त्यांनीं 'होय' असें उत्तर दिल्यावर तो म्हणाला "तुम्ही दोघीजणी या मुलाच्या हाताला व पायाला धरून ओढा. जी या मुलाला ओढून नेऊं शकेल, ती याची खरी आई."

त्या दोघी त्या मुलाला ओढूं लागल्या, तोंच तें मूल मोठमोठ्यानें रडूं लागलें. त्याच्या खर्‍या आईनें त्याला तेव्हांच सोडून दिलें, आणि एका बाजूला जाऊन ती करुण स्वरानें रुदन करूं लागली. परंतु यक्षिणीच्या तोंडावर आपला जय झाल्याबद्दल हास्य दिसत होतें.

बोधिसत्व म्हणाला "सभ्य हो, मुलाला सोडून देऊन बाजूला रडत असलेली ही स्त्री मुलाची खरी आई आहे. आपल्या मुलाच्या रडण्यानें तिचें अंत:करण कळवळलें, व तिनें त्याला ताबडतोब सोडून दिलें; परंतु या यक्षिणीच्या चेहर्‍यावर तिला मुलाबद्दल वाईट वाटल्याचें काहीच चिन्ह दिसत नाहीं."

सभागृहांतील लोकांनां बोधिसत्वानें दिलेला न्याय पसंत पडला. यक्षिणीनें आपला गुन्हा कबूल केला, व मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करून ती लाजेनें तोंड खालीं करून तेथून निघून गेली.

बोधिसत्वाच्या चातुर्याची कीर्ति वैदेह राजाच्या कानांपर्यंत कधींच पोहोंचली होती. आपल्या दरबारांत त्याची योजना करण्याचा विचार राजानें अनेकदां मनांत आणिला, परंतु या कामीं अमात्यांची त्याला संमति न मिळाल्यामुळें राजाला तो बेत अमलांत आणतां आला नाहीं. तथापि राजा वारंवार बोधिसत्वाचा समाचार घेत असे. निरनिराळ्या उपायांनीं त्यानें बोधिसत्वाचें चातुर्य कसोटीला लावून पाहिलें; आणि जेव्हां त्याची खात्री झाली, तेव्हां आपल्या अमात्यांची मसलत न घेतां बोधिसत्वाच्या आईबापांच्या संमतीनें त्यानें बोधिसत्वाला आपल्या वाड्यांत आणून ठेविलें.

बोधिसत्व तरुण असल्यामुळें राजाच्या दरबारांत त्याचें एकदम तेज पडलें नाहीं. तथापि आपल्या बुद्धिबलावर क्रमश: त्यानें सर्व अमात्यांत पहिली जागा पटकाविली. अर्थात् राजाचे चारहि अमात्य त्याचा अतिशय मत्सर करूं लागले. त्यांनीं बोधिसत्वाला हाणून पाडण्यास पुष्कळ प्रयत्न केले; परंतु बोधिसत्वानें आपल्या चातुर्यानें त्यांच्या प्रयत्नांला यश येऊं दिलें नाहीं.

त्या कालीं पांचालदेशामध्यें चूलनिब्रह्मदत्त नांवाचा राजा राज्य करीत होता. केवट्ट नांवाचा ब्राह्मण त्याचा मुख्य प्रधान होता. केवट्टाच्या सल्ल्यान ब्रह्मदत्तानें सर्व भरतखंडाचें एकछत्री राज्य संपादण्याचा निश्चय केला. त्यानें आपल्या सैन्यासहवर्तमान लहानसान देश पादाक्रांत केले, अनेक राजांनां पदच्युत करून त्यांची गादी आपल्या हुकुमांत वागणार्‍या त्यांच्या आप्तांना दिली.

ब्रह्मदत्तानें एवढी घडामोड केली, तथापि विदेहाच्या राज्यावर स्वारी करण्याचें साहस केलें नाहीं. परंतु मिथिला हस्तगत केल्यावांचून इतर राजे त्याला सर्वथैव शरण जाण्यास तयार नव्हते. तेव्हां त्यानें मोठी फौज गोळा करून विदेह राष्ट्रावर हल्ला केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel