विशाखेनें आपल्या पित्यानें घालून दिलेल्या दहा नियमांची याप्रमाणें फोड केल्यावर त्या आठ कुलीन गृहस्थांनी तिची फारच स्तुति केली, व ते मिगारश्रेष्ठीला म्हणाले “आपण रागाच्या भरांत या शहाण्या मुलीला घरांतून घालवून देण्यास तयार झालां आहां; पण आम्ही ही आपल्या घरी लक्ष्मीच आहे असें समजतों.”

मिगारानें आपली चूक कबूल केली व विशाखेची क्षमा मागितली.

विशाखा म्हणाली “आपण वडीलच आहांत, तेव्हां क्षमा करण्यासारखा आपला मोठा अपराध आहे असें मी समजत नाहीं; परंतु एका गोष्टीमध्ये मात्र आपलें व माझें पटावयाचें नाहीं, असें वाटतें. मी बुद्धाची उपासिका आहें, व आपण निंर्ग्रथांचे उपासक आहांत. तेव्हां बौद्धभिक्षु आमच्या घरीं भिक्षेला आले असतां ते आपणाला खपावयाचे नाहीं, व निर्ग्रंथ आले असतां त्यांना मी नमस्कार करणार नाहीं. या बाबतीत काहीं तडजोड निघाल्याशिवाय माझ्या येथें राहण्यानें आपणाला किंवा मला सुख होणार नाहीं.”

मिगार म्हणाला “तुझ्या इच्छेप्रमाणें वागण्याला कोणतीच हरकत नाहीं. माझ्या घरी पुष्कळ धनदौलत आहे. बौद्धभिक्षूंनां आमंत्रण करून तूं जेवावयाला घातलेंस, तर त्याच्यायोगें मी दरिद्री होईन, असा प्रकार मुळीच नाहीं. मी माझ्या निर्ग्रंथांना अन्नदान करीन, व तूं यथावकाश बौद्धभिक्षूंनां अन्नवस्त्रादिकांचें दान कर.”

विशाखेनें दुसर्‍याच दिवशी बुद्धाला आणि भिक्षुसंघाला निमंत्रण केलें. हें वर्तमान निर्ग्रंथांनां समजतांच त्यांनीं ताबडतोब मिगारश्रेष्ठीला गांठलें, आणि या गोष्टीचा खुलासा विचारला.

मिगार म्हणाला “माझी सून कांही लहानसान कुळांतली नव्हे. तिला दासीप्रमाणें वागवितां येणें शक्य नाहीं. माझ्या घरांत जर सुख नांदावयाचें असेल, तर माझ्या सुनेला मीं योग्य स्वातंत्र्य दिलेंच पाहिजे.”

निर्ग्रंथ म्हणाले “बौद्धभिक्षूंनां तुझ्या घरीं यावयाला जर तुला मनाई करतां येण्यासारखी नसेल, तर निदान तूं त्यांच्या दर्शनाला तरी जाऊं नकोस. बुद्ध मोठा मायावी आहे; तो लोकांना मोह पाडून आपल्या पंथांत ओढून नेतो, असें आम्ही ऐकिलें आहे. तेव्हा विशाखेनें कितीही आग्रह केला, तरी तूं त्याच्या दर्शनाला जाऊं नकोस.”

मिगारानें बुद्धाची किंवा भिक्षूंची भेट न घेण्याचें अभिवचन दिल्यावर निर्ग्रंथ आपल्या आश्रमांत गेले.

दुसर्‍या दिवशी विशाखेनें जेवणाची सर्व तयारी करून बुद्धाला आणि भिक्षुंनां बोलावून मोठ्या आदरानें त्यांचें संतर्पण केलें. भोजनोत्तर बुद्धगुरुला विशाखेनें आपणाला व आपल्या घरांतील मंडळीला धर्मोपदेश करावयाची विनंति केली. पण हा उपदेश ऐकावयाला मिगार येईना. विशाखेने फारच आग्रह केल्यावर पडद्याच्या आड बसून धर्मोपदेश ऐकण्याला तो कबूल झाला. बुद्धाचे तोंड मात्र त्याला पहावयाचें नव्हतें! विशाखेनें एका बाजूला पडदा बांधून आपल्या सासरर्‍याला बसण्याची सोय केली.

सर्व मंडळी जमल्यावर बुद्धानें आपल्या अमृततुल्य वाणीनें त्यांनां उपदेश केला. दान, शील, भावना इत्यादी गोष्टीसंबंधानें बुद्धानें केलेला बोध ऐकून मिगारश्रेष्ठींचा कंठ दाटून आला. असा थोर सत्पुरुष आपणापाशी असतां आपण मूर्खपणानें त्याचें दर्शन घेण्याला तयार नाहीं, याचा त्याला अत्यंत पश्चात्ताप झाला व एकदम पडदा दूर सारून धावत येऊन त्यानें बुद्धाच्या पायांवर डोकें ठेविलें. तो म्हणाला “भगवन्! माझ्या अपराधांची क्षमा करा. आजपासून मी आपला उपासक झालों आहे. या बाबतीत विशाखा मला मातेसमान आहे. ती जर माझ्या घरीं आली नसती, तर आपली अमृतवाणी माझ्या कानीं पडली नसती. म्हणून आजपासून तिला मी माझी आईच म्हणत जाईन.”

तेव्हांपासून विशाखेला मिगारमाता हें नांव पडलें. श्रावस्तीतील बहुतेक लोक मिगारमाता या नांवानेंच तिला ओळखीत असत. तिनें बुद्धाला, व भिक्षुसंघाला रहाण्यासाठी पूर्वाराम नांवाच्या उद्यानामध्यें एक प्रासाद बांधला होता. त्याला `मिगारमातेचा प्रासाद’ असें म्हणत असत. श्रावस्तीमध्यें विशाखेच्या शहाणपणाची आणि नीतिमत्तेची कीर्ति तेव्हांच पसरली; आणि रावापासून रंकापर्यंत तिचा बहुमान होऊं लागला. मंगलकार्यात आणि उत्सवात विशाखेला पहिल्यानें आमंत्रण देण्याची वहिवाट पडली. श्रावस्तींतील बौद्ध उपासिकांत ती प्रमुख होती. आगन्तुक व आजारी भिक्षूंच्या सोईकडे ती फार लक्ष्य पुरवीत असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel