भौतिकवाद; जडवाद

ग्रीस देशात काय, हिंदुस्थानात काय; सगळीकडेच एक मोठी दुर्दैवाची गोष्ट दिसून येते की, जगातील कितीतरी प्राचीन वाङ्मय आपण गमावून बसलो आहोत. ह्या वाङ्मयाच्या पोथ्या, तालीपत्र वा भूर्जपत्रावर मूळ लिहिलेल्या होत्या, पुढे पुढे कागदावर लिहिल्या जाऊ लागल्या.  भूर्जपत्र म्हणजे इंग्रजीत ज्याला बर्च म्हणतात, त्या झाडाची पातळ अंतरसाल सहज काढता येते, त्याचे पातळ पापुद्रे.  अशा सामग्रीवर, अशा पानावर, सालीवर लिहिलेल्या पोथ्यांची पाने नाहीशी होणे अपरिहार्य होते.  ग्रंथांच्या फार थोड्या प्रती अस्तित्वात असत, आणि त्या प्रती हरवल्या किंवा नष्ट करण्यात आल्या तर तो ग्रंथ समूळ नाहीसा होई.  त्या ग्रंथातले कोणी उतारे घेतले असले, त्या ग्रंथाचा अन्य कोणाच्या ग्रंथात उल्लेख असला तरच असा एखादा ग्रंथ होता असा पत्ता लागतो.  अशा रीतीने ज्यांचा आतापावेतो सुगावा लागला आहे असे जवळजवळ पन्नास-साठ हजार संस्कृत किंवा तद्‍भव भाषांतले ग्रंथ आहेत.  त्यांची नोंदही करण्यात आलेली आहे.  आणि असे आणखी सारखे सापडत आहेत.  कितीतरी जुन्या संस्कृत ग्रंथांचा हिंदुस्थानात पत्ताही नाही;! परंतु त्यांचे चिनी किंवा तिबेटी भाषांतील भाषांतरे सापडली आहेत.  धार्मिक संस्थांच्या ग्रंथशाळा तसेच मठ किंवा खाजगी गृहस्थ यांच्याकडे असलेले ग्रंथसमूह यातून जर जुन्या हस्तलिखितांसाठी नीट संघटित शोध केला तर भरपूर भाण्डार सापडल्याशिवाय राहणार नाही.  आपण आपली गुलामगिरीची बंधने तोडून जेव्हा मोकळे होऊ आणि स्वतंत्र कारभार करू लागू तेव्हा या सर्व हस्तलिखितांची चिकित्सापूर्वक पाहणी करू; जेथे आवश्यक व उपयुक्त वाटेल तेथे या हस्तलिखितांची भाषांतरे करवून घेऊन ती प्रसिध्दही करू.  स्वराज्यात ज्या अनेक गोष्टी आपणास करावयाच्या आहेत त्यांतील ही सुध्दा एक आहे.  हिंदी इतिहासाच्या अनेक भागांवर अशा हस्तलिखितांच्या चिकित्सापूर्वक अभ्यासाने प्रकाश पडेल.  विशेषत: ऐतिहासिक घडामोडी आणि बदलणार्‍या कल्पना यांच्या पाठीमागची सामाजिक पार्श्वभूमी समजून घ्यायला अशा अभ्यासाचा फार उपयोग होईल.  पुन:पुन्हा हरवणे आणि नष्ट होणे असे सुरू असूनही आणि संशोधनार्थ सुसंघटित प्रयत्न नसूनही ५०-६० हजार हस्तलिखितांचा सुगावा लागतो, यावरून प्राचीन काळातील हे साहित्य तत्त्वज्ञानात्मक, नाटकादिकलात्मक आणि इतर प्रकारचे किती विपुल असेल याची कल्पना येईल.  सापडलेल्या कितीतरी हस्तलिखितांची अद्याप छाननी, नीट चिकित्सापूर्वक अभ्यास व्हायचा आहे.

उपनिषदांच्या पाठोपाठ जडवादी तत्त्वज्ञानाचा काळ आला होता.  त्यावरील सारे वाङ्मय असे नष्ट झाले आहे.  जडवादी विचारांचे खंडन करण्याचे जे विस्तृत प्रयत्न दिसतात, जडवादी विचारांवर जी टीका जागोजागी आढळते तेवढेच काय ते त्या वाङ्मयाचे उल्लेख उरलेले आहेत.  कित्येक शतके जडवादी तत्त्वज्ञानाचा पगडा भारतीय विचारांवर होता, हेही एक तत्त्वज्ञान कित्येक शतके मान्य होते यात शंका नाही.  कौटिल्याचे अर्थशास्त्र हा विख्यात अर्थशास्त्रीय व राजनैतिक ग्रंथ चौथ्या शतकात-ख्रिस्तपूर्व-लिहिला गेला.  त्यात हिंदुस्थानातील प्रमुख दर्शनात, प्रमुख तत्त्वज्ञानात जडवादी तत्त्वज्ञानाची गणना केलेली आहे.

या तत्त्वज्ञानावर टीका करणार्‍यांवर, ते तत्त्वज्ञान खोडून काढणे ज्यांच्या हिताचे होते त्यांच्यावर आज आपणास विसंबून राहावे लागत आहे व त्या सर्वांचा प्रयत्न ह्या तत्त्वज्ञानाचा उपहास करून, हे तत्त्वज्ञान किती मूर्खपणाचे आहे हे दाखविण्याचा आहे.  मुळात हे तत्त्वज्ञान काय आहे ते समजून घ्यावयाला हा मार्ग आहे हे दुर्दैव आहे.  परंतु इतर दर्शने या दर्शनाला खोडून काढण्यासाठी इतका अट्टाहास करतात यावरूनच त्यांना ते किती महत्त्वाचे वाटत हाते ते दिसते.  कदाचित सनातनी मंडळींकडून, श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माच्या अनुयायांकडून पुढच्या काळात हे जडवादी वाङ्‌मय नष्ट केले गेले असावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel