हे अस्पष्ट विचार करता करता शेवट काय याच्याशी विज्ञानाला काहीएक कर्तव्य नाही.  विज्ञान स्वत:च्या पध्दतीने शेकडो दिशांनी पुढे सरसावत आहे; निरीक्षण-परिक्षणाच्या प्रायोगिक पध्दतीने पुढे जात आहे.  ज्ञानाच्या सीमा उत्तरोत्त वाढवीत आहे.  मानवी जीवनात बदल घडवून आणीत आहे.  मूलभूत रहस्यांचा, विश्वाच्या कूट प्रश्नांचा उलगडा कदाचित लौकर होईल, कदाचित होणारही नाही.  तरीही विज्ञान पुढेच जात राहील, आपल्या मार्गाने आक्रमण करीत राहील; कारण त्याच्या पुढे जाण्याला अंत नाही.  मर्यादा नाही.  तत्त्वज्ञानातील 'का' या प्रश्नांकडे क्षणभर दुर्लक्ष करून 'कसे' हा प्रश्न विचारीत पुढे जाईल; आणि कसे या प्रश्नाला उत्तर देत देत जीवनाला अधिक अर्थ व सार विज्ञान देत जाईल; शेवटी एक दिवस असाही उजाडेल की 'का' चे ही उत्तर विज्ञान देऊ शकेल. 

किंवा कदाचित ज्ञानाचे कुंपण ओलांडून जाताच येणार नाही. जे गूढ आहे ते सदैव गूढच राहील.  आणि जीवनात कितीही फेर झाले तरी शेवटी मंगल व अमंगल यांचे एक गाठोडे असेच त्याचे स्वरूप राहील.  जीवन म्हणजे अखंड संघर्ष; जीवन म्हणजे परस्पर विरोधी आंतरिक प्रेरणांचा झगडा; एकमेकांशी नीट न जमणार्‍या वृत्तींचे विलक्षण असे मिश्रण हेच जीवनाचे स्वरूप राहील.

किंवा न्यायान्यायविवेक व नैतिक बंधने यांचे संबंध तोडून स्वतंत्र रीतीने या विज्ञानाची प्रगती होता होता त्यामुळे अस्तित्वात आलेली महाभयंकर संहारशस्त्रे स्वार्थांध नि महाभयंकर, दुष्ट लोकांच्या हाती गोळा होतील; हे लोक जगावर सत्ता स्थापू पाहतील; आणि विज्ञानाचा विकास विज्ञानच धुळीस मिळवील.  आज अशाच प्रकारच्या घडामोडी सभोवती दिसत आहेत.  या महायुध्दाच्या पाठीमागे मानवी मनातील तेच जुने परस्परविरोधी प्रेरणांचे द्वंद आहे.

किती विस्मयकारक आहे मनुष्यस्वभाव !  पुन्हा पुन्हा अपयश आले तरी शतकानुशतके हा मनुष्य ध्येयासाठी सर्वस्वाचा त्याग करीत आला आहे, प्राण टाकतो आहे.  सत्यासाठी, श्रध्देसाठी, राष्ट्रासाठी, स्वाभिमानासाठी त्याने बलिदान केले आहे.  ध्येयाचे स्वरूप बदलले, परंतु स्वार्थत्यागाची ती वृत्ती अमर आहे, आणि तिच्यासाठी म्हणून तरी मनुष्याला सारे क्षमा केले पाहिजे; मनुष्याविषयी निराश व्हायला कारण नाही,  आशा बाळगायला जागा आहे.  चोहो बाजूंनी आपत्ती कोसळत असताही तो हृदयात पूजीत होता त्या मूल्यांवरची श्रध्दा त्याने सोडली नाही, स्वत:ची धीरोदात्तता सोडली नाही.  वास्तविक या विराट विश्वात मनुष्यप्राणी म्हणजे एक क्षुद्रकण; सुष्टीच्या प्रचंड हातातील तो एक खेळणे, परंतु असे असूनही या सर्व विश्वशक्तींना त्याने आवाहन दिले आहे; त्यांच्या समोर तो वाकला नाही; आपल्या बुध्दीने, आपल्या मनाने, या सर्व विश्वशक्तींना जिंकायला तो सदैव धडपडतो आहे.  त्याची बुध्दी, त्याचे मन म्हणजे क्रांतीचा पाळणा; क्रान्तीचे बाळ तेथे जन्म घेते व जगाला बदलू बघते.  ते दुसरे देव कोठेही असोत, कसेही असोत.  खरी दिव्यता कोठे असेल तर ती येथे मानवात आहे; या मानवात जसे काही दानवी आहे तसे दैवीही आहे.

भविष्यकाल अंधारमय आहे, अनिश्चित आहे.  परंतु तिकडे जाणारा थोडासा रस्ता आपणांस दिसत आहे.  दृढ पावले टाकीत त्याच्यावरून पुढे जाऊ या.  वाटेत कितीही आपत्ती आल्या तरी, काहीही घडले तरी मानवी मन, मानवी आत्मा अजिंक्य आहे हे ध्यानात धरून पुढे जाऊ या.  कितीतरी संकटांतून मानवी आत्मा सहीसलामत बाहेर पडला आहे.  तसेच जीवनात कितीही दु:खे असली, कितीही शल्ये, वाईट गोष्टी असल्या तरी या जीवनात आनंदही आहे, सुंदरताही आहे; हेही आपण विसरता कामा नये.  या सृष्टीच्या जादूने भारलेल्या रानावनातून भटकत फिरायला मुभा आहे, मात्र भटकावे कसे ते माहीत पाहिजे.

''भीतीपासून मुक्त होऊन उभे राहणे, मोकळेपणाने श्वासोच्छ्वास करणे, प्रतीक्षा करणे, आशा राखणे, द्वेष दूर करण्यासाठी अस्तन्या सरसावणे; जगातील अन्याय दूर करण्यासाठी हात उगारणे; याहून अधिक चांगले काय आहे ?  शहाणपण म्हणून का आणखी काही आहे ?  ईश्वराची परम कृपा, मानवाचा प्रयत्न, ते का इतके सुंदर आहेत, इतके थोर आहेत ? सारी सुंदरता वरील जीवनात आहे.  आणि जे सुंदर आहे त्याच्यावर का नेहमी प्रेम केले जाणार नाही ?'' *

--------------------
* युरिपिडीस या ग्रीक नाटककाराच्या एका पात्राच्या तोंडचे गीत — गिल्बर्ट मुरेच्या भाषांतरावरून.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel