बुद्धाचा जन्म झाल्याबरोबर जिकडेतिकडे आनंदी आनंद झाला. मुक्यांना वाचा फुटली; अंध दिव्यरूपेदेखील पाहू लागलें; पांगळे खडखडीत चालूं लागले; वायू मंजुल वाहूं लागला; लहानसान ओढ्यांचेदेखील पाणी निर्मळ झाले; व्याघ्रादि हिंस्र श्वापदांनी आपला क्रूरपणा सोडून दिला; अशा प्रकारचे आणखीहि पुष्कळ चमत्कार घडून आले!

शुद्धोदनराजाला पुत्रजन्माची वार्ता समजल्याबरोबर त्यानें मोठ्या थाटानें मायादेवीला पुत्रासहनर्तमान कपिलवस्तूला नेले.
त्या वेळी कपिलवस्तूच्या जवळच्या अरण्यामध्ये असत देवल नावाचा ऋषि रहात असें. त्यानें अंतरिक्षांत ध्वजपताकादि उभारून देव मोठा उत्सव करीत आहेत, हे पाहिले, व तो त्या देवांना म्हणाला “देवहो, आज तुम्ही हा एवढा मोठा उत्सव करीत आहां, याचें कारण काय?

असुरांचा पराजय झाला व तुमचा जय झाला, त्या वेळी देखील तुम्ही अशा प्रकारचा उत्सव केला नाही!”

देव म्हणाले “तूं इतक्या जवळ असून शुद्धोदनराजाला पुत्र झाला, हे वर्तमान तुला माहीत नाही काय? हा पुत्र जगताचा उद्धार करणारा बुद्ध होणार आहे. आणि म्हणूनच आज आम्ही मोठ्या आनंदानें उत्सव करीत आहो!”

हें देवांचे भाषण ऐकून असित ऋषि अंतरिक्षांतून शुद्धोदन राजाच्या राजवाड्यांत उतरला, आणि तेथे जमलेल्या शाक्यांना तो म्हणाला “शुद्धोदनराजाच्या पुत्राला मी पाहू इच्छित आहे.”

जेव्हा असितानें सर्वलक्षणसंपन्न अशा त्या बालकाला पाहिलें, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून एकसारख्या अश्रुधारा वाहूं लागल्या. ते पाहून शाक्यांना आश्चर्य वाटलें. ते म्हणाले “हे ऋषिश्रेष्ठ! या आमच्या राजाच्या मुलाला पाहून तपश्चर्येने तेजस्वी झालेल्या तुझ्या डोळ्यांतून आसवें का आली? या आमच्या राजपुत्राला काही भय तर नाहीना!”

असित म्हणाला “शक्यहो! तुमच्या कुलांत हे रत्न जन्मल्याबद्दल तुम्ही आनंद करा, याच्या अंगावरील लक्षणावरून हा बुद्ध होऊन अनेक प्राण्यांचा उद्धार करणार आहे, हे स्पष्ट दिसतें. पण माझी आयुर्मर्यादा अत्यल्प राहिली आहे. याचा अमृततुल्य धर्म श्रवण करण्यास मी जगणार नाही, याबद्दल मला फार वाईट वाटत आहे, आणि त्याचमुळें माझा शोक मला अनावर होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रु निघाले! तुमच्यापैकी जे कोणी याचा धर्म श्रवण करण्यास जगतील, ते धन्य होत!”
इतकें बोलून व बोधिसत्वाला नमस्कार करून असित ऋषि आपल्या आश्रमात गेला.

त्या वेळी शुद्धोदनराजाच्या दरबारामध्ये राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, कौंडिण्, भोज, सुयाम आणि सुदत्त हे षंङ्गवेदधारी आठ विद्वान ब्राह्मण होते. त्यांना बोलावून आणून राजाने वहिवटीप्रमाणे आपल्या मुलाचें जातक वर्तविण्यास सांगितले. त्यापैकी सात ब्राह्मणांनी दोन बोटे पुढे करून द्विधा भविष्य कथन केले. ते म्हणाला “महाराज, हा मुलगा जर गृहस्थाश्रमात राहिला, तर चक्रवर्ती होईल; संन्याशी झाला, तर सम्यक संबुद्ध होऊन जगाचा उद्धार करील.”

परंतु कौंडिण्य ब्राह्मण एकच बोट पुढें करून म्हणाला “महाराज, हा मुलगा खात्रीनें बुद्ध होणार आहे!”

नामकरणाच्या दिवशी शुद्धोदनानें पुत्रलाभानें आपले मनोरथ परिपूर्ण झाले, म्हणून आपल्या मुलाला सिद्धार्थ हे नांव ठेविलें.
सिद्धार्थ सात दिवसाचा असतांच मायादेवी परलोकवासी झाली!  तेव्हा त्याचा सर्व भार त्याची सावत्रमाता आणि मावशी महाप्रजापती गौतमी इजवर पडला. गौतमीनें सिद्धार्थाचें आपल्या मुलापेक्षाहि अधिक लालन केले. सिद्धार्थ तिचा जीव की प्राण होऊन राहिला.

कपिलवस्तूमध्ये प्रतिसंवत्सरी वप्रमंगल (शेत नागंरण्याचा उत्सव होत असे त्या दिवशी शाक्यराजे स्वत: शेत नांगरीत असत. शुद्धोदनराजा सिद्धार्थाला बरोबर घेऊन मोठ्या लवाजम्यानिशी उत्सवाच्या दिवशी शेतात गेला. सिद्धार्थाला एका जंबु वृक्षाखाली बसवून व त्याच्या रक्षणासाठी दायांना ठेवून शुद्धोदन आपल्या लोकांसहवर्तमान शेत नांगरण्याच्या कामांत गुंतला. इकडे त्या दाया सिद्धार्थाला त्याच्या सुंदर बिछान्यावर निजवून तेथून उत्सव पहाण्यासाठी दुसर्‍या ठिकणी गेल्या. उत्सवाच्या ठिकाणी पुष्कळ फेरीवाले आपला माल घेऊन विकण्यासाठी फिरत होते. काही दुकानदारांनी तंबू ताणून तेवढ्या वेळेपुरची दुकानें उघडली होती. सिद्धार्थाच्या दाया या दुकानांतून त्या दुकानांत फिरतफिरत व ज्या त्या नवीन जिनसाकडें पहात चालल्या होत्या. त्यांना सिद्धार्थाची आठवण राहिली नाही. सिद्धार्थ जागा झाला व आपणाजवळ कोणी नाही असें पाहून वज्रासन घालून ध्यानस्थ बसला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel