायरे, गांवांतील सर्व लोक तर या मघाला दोष देतात. परंतु मला वाटतें कीं, आमच्या गांवांत जर कोणी चांगला माणूस असेल तर तो मघच! मघाला मी कधीं दारूच्या गुत्त्यावर किंवा चावडींत पाहिलें नाहीं; कधीं कोणाशीं तो तंटेबखेडे करीत नाहीं; त्याच्या घरामध्यें तर मूर्तिमंत शांति वास करीत आहे. अशा तरुणाला आमचे लोक मूर्ख समजतात, हें आश्चर्य नव्हे काय? मला तर वाटतें, कीं, आम्हांला गुरू करावयाचा असेल, तर तपोवनांत गुरूला शोधण्यासाठीं न जातां यालाच गुरू करावें हें चांगलें.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel