यावर दुसरा म्हणाला “चल-आतांच्या आतांच आपण मघाजवळ जाऊं. तो या वेळीं कांहींतरी लोकसेवेचें कृत्य करीत असेल.”

याप्रमाणे संभाषण झाल्यावर ते दोघे तरुण, मघ एके ठिकाणीं काम करीत होता तेथें गेले, आणि मघाला म्हणाले “आजपर्यंत आम्हीं तुझी उपेक्षा केली, याजबद्दल आम्हांला अत्यंत दु:ख होत आहे. अभाग्याला आपल्या घरीं असलेला ठेवा जसा माहीत नसावा, तसेच तुझे सद्गुण तूं आमच्याजवळ असतांना देखील आम्हांला माहीत झाले नाहींत. आजपासून आम्ही तुझे शिष्य होऊन तुझें अनुकरण करून सत्कृत्यांत काल घालविण्याचा निश्चय केला आहे.”

मघ म्हणाला “मित्रांनों! सदाचरणानें कालाचा सद्व्यय करण्याची तुमची मनीषा वाखाणण्याजोगी आहे, परंतु यासाठीं तुम्ही माझें शिष्यत्व पत्करण्याची आवश्यकता नाहीं. माझ्यासारखे मर्त्य नाशवंत आहेत, हें तुम्ही जाणतच आहां. तेव्हां अशा क्षणभंगुर प्राण्याचें शिष्यत्व न पत्करितां आपण सर्वांनीं धर्मांचें शिष्यत्व पत्करावें, हें बरे. कारण धर्म शाश्वत आहे; तो अनादि आहे; त्याला आपल्यापासून कोणीहि दूर करूं शकत नाहीं.”

ते तरुण म्हणाले “पण धर्माधर्माचें ज्ञान आपल्यासारख्या संतांवांचून आमच्यासारख्या अज्ञजनांनां व्हावें कसें?”

मघ म्हणाला “धर्म गंभीर आहे. त्याचें सर्वस्वीं ज्ञान होणें आमच्यासारख्या प्रापंचिक जनांला शक्य नाहीं. तथापि एक गोष्ट खरी आहे, कीं, त्या धर्माची उभारणी शीलाच्या पायावर झाली आहे. अर्थात् शीलावांचून धर्मप्राप्ति होणार नाहीं.”

तरुण म्हणाले “शील म्हणजे काय?”

“कुमार्गापासून निवृत्ति व सत्कर्मामध्यें प्रवृत्ति याला साधुलोक शील म्हणतात. प्राण्याचा घात न करणें, चोरी न करणें, व्यभिचार न करणें, असत्य भाषण न करणें, आणि मादक पदार्थांचें सेवन न करणें, हे पांच नियम एकनिष्ठेनें पाळले असतां आम्ही कुकर्मापासून मुक्त होऊं, व परोपकारादि सत्कृत्यांमध्यें आमच्या कालाचा उपयोग आम्हांला करतां येईल.”

तरुण म्हणाले “आजपासून हे पांच नियम आम्ही मोठ्या श्रद्धेनें पाळूं, व गृहकृत्यें करून राहिलेला काळ सत्कर्मांत घालवूं.”

अशा रीतीनें हळुहळु मघाला तीस अनुयायी मिळाले. त्या सर्वांनी मिळून रोगी लोकांसाठी व अनाथअपंग लोकांसाठीं एक धर्मशाळा स्थापन केली, आसपासच्या गांवचे रस्ते साफ केले, लहानसान पूल बांधले, तलाव खोदले आणि अशींच इतर लोकोपयोगाचीं कामें केलीं. याशिवाय ते आपल्या परगण्यातील लोकांनां पंचशीलाचा उपदेश करीत असत. या त्यांच्या कृत्यांचा सगळ्या परगण्यावर असा परिणाम झाला, कीं, तेथील लोक कांहीं अपवाद खेरीजकरून सदाचारी बनले. दारूच्या पिठेवाल्यांनां आपलीं दुकानें बंद करावीं लागलीं, व तेथल्या ग्रामभोजकाला (न्याय आणि वसुलीकामगाराला) दंडाच्या रूपानें बरीच मोठी प्राप्ति होत असे, ती होईनाशी झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel