जगातील आजच्या लोकांत ही प्राणमयी शक्ती मला तिघांतच आढळते. अमेरिकन, रशियन आणि चिनी जनतेत ही शक्ती आहे. या तिघांना एकत्र गोवणे चमत्कारिक वाटेल नाही ? अमेरिकन लोकांची पाळेमुळे जरी जुन्या जगात असली तरी ते नवीन आहेत. जुन्या विधिनिषेधांचे थोतांड त्यांच्याजवळ नाही. जुन्या वंशाचे जुन्याचे ओझे व मनोविकृतीचे विविध गंड त्यांच्या डोक्यावर बसलेले नाहीत. त्यामुळे त्यांची अमर्याद उत्साहशक्ती आपण समजू शकतो. कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन, न्युझीलंडर या सर्वांचीही तीच स्थिती आहे. जुन्या जगापासून त्यांची कधीच फारकत झालेली आहे आणि नवनवीन स्वरूपातील जीवन त्यांच्यासमोर उभे आहे.
रशियन लोक काही नवे नाहीत. परंतु तेथे मरणामुळे जुन्याचा जसा संपूर्ण संबंध तुटतो त्याप्रमाणे क्रांतीमुळे जुन्याशी संबंध पार तुटला आहे. त्यांचा असा काही दुसराच अवतार झाला आहे की त्याला इतिहासात तोड नाही. ते नवयौवनाने नटले आहेत, त्यांची स्फूर्ती, त्यांच्यातील जिवंतपणा आश्चर्यकारक आहेत. ते पुन्हा आज आपली जुनी मुळे शोधून काढू पहात आहेत, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात एक नवीन जनता, नवीनच मानववंश, एक नवीनच संस्कृती म्हणूनच त्यांची गणना होते.
एखादे राष्ट्र पुन्हा कसे सचेतन होऊ शकते, पुन्हा कसे तरुण होऊ शकते हे रशियाच्या उदाहरणावरून दिसून येत आहे. परंतु त्यासाठी भरपूर किंमत देण्याची व बहुजन समाजातील दडपून ठेवलेले शक्तीचे व उत्साहाचे सारे झरे मोकळे करण्याची तयारी हवी. चालू महायुध्दातील भयानक अत्याचारातून जे काही देश जिवंत राहतील त्या देशांना असे नवे तारुण्य मिळण्याचा संभव आहे.
परंतु वर सांगितलेल्या लोकांपेक्षा चिनी जनता अगदी वेगळी आहे. चिनी जनता काही नवी नाही, किंवा क्रांतीच्या प्रक्षोभातून ते गेले नाहीत. रशियासारखी सारी खालपासून वरपर्यंत त्यांची उलथापालथ झाली नाही. सात वर्षांच्या क्रूर युध्दामुळे त्यांच्यात कितीतरी फरक झाला आहे आणि ते होणे अपरिहार्यच होते. हा फरकही युध्दामुळे झाला का ? या युध्दापेक्षाही दीर्घकाल चालू असलेल्या दुसर्या काही कारणांमुळे झाला, किंवा या दोन्ही कारणांमिळून झाला ते सांगता येत नाही. परंतु चीनची जिवंत राहण्याची चिकाटी पाहून मन थक्क होते. असे खंबीर राष्ट्र पार रसातळाला जाईल अशी कल्पनासुध्दा करवत नाही.
चीनमध्ये अशा प्रकारचा चिवट प्राण दिसला, तशाच प्रकारचा भारतीय जनतेतही आहे असे कधी कधी मला वाटते. परंतु ते कधी कधी वाटते एवढेच, कायम खात्री नाही. कारण मला या बाबतीत तिर्हाइतासारखा विचार करता येत नाही. माझ्या मनात देशाबद्दल जी आशा आहे त्यामुळे कदाचित मला नीट विचार करून निष्कर्ष काढता येत नसेल. परंतु भारतीय जनतेत सर्वत्र मिसळत असताना, हिंडताना या चैतन्याच्या शोधात मी असे. माझ्या लोकांत हे चैतन्य असेल तर सारे ठीक होईल, भिण्याचे कारण नाही असे वाटे आणि जर ते नसेल तर आमच्या या घोषणा आणि आमचे हे राजकीय उद्योग केवळ मनाची फसवणूक आहे व तेवढ्यावर आम्ही विशेष काही करू शकणार नाही. कसे तरी माझे राष्ट्र जगावे, आणि यासाठी एखादी राजकीय तडजोड करावी असे माझ्या मनात कधी आले नाही. मला वाटे की हिंदी जनतेत शक्ती, उत्साह, कर्तव्य ह्यांचा प्रचंड संचय आहे, पण तो कोंडलेला आहे. तो मोकळा करून हिंदी जनतेला नवचैतन्य, नवतारुण्य यावे अशी मला तळमळ होती. या जगात अशा ठिकाणी भारत उभा आहे की, तेथे उभे राहून दुय्यम दर्जाचे काम त्याने करणे केवळ अशक्य आहे. भारत पहिल्या दर्जाचे राष्ट्र तरी होईल किंवा अजिबात बाजूला पडेल. या दोन्हींहून वेगळ्या, मधल्या स्थितीला माझे मनच घेत नाही, व अशी मधली स्थिती संभवनीय नाही.