दोनतीन तास उत्सवांत गुंतल्यानंतर एका दाईला सिद्धार्थाची आठवण झाली. ती धांवतधांवत त्या जंबुवृक्षांकडे येऊन पहातें, तो सिद्धार्थ ध्यानस्थ बसलेला तिच्या पहाण्यांत आला. माध्यान्हसमय होऊन गेल्यामुळे इतर वृक्षांची छाया पूर्वेकडे फिरली होती, परंतु त्या वृक्षाची छाया जशीच्या तशी निश्चय होती. ते आश्चर्य पाहून दाई धावतधांवत शुद्धोदनराजापाशी गेली आणि तिने राजाला ते वर्तमान सांगितले. राजा आपल्या अमात्यासह ताबडतोब त्या ठिकाणी आला, आणि आश्चर्य पाहून विस्मित झाला. असित ऋषीनें केलेले भविष्य खरें होणार आहे, अशी त्याला बळकट शंका उत्पन्न झाली. सिद्धार्थ ध्यानातून उठल्यावर शुद्धोदनानें त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले.

उत्सव आटपून शुद्धोदन आपल्या राजवाड्यांत आल्याबरोबर ज्या सात ब्राह्मणांनी, सिद्धार्थ चक्रवर्ती किंवा बुद्ध होणार, असे द्विधा भविष्य कथन केले होते, त्यांना बोलावून आणून तो म्हणाला “ब्राह्मणहो! माझ्या मुलाची आतापासूनच ध्यानधारणेकडे प्रवृत्ति दिसत आहे. परंतु योगमार्ग सोडून देऊन त्याने चक्रवर्ती राजा व्हावें, अशी माझी फार इच्छा आहे.”

ब्राह्मण म्हणाले “महाराज, सिद्धार्थासमोर वृद्ध, व्याधित आणि मृत मनुष्य आले, तर त्याच्या दर्शनानें त्याला वैराग्य उत्पन्न होईल, आणि तो गृहत्याग करील. तेव्हा अशी माणसें त्याच्यासमोर कदापि येऊ नयेत, असा बंदोबस्त करा.”

शुद्धोदनानें ब्राह्मणांच्या सांगण्याप्रमाणे सिद्धार्थाला रहण्यासाठी तीन मोठमोठालें प्रामाद बांधिले. यातील एक पावसाळ्यात रहाण्यासाठी सोयीस्कर पडावा असा बांधला होता. दुसरा हिवाळ्यासाठी व तिसरा उन्हाळ्यासाठी होता. सिद्धार्थाचे सर्व सोबती तरुण व सशक्त होते. कोणी आजारी पडला तर त्याला तेथून ताबडतोब दुसरीकडें नेण्यांत येत असे. या वाड्यांत सिद्धार्थचें मन रमविण्यासाठी पुष्कळ नृत्यंगना ठेवण्यांत आल्या होत्या. त्या निरनिराळी वाद्ये वाजवून व नृत्य करून सिद्धार्थाला रंजवीत असत.

सिद्धार्थ युद्धकलेचा अभ्यास न करिता केवळ चैनींमध्ये दिवस घालवीत आहे; राज्यावर संकट आलें असता हा शत्रूचा पराभव कसा करणार, असें जो तो म्हणू लागला. शुद्धोदनराजाच्या कानांवर ही बातमी आली, तेव्हा सिद्धार्थाला बोलावून तो त्याला म्हणाला “कुमार, तूं युद्धकला न शिकता आळसांत दिवस घालवितोस, असा आमच्या आप्तवर्गाचा तुझ्यावर आरोप आहे. तेव्हा केवळ नाचतमाशांत दिवस न घालविता राजपुत्राला अनुरूप अशा कलांचाहि तूं अभ्यास केला पहिजें.”

सिद्धार्थ म्हणाला “महाराज, आपण आपल्या राज्यांतील सर्व युद्धकला निष्णात योद्ध्यांना एकत्र जमवा. मी त्यांच्यासमोर माझें धनुर्विद्यानैपुण्य दाखवूं इच्छीत आहें. आजपर्यंत मी आळसांत दिवस घालविले किंवा काही अभ्यास केला, याची परीक्षा याच समयी होणार आहे.”

शुद्धोदनराजानें युवराज अमुक दिवशी आपले धनुर्विद्याकौशल्य दाखविणार आहे; तेव्हा त्या दिवशी जे या कलेमध्ये निष्णात असतील, त्यांनी राजाच्या उद्यानांत एकत्र जमावें, असे जाहीर केले. त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी मोठमोठालें योद्धे सिद्धार्थाचें कौशल्य पहाण्यासाठी दूरदूरच्या गावांहून कपिलवस्तूला आले. सिद्धार्थानें त्या सर्वांसमोर आपले कौशल्य दाखविले. ते पाहून त्यांना इतके आश्चर्य वाटले, की, युवराजाने एवढ्या अल्पावकाशांत युद्धकलेची सर्व अंगे आपलीशी करून घेतली कशी!
ते राजाला म्हणाले “महाराज, युवराज अद्वितीय आहेत! आम्ही आज धनुर्विद्येचा इतकी वर्षे अभ्यास करीत आहों, परंतु याच्याइतकें पटुत्व आम्हाला साधलें नाही! यांनी एवढ्या अल्पवयांत एवढें नैपुण्य कसें संपादिलें याचें आम्हाला मोठे आश्चर्य वाटते!”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel