जीवनाचे तत्त्वज्ञान
एका अमेरिकन प्रकाशकाने सहासात वर्षांपूर्वी 'माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान' या विषयावर मला एक लेख लिहायची विनंती केली होती. अशा प्रकारचे लेख जमवून त्यांचा तो एक संग्रह प्रसिध्द करणार होता. ती कल्पना मला आकर्षक वाटली. परंतु मला धीर होईना. मी जसजसा अधिक विचार करू लागलो तसतसा लिहिण्याचा बेत दूर होत चालला आणि शेवटी माझ्या हातून तो लेख लिहिला गेला नाही.
जीवनासंबंधीचे माझे काय तत्त्वज्ञान होते ? काही वर्षापूर्वी लिहायला मी संकोच केला नसता; पुढेमागे करीत बसलो नसतो. त्या वेळेस माझ्या विचारसरणीचे स्वरूप निश्चित होते, निश्चित असे उद्देश माझ्यासमोर होते, परंतु आज ही निश्चितता, नि:शंकता निघून गेली आहे. भविष्यकाळासंबंधीची निश्चित अशी कल्पना माझ्या मनात होती, परंतु हिंदुस्थान, चीन, युरोप आणि सर्व जगातच गेल्या काही वर्षांत ज्या घडामोडी झाल्या त्याने मी गोंधळून गेलो आहे. सर्वत्र उलथापालथी होत आहेत, सर्वत्र अस्वस्थता आहे. त्यामुळे पुढचे स्वच्छ असे काहीच दिसत नाही. सारा भविष्यकाळ अस्पष्ट छायामय असा वाटतो.
अर्थात जीवनाचे तत्त्वज्ञान अशासारख्या मूलग्राही प्रश्नावरच्या या शंका किंवा अडचणी यामुळे चालू कामापुरते तूर्त काम करावयाचे म्हणून शंका घेऊन मी कधी स्वस्थ बसलो नाही. पण जे करावे त्यात तडफ कमीच. माझ्या तारुण्यात धनुष्यापासून निघालेल्या बाणाप्रमाणे मी सरळ माझ्या लक्ष्याकडे सणाणून जात असे. त्याशिवाय मला दुसरे काहीही दिसत नसे. पण पुढे पुढे ही एकमार्गी वृत्ती सुटली, तरीही मी काम करीतच राहिलो. कारण कर्मप्रेरणा तर होती आणी माझी जी ध्येये त्यांच्याशी माझ्या या कर्मप्रेरणेचा खरा व काल्पनिक संबंध आहे ही भावनाही मनात होती. परंतु मला दिसायला लागले होते की, राजकारणाचा मला वीटच येत चालला होता. जीवनाकडे बघण्याच्या माझ्या एकंदर दृष्टीतच हळूहळू परंतु मोठा बदल होत होता.
पूर्वीची ध्येये, पूर्वीचे साध्य तेच कायम राहिले, परंतु त्यांच्या भोवतालचे तेजोवलय जरा कमी झालेले वाटे, आणि जसजसे त्यांच्या अधिक जवळ जावे तसतशी ती अधिकच फिक्की दिसू लागत. त्यांचे तेज, त्यांचे सौंदर्य कमी होई. ज्यामुळे त्यांच्याकडे जायला मन आनंदित होत असे, शरीरास चैतन्य आल्यासारखे होते असे ते सारे नाहीसे झाल्यासारखे वाटे. खोट्याचा बोलबाला तर होतच होता, पण त्यापेक्षा वाईट हे की जे सत्य मानीत आलो त्याचेही तोंड फिरलेले, भेसूर दिसे. मनुष्याची हल्ली असलेली भोगलालसा, हिंसा, प्रतारणा यांनी भारलेली पशुवृत्ती जाऊन मानवजात विवेकाने वागण्याच्या उच्च पातळीवर पोचायला शिकत असताना दु:ख व संकटाच्या अनुभवाची युगेच्या युगे अद्यापिही लागावी इतका मनुष्यस्वभाव वाईट आहे का ? आणि ह्या अवधीत मनुष्यस्वभाव एकदम पालटून टाकण्याचे चाललेले सर्व प्रयत्न फुकट जावे असा योगायोग तर नव्हे ?
साध्य व साधने यांची एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रिया होता होता अशी गुंतागुंत तर नाही ना होत की ज्यामुळे वाईट साधनांमुळे साध्याचा अगदी विचका व्हावा, क्वचित वेळी साध्याचा नाशही व्हावा. परंतु मनुष्य हा स्वभावाने दुबळा आहे, स्वार्थी आहे. योग्य साधने वापरणे त्याच्या शक्तीपलीकडचे असणेही शक्य आहे, तर मग करायचे तरी काय ? काही न करता स्वस्थ बसणे म्हणजे आपले काही चालत नाही असे मानून आसुरी वृत्तीला शरण जाणे असे होऊ लागले. काही करू म्हटले तर त्या आसुरी वृत्तीच्या एखाद्या रूपाशी काही तडजोड करावी लागे व त्याचे व्हायचे ते सर्व वाईट परिणाम हात.
जीवनातील प्रश्नांकडे बघण्याची माझी वृत्ती प्रथम प्रथम शास्त्रीय होती. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील आरंभीच्या काळातील शास्त्रांनीं निर्माण केलेला सहजसोपा आशावाद मला पटत होता. सुखी, सुसंरक्षित असे जीवन, आणि माझा नैसर्गिक उत्साह नि आत्मविश्वास, यामुळे आशावादीपणाची ती भावना बळावतच गेली. एक प्रकारचा निर्विकल्प, अंधुक असा मानवतावाद मला आवडे.
धर्माचे जे आचारात स्वरूप दिसे तसा विचारांनीसुध्दा स्वीकारलेला धर्म, मग तो हिंदू, मुसलमान, बुध्द, ख्रिस्त वा कोणताही असो मला त्याची ओढ कधीच लागली नाही. धर्म म्हणजे भोळसट रूढी व हटवादी अंधश्रध्दा यांचा निकटचा संबंध वाटे व नित्य व्यवहारात येणार्या अडचणींविषयी त्या धर्माचा दृष्टिकोण विज्ञानशास्त्राचा नाही असेही वाटत असे. मंत्रतंत्र, अंधश्रध्दा, अद्भुतावर भरवसा ठेवणे हा त्या धर्मातला एक भाग वाटे.
परंतु मनुष्याच्या अंतर्मुख वृत्तीला लागलेल्या कसल्यातरी ओढीचे समाधान धर्माने होत असलेले स्पष्ट दिसे. पृथ्वीवरील कोट्यवधी मानवांचे कोणतातरी धर्म असल्याशिवाय चालत नाही. धर्मामुळेच अति थोर अशा स्त्रीपुरुषांचे आदर्श आपणास लाभले आहेत; त्याचप्रमाणे संकुचित कडव्या वृत्तीचे, दुष्ट व क्रूर असे धर्मांध लोकही लाभले आहेत. धर्मांमुळे जीवनाला, मानवी जीवनाला काही मूल्यमापने दिली आहेत. त्या मूल्यांपैकी काहींचा आज जरी उपयोग नसला, आज जरी ती मूल्ये कदाचित अपायकारकही ठरली तरी, इतर काही मूल्येच आजच्या नैतिक जीवनाचा अधार झाली आहेत.