हिंदुस्थान, म्हणजे उत्तर हिंदुस्थान, युध्दोपयोगी शस्त्रांसाठी प्रसिध्द होता.  विशेषत: पोलादाचे पाणी व तलवारी, कट्यारी यांची फार ख्याती होती. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात जे इराणी सैन्य ग्रीस देशावर चालून गेले होते, त्यात पुष्कळ पायदळ आणि घोडेस्वार असे दोन्ही प्रकारे हिंदी सैन्य होते. फिर्दौसीच्या शहानाम्यात म्हटले आहे की, जेव्हा अलेक्झांडरची इराणवर स्वारी आली तेव्हा इराण्यांनी घाईघाईने हिंदुस्थानातून तरवारी आणि इतर शस्त्रे मागवली. इस्लामपूर्व, तलवारीसाठी जो अरेबिक शब्द होता तो 'मुहन्नर' म्हणजे हिन्दमधील असा होता, हा शब्द अद्यापही उपयोगात आहे.

लोखंडाला पाणी चढविण्याच्या कलेत प्राचीन हिन्दुस्थानात चांगलीच प्रगती झाली होती.  दिल्लीजवळ एक असा प्रचंड लोहस्तंभ आहे.  त्याला गंज किंवा हवेने काहीही अपाय होऊन नये म्हणून लोखंडावर काय क्रिया केली त्याचा आधुनिक शास्त्रज्ञांना काही पत्ता लागत नाही.  त्याच्यावरील लेख गुप्तकाळातील लिपीमध्ये आहे.  ती लिपी इ. सनाच्या चौथ्या ते सातव्या शतकापर्यंत चालत होती.  परंतु हा स्तंभ त्या लेखाहून अतिप्राचीन काळचा असून हा लेख मागून त्याच्यावर खोदण्यात आला असावा, असे काही विद्वानांचे म्हणणे आहे.

चौथ्या शतकातील अलेक्झांडरच्या हिंदुस्थानवरील स्वारीला लष्करीदृष्ट्या फारसे महत्त्व नाही, त्या दृष्टीने तो एक किरकोळ हल्ला होता.  सरहद्दीपलीकडून लुटालुटीसाठी यावे असेच त्याचे स्वरूप होते, आणि तोही अलेक्झांडरला मोठा फायदेशीर झाला नाही.  सीमेवरील एका राजानेच त्याला असा नेटाने प्रतिकार केला की, पुढे हिंदुस्थानच्या माथ्यावर स्वारी करावी की नाही याचा त्याला विचार पडला.  सरहद्दीवरचा एक लहानसा सामंत जर इतक्या शौयाने लढतो, प्रतिकार करू शकतो, तर त्याच्या दक्षिणेकडील अधिक बलाढ्य राजेरजवाड्यांशी कसे तोंड देता येणार या शंकेनेच मुख्यत्वेकरून त्याचे सैन्य आणखी पुढे जायला तयार न होता स्वदेशी परत जाण्याचा आग्रह धरून बसले असावे.
अलेक्झांडर परतल्यावर आणि मेल्यावर सेल्युकसने पुन्हा स्वारी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हिंदुस्थानच्या सैन्याचे पाणी काय आहे ह्याचा त्याला प्रत्यय आला.  चंद्रगुप्ताने त्याचा पराजय करून त्याला पार पिटाळून लावले.  हिंदी सैन्याजवळ शत्रूजवळ नसलेली अशी काही साधने म्हणजे शिकवलेले रणमस्त हत्ती होते.  त्यांचा अलीकडच्या रणगाड्यांप्रमाणे उपयोग होत असे.  सेल्युकसची पुढे तिकडे आशियामायनरमध्ये अन्टिगोनस विरुध्द इ. स. ३०२ मध्ये जेव्हा लढाई झाली त्या वेळेस त्याने हिंदुस्थानातून असे पाचशे हत्ती मुद्दाम मागवून घेतले होते.  आणि इतिहासकार सांगतात की, त्या घनघोर लढाईत आणीबाणींची वेळ आली तेव्हा या हत्तींमुळे लढाईचा रंग पालटून अन्टिगोनस ठार मारला गेला, त्याचा मुलगा डिमिट्रियस पळून गेला.

हत्तींना कसे शिकवावे, घोड्यांची चांगली निपज कशी करावी इत्यादी विषयांवर हिंदुस्थानात अनेक ग्रंथ आहेत.  त्यांना शास्त्र ही संज्ञा आहे.  शास्त्र या शब्दाचा अर्थ पवित्र ग्रंथ, धर्मग्रंथ असा जरी आता असला, तरी पूर्वी हा शब्द प्रत्येक प्रकारच्या ज्ञानाला, गणितापासून नृत्यापर्यंत प्रत्येक विद्येला लावण्यात येत असे.  खरे पाहिले तर धार्मिक विद्या आणि इतर ऐहिक, संसारी विद्या यांच्यामध्ये विभागरेषा अशी स्पष्ट नव्हती.  सारी सरमिसळ होत असे व जीवनाला जे जे उपयोगी ते ते जिज्ञासेचा विषय झाले होते.

हिंदुस्थानात फार प्राचीन काळापासून लेखनकला आढळते.  उत्तर अश्मयुगात सापडलेल्या मातीच्या भांड्यांवर ब्राह्मी लिपीतील अक्षरे आहेत.  मोहंजो-दारो येथे जे लेख सापडले आहेत, त्यांचा सगळा अर्थ अद्याप लागलेला नाही.  हिंदुस्थानात ब्राह्मी लिपीतील जे प्राचीन लेख आढळतात, त्या मूळ लिपीतूनच देवनागरी व अन्य अर्वाचीन हिंदी लिप्या निघाल्या यात शंका नाही.  अशोकाचे काही लेख ब्राह्मी लिपीत आहेत; परंतु वायव्येकडील प्रांतामध्ये जे आहेत ते खरोष्टी लिपीत आहेत.

पाणिनीचे मोठे व्याकरण फार शतकापूर्वी इ.स. सहाव्या किंवा सातव्या शतकातच लिहिले गेले. * पाणिनी पूर्वीच्या व्याकरणकारांचा उल्लेख करतो.  संस्कृत भाषा स्थिर झाली होती.  विपुल असे साहित्य तिच्यात निर्माण झालें होते.  पाणिनीचे पुस्तक केवळ व्याकरण नसून काहीतरी अधिक आहे.  लेनिनग्राड येथील सोव्हिएट प्रोफेसर स्तचरबास्की लिहितो, ''मानवी बुध्दीच्या अतिमहान निर्मितीपैकी ही एक निर्मिती आहे.''  संस्कृत व्याकरणावर पाणिनी अद्यापही अधिकारी मानला जातो; नंतरच्या व्याकरणकारांनी त्यात काही भर घातली व भाष्ये लिहून त्याचे अधिक स्पष्टीकरण केले; विशेष लक्षात येण्यासारखी गोष्ट ही की, पाणिनीने ग्रीक लिपीचा उल्लेख केला आहे.  अलेक्झांडर पूर्वेकडे येण्यापूर्वी कित्येक शतके हिंदुस्थान आणि ग्रीस यांच्यामध्ये काहीतरी संबंध होते ही गोष्ट यावरून दिसते.

-----------------------

* कीथ व इतर काहीजणांच्या मते पाणिनीचा काल इ.स.पूर्व ३०० आहे.  परंतु एकंदरीत पाहता असे स्पष्ट दिसते की बौध्द काल सुरू होण्यापूर्वीच पाणिनी व त्याचे ग्रंथ झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel