उपक म्हणाला “पण तूं अर्हन जाला आहेस कय? तुला जिन म्हणता येईल काय?”

बुद्ध म्हणाला “होय, मी सर्व पापकारक मनोवृत्तीना जिंकले आहे, म्हणून हे उपक! मी जिन आहे.”

हे बुद्धाचें भाषण ऐकून उपक ‘असेलहि कदाचित’ असे म्हणाला; आणि मान हलवीत आडरस्त्यानें तेथून निघून गेला.
बुद्ध हळूहळू प्रवास करीतकरीत ऋषिपतनाला आला. त्याला पाहून त्या पांच तपस्व्यांनी आपसांमध्ये असा बेत केला की, “हा योगभ्रष्ट श्रमण येत आहे. तो आमच्या आश्रमांत आला, तर त्याचा आम्ही कोणत्याहि रीतीनें आदरसत्कार करूं नयें. पण तेथे एक आसन मांडू ठेवावे. त्याची इच्छा असेल, तर तो त्यावर बसेल.” परंतु बुद्ध जेव्हा आश्रमाच्या दाराशी आला, तेव्हा त्यांचा बेत आपोआप ढासळला. त्यातील एकजणाने बुद्धाचे पात्र व चीवर (कंथा) ग्रहण केले, दुसर्‍याने आसन सज्ज् केले; इतरांनी पाय धुण्यासाठी पाणी वगैरे आणून ठेविले. बुद्ध पाय धुऊन त्याच्यासाठी मांडलेल्या आसनावर बसला. त्या तपस्व्यांनी त्याला सिद्धार्थ याच नावाने हाक मरून त्याचा कुशल समाचार विचारला.

तेव्हा बुद्ध म्हणाला “भिक्षुहो! मला तुम्ही पूर्वीच्या नावानें हाक मारू नका! मी अर्हन. तथागदत आणि सम्यकसंबुद्ध या नामाभिधानाला योग्य झालो आहे. भिक्षुहो! माझा धर्म लक्ष्यपूर्वक ऐका. जर माझ्या या अमृततुल्य धर्माचे तुम्ही एकाग्रतेने मनन ऐकून मी सांगतो त्या रीतीने वागाल, तर याचे रहस्य समजून तुमच्या ब्रह्मचर्याचे सार्थक होईल.”

तपस्वी म्हणाले “हे गौतम! आम्ही जेव्हा तुजपाशी होतो, तेव्हा तीव्रतपश्चर्येने देखील तुला मोक्षमार्गाचे ज्ञान झाले नाही. आता तर तूं योगभ्रष्ट झाला आहेस! तपश्चर्येचा त्याग करून जो तू पोटाच्या मागे लागलास, त्या तुला अमृततुल्य धर्माचे ज्ञान होईल कसे?”

बुद्ध म्हणाला “भिक्षुहो! यापूर्वी मी अशा प्रकारचे उद्गार कधीही काढले होते काय?”

‘नाही’, असे तपस्वांनी उत्तर दिले.

“तर मग मी जे काही सांगत आहे, त्याजवर तुमचा विश्वास बसला पाहिजे. तुम्ही एकवार अवधान देऊन माझा उपदेश ऐकून घ्या. या धर्माप्रमाणे जर तुम्ही वागाल, तर तुमच्या ब्रह्मचर्याचे सार्थक होईल!”

हळुहळू त्या पांच तपस्व्यांचा विश्वास बुद्धाच्या म्हणण्यावर जडला व ते त्याचा धर्मोपदेश ऐकावयाला तयार झाले.

तेव्हां बुद्ध त्यांनां म्हणाला ‘’भिक्षुहो¡ कामोपभोगामध्ये सुख मानणें हा एक अंत आहे. पण हा हीन, ग्राम्य, अज्ञजनसेवित, अनार्य, आणि अनर्थावह आहे. देहदंडन करणें हा दुसरा अंत आहे. हा देखील दु:खकारक, अनार्य आणि अनर्थावह आहे. तपस्व्यानें या दोन अंतांचें सेवन करूं नये. तथागताने या दोन अंतांच्या मधला मार्ग शोधून काढला आहे.
“भिक्षुहो¡ जन्म, जरा, व्याधि, मरण, अप्रिय वस्तूचा समागम, आणि प्रिय वस्तूचा वियोग इत्यादि गोष्टींमुळे मनुष्याला इहलोकीं दु:ख होते. हें जें रावापासून रंकापर्यंत सर्वसाधारण दु:ख, त्याला मी दु:ख नावाचे पहिले आर्यसत्य म्हणतों.”

“या सर्व दु:खांचा उगम तृष्णेमध्यें होत असतो. इहलोकींच्या उपभोगांची तृष्णा, स्वर्गलोकीं उत्पन्न होण्याची तृष्णा, आणि यथेच्छ सुख भोगून आत्महत्या करून जगांतून नाहींसे होऊन जाण्याची तृष्णा, या तीन तृष्णांमुळें मनुष्यप्राणी अनेक पापें आचरतो; आणि दु:ख-भागी होतो. ह्राणून तृष्णेला दु:खाचें मूळ समजलें पाहिजे. या दुसर्‍या सिद्धांताला मी दु:खसमुदय आर्यसत्य असें ह्राणतों.

“तृष्णेचा निरोध केला, तरच निर्वाणाचा लाभ होईल. देहदंडनानें किंवा कामोपभोगानें मोक्षप्राप्ति होणार नाही, हा तिसरा सिद्धांत होय. याला मी दु:खनिरोध आर्यसत्य असें म्हणतों.”

“सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त (कर्म), सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति, आणि सम्यक् समाधि, हा तो मीं नवीन शोधून काढिलेला मधला मार्ग होय. दु:खाचा निरोध याच मार्गानें होणार आहे. व्रतें आणि उपोषणें करून दु:खाचा निरोध व्हावयाचा नाही. हा चौथा सिद्धांत होय. याला मी दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा आर्यसत्य असें म्हणतों.

“या चार आर्यसत्यांचे आणि तदंतर्गत आर्यअष्टांगिक मार्गाचें ज्ञान झाल्यामुळेंच मी सम्यक् सबुद्ध या पदाला पोहोचलों आहें.”

त्या पांच ब्राह्मण तपसव्यांपैकीं कौंडिन्य ब्राह्मणाला प्रथमत: बुद्धाच्या धर्मोपदेशाचें रहस्य समजलें, म्हणून त्याला आज्ञात कौंडिन्य (जाणणारा कौंडिन्य) असें टोपण नांव पडलें. अनुक्रमें इतरांनांहि धर्मबोध होऊन ते पांचीह तपस्वी अर्हंत झाले; व आपल्याला बौद्धधर्माची दीक्षा देण्यासाठीं तथागताला त्यांनीं विनंति केली.

तेव्हां बुद्ध म्हणाला “भिक्षुहो! या माझ्या धर्माचा अंगिकार करा, व ब्रह्मचर्येचें पालन करून भवदु:खाचा अंत करा!”

हे बुद्धानें उच्चारलेले शब्दच त्या पांच तपस्व्यांचा प्रव्रज्याविधि झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel