(२८)
मालुंक्यपुत्राची दृष्टि
बुद्धगुरु श्रावस्तीमध्यें अनाथपिंडिकाच्या आश्रमांत रहात असतां मालुंक्यपुत्र नांवाचा भिक्षु त्याजपाशीं आला आणि त्याला नमस्कार करून एका बाजूला आसनावर बसला. नंतर मालुंक्यपुत्र भगवंताला म्हणाला "भदंत, एकांतांत बसलों असतां माझ्या मनांत असा विचार आला, कीं, हें जग शाश्वत आहे कीं अशाश्वत आहे? शरीर आणि आत्मा एक आहेत कीं भिन्न आहेत? मरणोत्तर तथागताला पुनर्जन्म आहे किंवा नाहीं? इत्यादि मुद्द्यांचे भगवंतानें विवरण केलें नाहीं. तेव्हा मी आपणाजवळ येऊन या मुद्द्यांसंबंधाने प्रश्न विचारीन. जर आपणाला या मुद्द्यांचा निकाल लावतां येईल, तरच मी आपला शिष्य होईन. जर आपणाला या गोष्टी माहीत नसतील, तर त्या माहीत नाहींत असें म्हणणें हाच सरळ मार्ग होय!''
बुद्ध म्हणाला "मालुंक्यपुत्र, तूं माझा शिष्य होशील, तर या मुद्द्यांचें स्पष्टीकरण करून सांगेन, असें मीं तुला सांगितलें होतें काय?''
"नाही भदंत,'' मालुंक्यपुत्राने उत्तर दिलें.
"बरें, तूं तरी मला म्हणालास काय, कीं, जर मला तुह्मी या सर्व मुद्द्यांचें स्पष्टीकरण करून सांगाल, तरच मी तुमच्या भिक्षुसंघात येईन?''
"नाही भदंत,'' मालुंक्यपुत्र म्हणाला.
"बुद्ध म्हणाला "तर मग आतां हे मुद्दे स्पष्ट करून सांगितल्याशिवाय मी तुमचा शिष्य होणार नाही, या म्हणण्यात अर्थ कोणता?
"मालुंक्यपुत्र, एकाद्या मनुष्याच्या अंगामध्ये बाणाचें विषारी शल्य शिरून तो तळमळत असतां त्याचे आप्त-इष्ट शस्त्रक्रिया करणार्या वैद्याला बोलावून आणतील; परंतु तो रोगी त्या वैद्याला म्हणेल, कीं, `हा बाण कोणी मारला? तो ब्राह्मण होता कीं क्षत्रिय होता, वैश्य होता कीं शूद्र होता, काळा होता कीं गोरा होता, त्याचें धनुष्य कोणत्या प्रकारचें होतें, धनुष्याची दोरी कशाची केली होती, इत्यादि सर्व गोष्टीं जोंपर्यंत तुम्ही मला समजावून देणार नाहीं, तोंपर्यंत मी या शस्त्राला हात लावूं देणार नाहीं!' मालुंक्यपुत्र, अशा प्रसंगीं त्या माणसाला या सर्व गोष्टी न समजतांच मरण येईल. त्याचप्रमाणें जो असा हट्ट धरील, कीं, मला हे जग शाश्वत आहे कीं अशाश्वत आहे इत्यादि सर्व मुद्दे समजल्यावांचून मी ब्रह्मचर्याचा अभ्यास करणार नाहीं. तर त्याला हे मुद्दे समजल्यावांचूनच मरण येईल.
"हे मालुंक्यपुत्र, जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, अशी दृष्टि असली आणि असा विश्वास असला, तथापि धार्मिक आचरणाला त्यापासून मदत होईल असें नाहीं. हें जग शाश्वत आहे असा विश्वास ठेविला, तरी जरा, मरण, शोक, परिदेव यांजपासून मुक्तता होत आहे, असें नाहीं. त्याचप्रमाणें शरीर आणि आत्मा एक आहे, शरीर आणि आत्मा भिन्न आहे, मरणोत्तर तथागताचा पुनर्जन्म होतो, मरणोत्तर तथागताचा पुनर्जन्म होत नाहीं, इत्यादि गोष्टींवर विश्वास ठेविला काय किंवा न ठेविला काय, जाति, जरा, मरण, शोक, परिदेव, आहेतच आहेत! म्हणून, हे मालुंक्यपुत्र, जग शाश्वत आहे, इत्यादि गोष्टींचे विवरण करण्याच्या भरीला मी पडलो नाहीं. कांकी, या गोष्टींच्या वादविवादानें ब्रह्मचर्याला कोणत्याहि प्रकारें स्थैर्य येण्याचा संभव नाहीं. अशा वादानें वैराग्य उत्पन्न होणार नाही, पापाचा निरोध व्हावयाचा नाहीं, शांति, प्रज्ञा, संबोध आणि निर्वाण यांचा लाभ व्हावयाचा नाहीं.
"पण मालुंक्यपुत्र, हें दु:ख आहे, हा दु:खाचा समुदय आहे, हा दु:खाचा निरोध आहे, आणि हा दु:खनिरोधाचा मार्ग आहे, हें मीं स्पष्ट करून दाखविलें आहे. कांकी, हीं चार आर्यसत्यें ब्रह्मचर्याला स्थैर्य आणणारीं आहेत. यांजमुळें वैराग्य येतें, पापाचा निरोध होतो, शांतीचा, प्रज्ञेचा, संबोधाचा आणि निर्वाणाचा लाभ होतो. म्हणून, हे मालुंक्यपुत्र, ज्यो गोष्टींची मी चर्चा केली नाहीं, त्या गोष्टींची चर्चा करूं नका, व ज्या गोष्टींचे मी स्पष्टीकरण केलें आहे, त्या गोष्टी स्पष्टीकरणाला योग्य आहेत, असें समजा.''
बुद्धगुरु असें बोलल्यावर मालुंक्यपुत्रानें त्याच्या भाषणाचें अभिनंदन केलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.