(१)
बुद्धचरित्र
जन्म आणि बालपण

दीपंकरबुद्धानंतर निरनिराळ्या कल्पांमध्यें कौंडिण्यादिक तेवीस बुद्ध झालें. या सर्वांच्या कारकीर्दीत आमचा बोधिसत्व दहा पारमितांपैकी एकादी पारमिता पूर्ण करण्यात गुंतला होता. या पारमिता पूर्ण करण्यासाठी बोधिसत्वानें अनेक जन्म घेतलें, व त्या पूर्ण झाल्यावर शेवटल्या जन्मी तो तुषित नांवाच्या देवलोकांत जन्मला.

त्या वेळी जगतीतलावर बुद्ध उत्पन्न व्हावा, अशी सर्व देवांना तळमळ लागून राहिली होती. अनेक चक्रवालांतून देव एकत्र जमून त्यांनी बोधिसत्वाला मनुष्यलोकामध्ये जन्म घेण्यासाठी फारच आग्रह केला. ते म्हणाला “हे मित्रा! तूं आजपर्यंत ज्या दहा पारमितांचा अभ्यास केलास, ज्या पारमिता तूं पूर्णत्वाला नेल्यास, त्या जगामध्ये मोठी संपत्ति मिळावी म्हणून नव्हें; इंद्रपद किंवा ब्रह्मपद मिळावें म्हणून नव्हें, तर मनुष्यलोकी जन्म घेऊन बुद्धपद मिळवावें आणि तदद्वारा देवमनुष्यांचा उद्धार करावा, याचसाठी अनेक जन्म घेऊन तूं दहाहि पारमितांमध्ये पारंगतता संपादन केली आहेस! आता बुद्ध होण्याचा समय जवळ आला आहे, तेव्हा नंदनवनांतील सुखांत न रमतां मुष्यलोकींची दु:खें भोगण्यास तयार आहे!”

बोधिसत्व म्हणाला “मित्रहो, मी आजपर्यंत सर्व प्राणियोनीमध्ये जन्म घेऊन अनेक दु:खें सहन केली आहेत. लोकोद्धारासाठी दु:ख सहन करण्यांत मला जेवढा आनंद वाटतो, तेवढा या तुषितभवनांतील नंदनवनांतहि वाटत नाही! परंतु मनुष्यलोकी जन्म घेण्यापूर्वी मला काहीं गोष्टीचा विचार केला पाहिजें. अल्पावकाशांतच माझा बेत काय ठरला, हें मी तुम्हांला सांगेन.”

सगळे देव आपापल्या ठिकाणी गेल्यावर बोधिसत्व लुषितभवनातील नंदनवनांत एकांतस्थळी बसून विचारमग्न झाला. तो आपणाशींच म्हणाला, “मनुष्यलोकामध्ये जन्म घेण्यास सध्याचा काळ योग्य दिसतो. जातिजरादि दु:खांचा नीट बोध होत नसतो; पण आतां मनुष्याचें आयुष्य अवघें शंभर वर्षांचे आहे. तेव्हा सद्धर्मप्रसाराला हाच समय मला योग्य वाटतो; पण या अफाट पृथ्वीतलावर कोणत्या खंडात जन्म घ्यावा? विचाराअंती मला असें वाटतें, की, भरतखंडच बुद्धोत्पत्तीला योग्य स्थान आहे. या भरतखंडांमध्ये विंध्य आणि हिमालय या पर्वतांमधील प्रदेशांत-मध्यदेशांत-प्राचीन काली थोर साधुसंत आणि सर्व बुद्ध उत्पन्न झाले, पण या देशांतदेखील सद्धर्माचा प्रसार करण्यासाठी मला उत्तम कुलांतच जन्म घेतला पाहिजे. हे हिमालयाच्या पायथ्याशी रहाणारें शाक्यराजें मोठे स्वाभिमानी आहेंत. प्रसिद्ध इक्ष्वाकु राजा यांचा पूर्वज असल्यामुळे सर्व लोकांत यांच्या कुलाला फार मान आहे. तेव्हा याच कुलामध्ये शेवटला जन्म घ्यावा, हे मला उचित आहे. आता कोणत्या आईच्या उदरी जन्माला यावें, हे ठरविण्याची पंचाईत राहिली नाही. शुद्धोदनराजाची साध्वी स्त्री माझी आई होण्यास योग्य आहे. तेव्हा देवांनी केलेल्या विनंतीला मान देण्यास मला आतां उशीर लावण्याचे कारण उरलें नाही.”

बोधिसत्वानें शाक्यकुलामध्ये शुद्धोदनराजाच्या पत्नीच्या उदरी जन्म घेण्यचा आपला निश्चय देवांना कळविला. तेव्हा त्यातील ज्या देवांची आयुर्मर्यादा संपली होती, त्यांनीहि बुद्धाचें शिष्य होण्याची संधि दवडूं नयें म्हणून मध्यदेशामध्ये जन्म घेण्याचा बेत केला.

आषाढी पौर्णिमेच्या पूर्वी सात दिवस कपिलवस्तू नगरामध्ये एका मोठ्या उत्सवाला सुरवात होत असे. हा उत्सव सात दिवस चालून पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होत असे. मायादेवी सात दिवसपर्यंत पुष्पगंधादिकांनी शरीर शृंगारून मोठ्या आनंदानें उत्सावामध्ये मिसळत असे; परंतु तिच्या नियमाप्रमाणें तिनें दारूला कधीहि स्पर्श केला नाही. इतर क्षत्रिय स्त्रिया आणि पुरुष या काळच्या वहिवाटीप्रमाणें त्या उत्सवांत मद्यपान करीत असत. परंतु मायादेवी सर्व प्रकारच्या मादक पदार्थापासून अलिप्त राही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel