[११]
बोध्यंगांची भावना


बुद्धगुरू श्रावस्तीमध्यें रहात असतां भिक्षूंनां उद्देशून म्हणाला “भिक्षुहो, ज्या वेळीं चित्त जड झालेलें असतें, त्या वेळीं प्रश्नब्धि, समाधि आणि उपेक्षा या तीन बोधंगांची भावना करणें योग्य होणार नाहीं. एकाद्या माणसाला आग पेटवावयाची असेल आणि तो जर ओली लांकडें, गोंवर्‍या व ओलें गवत घालून आग फुंकू लागला, तर ती पेटेल काय? त्याचप्रमाणें ज्यांचे चित्त जड झालें असेल, तो जर प्रश्नब्धि, समाधि आणि उपेक्षा या तीन संबोघ्यंगांची भावना करूं लागला, तर त्याच्या चित्ताला उत्तेजन मिळणार नाहीं. आधींच चित्त जड झालेलें असतें, व तें या तीन बोध्यंगांच्या योगें आवरतां येणें शक्य नसते. पण त्या वेळी धर्मप्रविचय, वीर्य, आणि प्रीति या तीन संबोध्यंगांची भावना फारच उपयोगी आहे. कांकी, यांमुळे जड झालेल्या चित्ताला उत्तेजन मिळते. एकाद्या माणसाला आग पेटवावयाची असेल, व जर त्यानें सुकी लांकडें, गोवर्‍या व सुकें गवत घालून तें पेटविण्याचा प्रयत्न केला, तर ती पेटण्यास विलंब लागणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांचे चित्त जड झालें असेल, त्यानें धर्मप्रविचय, वीर्य आणि प्रीति या तीन संबोघ्यंगांची भावना केली तर त्यांचे जाड्य निघून जाऊन त्याच्या चित्ताला उत्तेजन मिळाल्यावाचून रहाणार नाहीं.

“पण भिक्षुहो! ज्या वेळी चित्त भ्रांत झालें असेल, त्या वेळीं धर्मप्रविचय, वीर्य आणि प्रीति, या तीन संबोध्यंगांची भावना करणें योग्य नाहीं. कांकी, यांच्या भावनेमुळे चित्ताच्या भ्रांततेचा उपशम न होता, तें विशेष भ्रांत होईल. एकाद्या माणसाला पेटलेली आग विझवावयाची असली, व ती विझविण्यासाठीं जर त्यानें वाळलेल्या लांकडांचा, गोवर्‍यांचा आणि गवताचा उपयोग केला, तर ती आग न विझतां अधिकच भडकेल. त्याप्रमाणें ज्याचें चित्त भ्रांत झालें असेल, त्यानें धर्मप्रविचय, वीर्य आणि प्रीति, या तीन संबोध्यंगांची भावना केली असतां तें प्रशांत न होतां अधिकच भडकेल. अशा वेळीं प्रश्रब्धि, समाधि आणि उपेक्षा, या तीन संबोध्यंगांची भावना करणें योग्य आहे. कांकीं, या बोध्यंगांमुळें भडकलेलें चित्त प्रशांत होत असतें. एकाद्या माणसाला पेटलेली आग कमी करावयाची असेल व त्यानें जर ओलीं लांकडें, ओल्या गोंवर्‍या व ओलें गवत यांचा उपयोग केला, तर ती खात्रीनें कमी होईल. त्याचप्रमाणें ज्याचें चित्त भडकलें असेल, त्यानें जर प्रश्रब्धि, समाधि आणि उपेक्षा, या तीन संबोध्यंगांची भावना केली, तर तें खात्रीनें प्रशांत होईल.

"आतां राहिलें स्मृतिसंबोध्यंग. भिक्षुहो, या संबोध्यगांचा आपण सर्वत्र उपयोग केला पाहिजे."

[१२]
सत्कर्माचें प्रत्यक्ष फळ


दुसर्‍या एका प्रसंगीं शालाग्रामांतील ब्राह्मणांनां उद्देशून बुद्धगुरू म्हणाला "गृहस्थहो, कांहीं श्रमणब्राह्मण दान नाहीं, धर्म नाहीं, सत्कर्माचें किंवा कुकर्माचें फळ नाहीं, आई नाहीं आणि बाप नाहीं, नरकाला जाणारा कोणी नाहीं किंवा स्वर्गाला जाणारा कोणी नाहीं, असें म्हणणारे आहेत. पण याच्या उलट दुसरे श्रमणब्राह्मण असें म्हणतात, कीं, दानधर्म आहे, दानधर्माचें फळ आहे, सत्कर्माचें आणि असत्कर्माचेंहि फळ आहे, आई आहे, बाप आहे, नरक आहे आणि स्वर्ग आहे.

"गृहस्थहो, जे श्रमणब्राह्मण नास्तिकवादी असतात, त्यांजकडून कायावाचामनें पापकर्मे घडावीं हें साहजिक आहे; परंतु जे आस्तिक असतात, त्यांना पापकर्माचें भय असावें, व पुण्यकर्माकडे त्यांची प्रवृत्ति व्हावी, हेंहि साहजिक आहे. आतां येथें एकादा सुज्ञ मनुष्य असा विचार करितो, कीं, जर नास्तिकाच्या म्हणण्याप्रमाणें परलोक नसेल, तर मरणानंतर प्राण्याला दु:खाची भीति नाहीं; परंतु जर परलोक असेल, आणि तो नाहीं असें गृहीत धरून प्राण्यानें इहलोकी अधर्माचरण केलें असेल, तर परलोकीं त्याची काय गति होईल? त्याला दुर्गतीलाच जावें लागणार नाहीं काय?  आतां परलोक नाहीं असें गृहीत धरिलें, तर धार्मिक आचरणापासून मरणोत्तर कोणतेंहि दु:ख होण्यासारखें नाहीं; एवढेंच नव्हे, तर एकाद्या वाईट मनुष्याप्रमाणें धर्माचरण करणार्‍या गृहस्थाची इहलोकीं अपकीर्ति होत नाहीं. सुज्ञ लोकांनां तो प्रशंसनीय होत असतो.

"गृहस्थहो, दुसरे कांहीं श्रमणब्राह्मण अक्रियावादी आहेत; ते कोणत्याहि क्रियेचें मनुष्याला फल भोगावें लागत नाहीं असें प्रतिपादन करितात. मनुष्यानें हजारों प्राण्यांनां ठार मारिलें, किंवा परद्रव्याचा अपहार केला, तरी त्यापासून त्याच्या आत्म्यावर कांहींच परिणाम होत नसतो, असें या श्रमणब्राह्मणांचें मत आहे. परंतु दुसरे श्रमणब्राह्मण प्रत्येक पापकर्माचा मनुष्यावर परिणाम घडतो, असें म्हणणारे आहेत, गृहस्थहो, या दोन पंथांच्या श्रमणब्राह्मणांचीं मतें परस्परविरोधि नाहींत काय?"

"होय भदंत," ब्राह्मणांनी उत्तर दिलें.

बुद्ध म्हणाला "गृहस्थहो, अशा समयीं शहाणा मनुष्य असा विचार करितो, कीं, जर क्रियेचा परिणाम आत्म्यावर घडत नसला, तर आत्मा परलोकीं सुखी होईल हें ठीक आहे; पण जर आत्म्यावर क्रियेचा परिणाम घडत असला, तर दुराचरणामुळें तो दुर्गतीलाच जाईल! बरें, आत्म्यावर क्रियेचा परिणाम घडत नाहीं, असें जरी गृहीत धरलें, तरी सदाचरणापासून कांहींच नुकसान होण्यासारखें नाहीं. सदाचारी माणसाची सुज्ञ लोक प्रशंसाच करितात.

"गृहस्थहो, दुसरे कांहीं श्रमण ब्राह्मण अहेतुवादी आहेत; मोक्षाला कोणतींहि कर्मे कारण होत नाहींत, अमुक एक योनींतून प्राणी गेला म्हणजे तो आपोआप मोक्षाला जातो, त्याला मोक्ष मिळविण्यासाठी खटपट करावी लागत नाहीं, असें त्यांचें मत आहे. परंतु दुसरे श्रमणब्राह्मण मोक्ष सहेतुक आहे असें म्हणणारे आहेत. स्वत:च्या प्रयत्नानें मोक्ष मिळवितां येतो असें त्यांचें मत आहे. गृहस्थहो, या दोन पंथांच्या श्रमणब्राह्मणांचीं मतें परस्परविरोधि नाहींत काय?"

"होय भदंत. या श्रमणब्राह्मणांचीं मतें परस्परविरोधि आहेत." असें शालाग्रामवासी ब्राह्मणांनीं उत्तर दिलें.

बुद्ध म्हणाला "गृहस्थहो, शहाणा माणूस असा विचार करितो, कीं, अमक्यातमक्या योनींत दु:ख भोगल्यावांचून केवळ सदाचरणामुळें मोक्ष मिळणार नाहीं, ही गोष्ट जर खरी असली, तर इहलोकीं धार्मिक आचरणापासून कोणतेंहि नुकसान होण्यासारखें नाहीं. उलट सुज्ञ लोकांत आपली प्रशंसाच होणार आहे. आणि जर प्रयत्नांपासून सुगति प्राप्त होत असली, तर माझा सत्कर्माविषयीं उत्साह मला फारच उपयोगीं पडेल."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel