[८]
शुद्धोदनराजाची भेट


सिद्धार्थ आपल्या वयाच्या छत्तीसाव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला बुद्ध झाला. त्यानंतर आषाढी पौर्णिमेला ऋषिपतनामध्यें पांच तपस्व्यांनां बुद्धानें प्रथमत: धर्मोपदेश केला. चातुर्मास ऋषिपतनांत राहून धर्मोपदेश करीतकरीत उरुवेलकाश्यपादिक एक हजार जटिलांनां आपले शिष्य करून पौष महिन्यांत बुद्ध राजगृहाला परत आला, व महिना-पंधरा दिवसांच्या आंतच सारिपुत्तमोग्गल्लानादिक परिव्राजकांनां त्यानें आपल्या संघांत घेतले. येथें बुद्धाभोंवतीं मोठा भिक्षुसंघ जमला व त्यामुळे त्याची कीर्ति विंध्य आणि हिमालय या दोन पर्वतांमधील प्रदेशांत सर्वत्र पसरली.

सहा वर्षेपर्यंत शुद्धोदनराजाला आपल्या मुलाचें वर्तमान नीटसें समजलें नव्हतें; पण आतां तो मोठ्या संघाचा शास्ता झाला आहे, व राजगृहामध्यें बिंबिसारराजानें दिलेल्या वेणुवनविहारांत रहात आहे, ही वार्ता शुद्धोदनाच्या कानीं यावयाला उशीर लागला नाही. राजानें एका विश्वासु दूताला बुद्धाला कपिलवस्तूस आणण्यासाठी पाठविलें. पण तो माघारा न येतां वेणुवनामध्यें बुद्धाचा धर्मश्रवण करून तेथेंच भिक्षु होऊन राहिला. राजानें आणखी दोनतीन दूत पाठविले; पण त्या सर्वांचीहि तीच गत झाली.

शेवटी कालुदायी नांवाच्या सिद्धार्थाच्या बालमित्राला राजानें बुद्धाला घेऊन येण्यासाठी राजगृहास पाठविलें. तो वेणुवनामध्यें येऊन बुद्धाचा शिष्य झाला. तथापि इतर दूतांप्रमाणे आपलें कर्तव्य विसरला नाहीं. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशीं तो बुद्धाला म्हणाला  “भगवन् आपला पिता आपल्या दर्शनाला अत्यंत उत्सुक झाला आहे. तेव्हां आपण कपिलवस्तूला जाऊन एकवार त्याला व इतर आप्तांना भेट द्यावी, अशी माझी विनंति आहे. भगवन् हा वसंतकाल आपल्या गमनाला अत्यंत योग्य आहे.”

कालुदायीच्या विनंतीला मान देऊन बुद्धगुरू राजगृहांतून निघाला; आणि अनुक्रमें धर्मोपदेश करीत करीत कपिलवस्तूला आला. तेथें शाक्यांनी तयार केलेल्या न्यग्रोध नांवाच्या विहारांत राहून बुद्धानें आपल्या ज्ञातकांनां अनेकवार धर्मोपदेश केला.

एके दिवशी भिक्षाग्रहणासाठीं तो शुद्धोद्यानाच्या वाड्यांत गेलां असतां त्याला यशोधरादेवीनें पाहिलें, आणि ती आपल्या मुलाला म्हणाली “राहुला, तो तेथें बसलेला श्रमण तूं पाहिला आहेस काय? तो तुझा पिता आहे. त्याच्यापाशी जाऊन तूं आपला दायभाग माग!”

आपल्या मातेचें भाषण ऐकून राहुल धांवतधांवत बुद्धासमोर येऊन उभा राहिला. बुद्धगुरू आसनावरून उठून, न्यग्रोधारामाकडे चालता झाला. राहुलहि त्याच्या मागोमाग “बाबा, मला माझा दायभाग द्या, बाबा मला माझा दायभग द्या,” असें म्हणत म्हणत चालला. विहारांत पोहोंचल्यावर बुद्धानें सारिपुत्ताला बोलावून आणून सांगितलें, कीं, हा राहुल कुमार माझ्याकडून दायभाग मागत आहे, तेव्हां तूं याला प्रवज्या देऊन श्रामणेर कर.”(१ ज्याच्या  वयाला वीस वर्षे पुरीं झालीं नसतील. त्याला भिक्षुसंघांत घेतां येत नाहीं; परंतु त्याला श्रामणेर करून एकाद्या भिक्षूपाशीं धर्मपठनार्थ ठेवितां येतें. भिक्षुला पुष्कळ नियम पाळावे लागतात, पण श्रामणेराला खालील दहाच नियम पाळावयाचे असतात:- (१) प्राणघातापासून निवृत्ति; (२) अदत्तदानापासून, चोरीपासून निवृत्ति; (३) अब्रह्मचर्यापासून निवृत्ति; (४) असत्य भाषणापासून निवृत्ति; (५) मादकपदार्थापासून निवृत्ति; (६) मध्यान्हानंतर न जेवणे; (७) मनोविकार उद्दीपित करणारें नृत्य, गीत आणि वाद्य यांपासून निवृत्त होणें; (८) माला, गंध, अलंकार इत्यादिकांपासून निवृत्त होणें; (९) उंच आणि मौल्यवान बिछान्यांवर न निजणें; आणि (१०) सोनें व रूपें यांचे ग्रहण न करणें. या दहा नियमांनां श्रमणेराचीं शिक्षापदें म्हणतात.

सारिपुत्तानें बुद्धानें सांगितलेल्या विधीप्रमाणे राहूलाला श्रामणेर करून आपल्याजवळ ठेवून घेतलें. हे वर्तमान शुद्धोदनराजाला समजलें, तेव्हां तो न्यग्रोधविहारांत येऊन बुद्धाला म्हणाला “भगवन् तूं जेव्हां गृहत्याग केलास, तेव्हां मला अत्यंत दु:ख झालें; पण माझ्या लहानग्या राहुलला तूं प्रव्रज्या दिलीस, तेव्हां तर माझ्या दु:खाचा परमावधिच झाली असें मी समजतों! आतां तूं मला असा एक वर दे, कीं, कोणत्याहि तरुण मनुष्याला त्याच्या आईबापांच्या परवानगीवांचून भिक्षुसंघांत घेऊन नये किंवा श्रामणेर करूं नये.”

तेव्हांपासून बुद्धानें आईबापांच्या परवानगीवांचून कोणत्याहि मुलाला भिक्षु किंवा श्रामणेर करूं नये, असा नियम केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel