[४]
चुल्लबोधिजातक.


अतीत कालाच्या ठायीं काशीराष्ट्रामध्यें बोधिसत्व एका ब्राह्मणकुलांत जन्मला. चुल्लबोधि असें त्याचें नामकरण करण्यांत आलें. बोधिसत्व लहानपणापासूनच विरक्त होता, तथापि आईबापांच्या आग्रहास्तव त्यानें लग्न केलें. त्याची पत्नीदेखील अत्यंत सुशील होती. जरी त्यांचें लग्न झालें होतें, तरी त्यांनीं आपल्या ब्रह्मचर्याचा भंग होऊं दिला नाहीं. पुढें जेव्हां बोधिसत्वाचे आईबाप निवर्तले, तेव्हां तो आपल्या प्रिय पत्नीला म्हणाला "भद्रे, आमच्या पूर्वजांची ही अपार संपत्ति तूं घे, व दानादि पुण्यकर्मे करून या घरामध्यें सुखानें कालक्रमणा कर. मला गृहस्थाश्रमाचा वीट आला आहे. मी परिव्राजकवेषानें हिमालयावर वास करूं इच्छीत आहें."

त्याची पत्नी म्हणाली "आर्यपुत्र! पुरुषांनींच प्रव्रज्या वेष धारण करावा, स्त्रियांनीं करूं नये, असा नियम आहे काय?"

बोधिसत्व म्हणाला "असा कांहीं नियम नाहीं. तथापि तूं थोर कुलामध्यें जन्मलेली सुकुमार स्त्री आहेस; तुझ्यानें अरण्यवासाचीं दु:खें सहन करवणार नाहींत. म्हणून मी म्हणतों, कीं, तूं या घरामध्येंच राहून दानादि पुण्यकर्मे करावीं."

बोधिसत्वानें आपल्या भार्येला आपल्याबरोबर न येण्याविषयीं पुष्कळ आग्रह केला, परंतु त्या सत्त्वशील स्त्रीनें भावी दु:खाला न जुमानता तापसवेष स्वीकारून आपल्या पतीचा मार्ग धरला. तीं दोघें हिमालयपर्वतावर जाऊन कांहीं काळ राहिलीं. त्या काळीं तापस लोकांचा असा एक परिपाठ असे, कीं, कांहीं काळ फलमूलांचें भक्षण करून अरण्यांत वास केल्यावर ते खारट आणि आंबट पदार्थांचें सेवन करण्यासाठी लोकवस्तीच्या ठिकाणीं येत असत, व कांहीं काळ त्या पदार्थांचें सेवन करून पुन: अरण्यांत प्रवेश करीत. या वहिवाटीला अनुसरून बोधिसत्व एकदां आपल्या भार्येसह काशीराष्ट्रामध्यें संचार करीत होता. तो फिरतफिरत वाराणसी नगराला आला. तेथें बोधिसत्व राजाच्या एका उद्यानामध्यें राहिला.

एके दिवशीं राजा उद्यानक्रीडेसाठी तेथें आला असतां त्यानें एका वृक्षाखालीं बोधिसत्वाला व जवळच दुसर्‍या एका वृक्षाखालीं त्याच्या पत्नीला पाहिलें. तिचें सुंदर रूप पाहून राजा मोहित झाला, आणि बोधिसत्वाजवळ येऊन म्हणाला "भो तापस! या स्त्रीचें आणि तुझें नातें काय आहे?"

बोधिसत्व म्हणाला "ही माझी धर्मपत्नी आहे."

राजा म्हणाला "काय हो हा वेडेपणा! तुम्ही तुमच्या या सुस्वरूप भार्येला बरोबर घेऊन फिरत आहां, याला काय म्हणावें! अहो समजा, यदाकदाचित् तुम्हाला जर कोणी शत्रु उद्भवला, तर तुम्ही काय करणार? तुम्ही पडलां तपस्वी; तुमच्याकडून तुमच्या शत्रूचा प्रतिकार होईल काय?"
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel