सुतसोमानें आपल्या एका हुजर्‍याला ब्राह्मणाबरोबर पाठवून त्याची एका उत्तम वाड्यांत सर्व व्यवस्था करविली.

सुतसोम आपल्या तलावाच्या कांठी येऊन स्नानासाठी तलावांत उतरल्याबरोबर त्याला नरभक्षकाने पकडले. सुतसोमाला पाठीवर टाकून त्याच्या शरीररक्षकांची पर्वा न करिता नरभक्षक वायुवेगाने जाऊं लागला. कांही अंतरावर गेल्यावर सुतसोमाला खाली ठेवून उभा राहिला असतां नरभक्षकाने सुतसोमाच्या डोळ्यांतून निघालेली आसवें पाहिली, आणि तो सुतसोमाला म्हणाला “हें तूं सुज्ञ माणसाला न शोभण्यासारखें कृत्य करीत आहेस, सत्पुरुष कोणताहि प्रसंग आला असता शोक करीत नाहीत. तुलादेखील आम्ही लहानपणी धैर्यशाली समजत होतो. पण या प्रसंगी तू शोकाने व्याकुल झालेला दिसतोस! तुझ्या आप्तवर्गाची किंवा पुत्रदारांची आठवण झाल्यामुळे तुला शोक झाला आहे काय?”

बोधिसत्व म्हणाला “मी माझ्यासाठी, माझ्या बायकोमुलांसाठी, किंवा ज्ञातिवर्गासाठी शोक करीत नाही; परंतु एका ब्राह्मणाला त्याचे श्लोक ऐकून घेईन असे वचन देऊन मी स्नानाला आलो, ते वचन माझ्याकडून पाळले गेले नाही, याबद्दल मला अत्यंत खेद होत, आहे. जर तू मला सोडून देशील, तर ब्राह्मणाचे श्लोक ऐकून व त्याला योग्य बिदागी देऊन मी परत येईन.”

नरभक्षक म्हणाला “असल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याइतका मी मूर्ख नाही! मृत्युमुखांतून सुटून सुखरूप जागी पोहोचलेला मनुष्य पुन: राजीखुषीनें आपल्या शत्रूच्या ताब्यांत जाईल, हे संभवनीय तरी आहे काय? हे कुरुश्रेष्ठ! तूं माझ्या हातून सुटल्याबरोबर आपल्या अंत:पुरांत जाऊन नानात-हेच्या वस्तूंचा उपयोग घेत असतां अत्यंत मधुर आणि प्रिय जीविताचा लाभ झाल्याबद्दल तुला हर्ष होईल आणि मग तूं कसचा बसला आहेस, मजजवळ यावयाला!”

बोधिसत्व म्हणाला “हे नरभक्षक, असत्य भाषणाचें पाप जोडून जगण्यापेक्षा मी मोठ्या आनंदानें मरण पत्करीन. जो केवळ आपलें जीवित रक्षण करण्यासाठी खोटे बोलतो, तो शत्रूपासून यदाकदाचित बचेल, परंतु दुर्गतीपासून कधीहि मुक्त होणार नाही! हे पुरुषाद! चंद्र आणि सूर्य पृथ्वीवर पडतील, आणि सर्व नद्या उगमाकडे वाहू लागतील, परंतु माझ्या तोंडांतून सत्य वचन कधीहि निघणार नाही! एवढें असून तुला जर माझा विश्वास वाटत असला तर या तुझ्या तलवारीची शपथ घेऊन मी असे म्हणतो, की, ब्राह्मणाच्या ऋणांतून मुक्त होऊन मी लवकर तुजपाशी येईन.”

नरभक्षक मोठ्या बुचकळ्यांत पडला. क्षत्रियांनी सहसा करू नये अशा प्रकारची शपथ सुतसोम करीत आहे, तेव्हा त्याला सोडून द्यावें की न द्यावें, याची त्याला पंचाईत पडली. शेवटी त्यानें असा निश्चय केला की, सुतसोम जरी पळून गेला, तरी हरकत नाही. एकदां याची परीक्षा तरी पहावी. नंतर तो सुतसोमाला म्हणाला “सुतसोम! क्षत्रियांनी सहसा घेऊं नये अशा प्रकारची तलवारीची शपथ तूं घेतली हे, म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला सोडून देत आहे. ब्राह्मणाची रवानगी करून तूं परत येशीलच. तुझ्यावाचून माझा यज्ञ पुरा होणार नाही, हे लक्षांत ठेव.”

सुतसोम नरभक्षकाच्या हातून सुटल्यावर थेट आपल्या वाड्यात गेला. त्याला पाहून सर्व लोकांना आनंद झाला. राजपुत्र मोठ्या शहाणपणाने नरभक्षाकाच्या हातून सुटला, असे जो तो म्हणून लागला. परंतु बोधिसत्वाने आपल्या परिजनांच्या म्हणण्याकडे विशेष लक्ष्य न देता प्रथमत: श्लोक घेऊन आलेल्या ब्राह्मणाची चौकशी केली. व त्याला ताबतोब बोलावून आणून त्याचे श्लोक म्हणून दाखविण्यास सांगितलें.

ब्राह्मण म्हणाला “महाराज, माझे हे श्लोक कश्यप बुद्धाच्या तोंडून निघाले आहेत, तेव्हां तूं यांचे सादर श्रवण कर.
(१) घडे सज्जन संगती एकवर,
तरी तारिल ती मानवास पार;
दुर्जनाची संगती सर्वकाळ,
नये कामा ती आलियास वेळ.

(२) राहिं साधूंच्या सदा संगतीतंत,
करीं मैत्री सज्जनीं मानिं प्रीत;
धर्म साधूंचा जाणुनियां स्पष्ट,
सौख्य पावे नर, दु:ख होइ नष्ट.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel