अशोक

हिंदुस्थान आणि पाश्चिमात्य जग यांच्यामध्ये जे संबंध चंद्रगुप्त मौर्याने स्थापिले होते, ते त्याचा पुत्र बिंदुसार याच्या कारकीर्दीतही तसेच सुरू होते.  ईजिप्तचा राजा टॉलेमी आणि पश्चिम आशियाचा राजा सेल्यूकस याचा मुलगा अ‍ॅन्टिएकस यांचे वकील पाटलिपुत्र येथे होते.  चंद्रगुप्ताचा नातू अशोक याने हे संबंध आणखीच वाढविले; त्याच्या कारकीर्दीत हिंदुस्थान एक महत्त्वाचे आन्तरराष्ट्रीय केंद्र बनले आणि त्याचे विशेष कारण म्हणजे बौध्द धर्माचा झपाट्याने झालेला प्रसार हे होय.

ख्रिस्तपूर्व २७३ च्या सुमारास अशोक गादीवर बसला.  राजा होण्यापूर्वी वायव्येकडील प्रांताचा तो राजप्रतिनिधी होता.  या वायव्य प्रांताची विद्यापीठासाठी विख्यात असलेली तक्षशिला नगरी राजधानी होती.  साम्राज्याचा विस्तार हिंदुस्थानातील बहुतेक भागात होऊन जवळजवळ मध्यआशियापर्यंत झाला होता.  हिंदुस्थानातील दक्षिणेकडचा तसेच आग्नेयीकडचा काही भाग अद्याप जिंकून घ्यायचा राहिला होता.  चक्रवर्ती सत्तेखाली, सार्वभौम एकछत्री सत्तेखाली सर्व भारतवर्षाचे एकीकरण करण्याचे ते प्राचीन स्वप्न अशोकाच्या हृदयात पुन्हा प्रज्वलित झाले, आणि लगेच पूर्व किनार्‍यावरील कलिंग देश पादाक्रांत करायला तो निघाला.  प्राचीन कलिंग देशात आजचा ओरिसा आणि आंध्र प्रांताचा, काही भाग येत असत.  कलिंग देशातील लोकांनी शौयाने चांगलाच प्रतिकार केला, परंतु शेवटी अशोक विजयी झाला.  या युध्दात अपरिमित प्राणहानी झाली होती.  अशोकाला हे सारे वर्तमान जेव्हा कळले तेव्हा त्याला फार खेद होऊन, त्याला युध्दाची शिसारी आली.  विजयाच्या ऐन भरात असतानाच त्याने पुढे युध्द सोडून देण्याचा निश्चय केला.  इतिहासातील विजयी राजेमहाराजे, विजयी सेनापती यांच्या मालिकेत अशोकाचे हे अद्वितीय उदाहरण आहे.  दक्षिणेकडील टोकाचा थोडासा भाग सोडला तर, सारे हिंदुस्थान त्याची सत्ता मानीत होते; आणि दक्षिणेकडील लहानसा भागही त्याला हा हा म्हणता घेता आला असता, परंतु बौध्द धर्माचा त्याच्या मनावर विलक्षण परिणाम होऊन आणखी दिग्विजय करण्याचा नाद त्याने सोडला; आणि दुसर्‍याच क्षेत्रात विजय मिळविण्याकडे, दुसर्‍याच क्षेत्रात साहसे करण्याकडे त्याचे मन वळले.

अशोकाचे अनेक शिलालेख व ताम्रपट आहेत, त्यांतील लेखांवरून अशोकाच्या मनात कोणते विचार आले व प्रत्यक्ष आचार काय घडला, ते सारे त्याच्याच शब्दात समजून येते.  हे लेख सबंध हिंदुस्थानभर असून ते आजही पाहणे शक्य असल्यामुळे अशोकाचा आदेश त्याच्या सर्व प्रजाजनांना व पुढे आपल्यापर्यंत पोचला आहे.  एका शिलालेखात म्हटले आहे. ''राज्याभिषेक होऊन आठ वर्षे झाली असता देवप्रिय कृपानिधी सम्राटाने कलिंग देश जिंकून घेतला.  त्या युध्दात दीड लक्ष लोक युध्दकैदी करण्यात आले; एक लक्ष धारातीर्थी पडले, आणि त्याच्या कितीतरी पट अन्य कारणांनी मेले.

कलिंग राज्याला जोडल्याबरोबरच देवप्रिय सम्राटांनी शुध्द धर्माच्या रक्षणासाठी स्वत:ला वाहून घेतले.  त्या वेळेपासूनच या धर्माविषयी त्यांना प्रेम वाटू लागले; व त्यांनी धर्माचा वारंवार उपदेश सुरू केला.  कलिंग देश जिंकल्याबद्दल राजाला पश्चात्ताप झाला करण पूर्वी न जिंकलेला देश जिंकून घेणे म्हणजे सहस्त्रावधी जनांची हत्या, मृत्यू व दास्य ओढवणे होय.  म्हणून देवप्रिय सम्राटांना या गोष्टीचे आतोनात दु:ख झाले आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel