महौषधानें आपल्या निवडक सैन्यासहवर्तमान पहांटेला अकस्मात् ब्रह्मदत्ताच्या सैन्यावर घाला घातला. ब्रह्मदत्ताच्या सैन्यांत जिकडेतिकडे मोठी गडबड उडून गेली. सरदार आणि मानकरी राजाच्या वसतिस्थानाकडे धांवले; परंतु तेथें राजा पळून गेल्याची बातमी अनुकेवट्टानें अगोदरच पसरून ठेविली होती. ती बातमी समजल्याबरोबर जो तो अव्यवस्थितपणें पळूं लागला. ब्रह्मदत्ताच्या सैन्याचा पूर्ण पराजय झाला. महौषधानें जय मिळविला, एवढेंच नव्हे, तर ब्रह्मदत्ताच्या पळून गेलेल्या सैन्यानें टाकून दिलेलीं शस्त्रास्त्रें, वस्त्रें, भूषणें हीं सर्व मिळविलीं. बोधिसत्वाच्या चातुर्याची वैदेहराजानें मोठी तारीफ करून सर्व नागरिकांसमोर त्याचा बहुमान केला.

ब्रह्मदत्त व त्याचें सैन्य पांचालदेशाला पळून गेल्यावर जो तो ब्रह्मदत्ताच्या पराजयाचें कारण शोधूं लागला; परंतु ब्रह्मदत्त आपण कां पळालों, हे सांगण्यास तयार नसल्यामुळें तें कोणालाहि समजलें नाहीं. ब्रह्मदत्त मात्र मनांतल्या मनांत फार ओशाळला. अनुकेवट्ट हा महौषधाचा हेर होता, याबद्दल हळुहळू त्याची खात्री होत गेली. गेलेलें यश परत मिळविण्यासाठीं आपल्या केवट्टब्राह्मणाशीं एकांतांत तो अनेक मसलती करूं लागला. शेवटीं केवट्टानें व त्यानें वैदेहराजाला आपल्या हस्तगत करण्याची एक नवी युक्ति शोधून काढिली.

ब्रह्मदत्ताला एक सुस्वरूप कन्या होती. ती तारुण्यांत आल्यामुळें लवकरच तिचा विवाह करण्याचा बेत ठरला होता. ब्रह्मदेवानें आपल्या राज्यांतील नामांकित कवींनां बोलावून तिच्या सौंदर्यावर कविता करविल्या, व भाटांकडून त्या देशोदेशीं फैलाविल्या. तदनंतर त्यानें केवट्टब्राह्मणाबरोबर वैदेहराजाला निरोप पाठविला, कीं, "माझी एकुलती एक कन्या तुम्हाला देऊन तुमच्याशीं कायमचें सख्य करण्याची माझी उत्कट इच्छा आहे."

केवट्टब्राह्मणानें मोठमोठाले नजराणे वैदेहराजाला देऊन त्याच्या दरबारामध्यें आपल्या राजाचा निरोप त्याला निवेदित केला. वैदेहराजानें आपल्या अमात्यांची या कामीं सल्ला घेतला. त्याच्या जुन्या प्रधानांनीं असा संबंध घडून येणें इष्ट आहे, असें सांगितलें; परंतु बोधिसत्व म्हणाला "महाराज, आपल्या कन्येचें आमिष लावून ब्रह्मदत्त आपल्याला भुलवूं पहात आहे. आपण जर त्याला भुललां, तर मासा जसा गळाला लागून नाश पावतो, तसे आपण नाश पावाल. आपण ब्रह्मदत्ताचीं गोडगोड भाषणें ऐकून जर पांचालदेशाला जाल, तर आपल्या हातानें आपला नाश करून घ्याल!"

वैदेहाला बोधिसत्वाचें भाषण ऐकून अत्यंत संताप आला आणि तो म्हणाला "असल्या नाजुक कामीं मीं तुझ्यासारख्या नांगर्‍याचा सल्ला विचारला, हा माझाच मूर्खपणा होय. या बाबतींत माझे जुने प्रधान जशी मला सल्ला देऊं शकतील, तशी तूं देऊं शकणार नाहींस, हें मला पूर्वीच माहीत असावयाला पाहिजे होतें! मोठमोठ्या कुलांशीं संबंध जोडून आणणें, ही कामें हीनकुळांत जन्मलेल्या माणसाला कशीं साधतील?"

वैदेह आपल्या नोकरांकडे वळून म्हणाला "अरे, या मूर्ख महौषधाला गचांडी देऊन येथून हांकून द्या. मला रुपवती स्त्रीचा लाभ घडत असतां त्याला हा आपल्या मूर्खपणानें अंतराय करूं पहात आहे!"

महौषधानें वारा कोठून वहात आहे, हें ताडलें. आपला धनी कामांध झाला आहे व त्याला या वेळीं सदसद्विवेक राहिला नाहीं, असें जाणून तो तेथें एक क्षणभर देखील राहिला नाहीं. आपण तेथें राहिलों, तर बोलल्याप्रमाणें राजा आपणाला गचांडी देऊन बाहेर काढील, हें तो जाणून होता. म्हणून मुकाट्यानें राजवाड्यांतून निघून तो आपल्या पित्याच्या घरीं गेला.

इकडे वैदेहराजानें केवट्टब्राह्मणाला आपण ब्रह्मदत्ताच्या कन्येशीं विवाह करूं, असें अभिवचन दिलें. मात्र विवाहाला मुहूर्त कोणता, तें उत्तम ज्योतिष्यांच्या सल्लानें ठरवून मागाहून कळवितों, असें सांगितलें.

केवट्टानें माघारें जाऊन सर्व वृत्तांत ब्रह्मदत्ताला निवेदन केला. आपल्या मसलतीच्या बीजाला पालवी फुटत आहे, हें पाहून ब्रह्मदत्ताला अत्यंत हर्ष झाला.

महौषध जरी राजापासून दूर गेला होता, तरी रात्रंदिवस आपल्या धन्याच्या हिताची काळजी त्याला लागली होती. आपला धनी कामांध होऊन ब्रह्मदत्ताच्या पाशांत पडूं पहात आहे, याबद्दल त्याला अत्यंत वाईट वाटलें. त्यानें राजाला निरोप पाठविला, कीं, "ब्रह्मदत्ताच्या कन्येबरोबर विवाह करण्याचा राजेसाहेबांचा जर निश्चयच ठरला असेल, तर घाई न करतां विवाहविधि जरा लांबणीवर टाकावा. मी पांचाल देशाच्या राजधानीला जाऊन विदेहाच्या राजाला योग्य असें एक निवासस्थान तयार करतों. हें स्थान तयार झाल्यावर आमच्या महाराजांनीं तेथें यावें. असें केलें असतां आमच्या देशाची अब्रू राहील."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel