हिंदुस्थानवर युध्दाचा प्रसंग आला, पण त्याबरोबर आम्हाला जी उत्साहाची भरती यावी ती आली नाही, अंतरीच्या भावना चेतून मोठ्या आनंदाने एखाद्या साहसात उडी टाकताना पुढे यातना सोसाव्या लागतील, वेळेवर प्राण देण्याचीही पाळी येईल, असा विचारसुध्दा मनाला शिवत नाही.  देहभान विसरते, स्वातंत्र्यप्राप्ती व त्यानंतरचा रम्य भावी काल यावरच दृष्टी खिळलेली असते, तसे या प्रसंगी घडले नाही, आमच्या डोळ्यांपुढे दिसत होते ते पुढे वाढून ठेवलेले क्लेश व यातना.  आमच्या मनाला जाणीव होत होती ती पुढे जवळ आलेल्या सर्वनाशाची.  या विचारांची आमची संवेदना मात्र अधिक तीव्र होत होती, दु:ख वाढत होते आणि ह्या यातना हा सर्वनाश टाळू म्हटले तर ते करायला मदतसुध्दा आम्हाला करता येत नव्हती.  चाललेल्या सार्‍या प्रकाराचा शेवट सार्‍या राष्ट्राला व व्यक्तिश: सर्वांनाच मोठा शोकजनक होणार, त्यातून सुटका नाही असा भयाण विचार आमच्या मनात सारखा वाढत चालला.

भयाण वाटे ते जयापजयाच्या विचाराने, किंवा या युध्दात कोण जिंकेल कोण हरेल अशा विवंचनेने, नव्हे.  दोस्त राष्ट्रांचा जय व्हावा असे आम्हाला वाटत नव्हते, कारण त्यामुळे आमच्यावर अनर्थच ओढवणार होता.  जपान्यांनी हिंदुस्थानात शिरावे, काही मुलूख त्यांच्या ताब्यात जावा हेही आम्हाला अनिष्ट वाटे.  जपानचा प्रतिकार शक्य त्या उपायांनी करणे अवश्य होते, जनतेला आम्ही तसे वारंवार बजावून सांगितलेही होते.  पण हे सारे, आम्हाला काय होऊ नये असे वाटत होते, त्याबद्दल, एक प्रकारे नकारात्मक काय ते झाले.  अकारात्मक काय व्हावे, काय घडून यावे, असा हेतू या युध्दात कोणता होता, या युध्दातून निघणारा भविष्यकाल कशा प्रकारचा ठरणार ?  मानवाच्या आकांक्षा व ध्येये यांची काही एक क्षिती न वाळगता निसर्गाच्या अंधशक्तींनी आजपावेतो जसा मानवांचा खेळ चालवला होता, भूतकाळात मानवांच्या हातून जो मूर्खपणा वारंवार झाला होता व त्यामुळे जो अनर्थ वारंवार घडत आला होता, त्याचीच पुन्हा आता एक आवृत्ती निघणार की काय ?  हिंदुस्थानचे भवितव्य काय ?

याच्या आदल्या वर्षी रवींद्रनाथ टागोर मृत्युशय्येवर पडलेले असताना त्यांनी जो आपला अखेरचा संदेश दिला त्याची आम्हाला आठवण झाली. ''....मानवी मनोवृत्तीत पाशवी वृत्तीचा जो महिषासुर असतो त्याने पांघरलेले संस्कृतीचे सारे सोंग त्याने झुगारून दिले आहे, तो आपल्या मूळ रूपात आपल्या कराल दंष्ट्रा विचकून त्या दंष्ट्रांनी सारी मानवजात फाडून काढून जिकडे तिकडे संहारांचे थैमान घालायला सिध्द झाला आहे.  या ध्रुवापासून त्या धु्रवापर्यंत पृथ्वीवरचे सारे अंतराळ द्वेषाच्या दाट धुराने कोंदले आहे.  पाश्चात्त्यांच्या मनोवृत्तीतला हिंसासुर कदाचित नुसताच निपचित पडून राहिला असेल, तो आता अखेर खडबडून उठला आहे व त्याने माणसातली माणुसकी भ्रष्ट करून टाकली आहे.

''दैवचक्र फिरते आहे, हिंदुस्थानावरचे साम्राज्य सोडून देण्याची पाळी इंग्रजांवर कधी तरी येणारच.  पण ते सोडून जातील तोपर्यंत हिंदुस्थानची दशा काय झाली असेल, किती पराकाष्ठेचे दैन्य ह्या देशाला आलेले असेल ?  शतकानुशतके वाहत आलेला त्यांच्या राज्यकारभाराचा ओघ आटून जाईल तेव्हा उघड्या पडलेल्या त्या पात्रात जिकडे तिकडे नुसता चिखल व ओंगळ घाण किती विस्तीर्ण पसरलेली आढळेल ?  एकेकाळी माझी अशी श्रध्दा होती की, युरोपच्या अंत:करणातून सुसंस्कृत आचारविचारांचे निर्मळ झरे उगम पावतील.  पण आज मी इहलोक सोडून जाण्याचे प्रस्थान ठेवताना माझ्या हृदयात त्या माझ्या एकाकाळच्या श्रध्देचा कणदेखील उरलेला नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel