थेट सुंग कारकीर्दीपर्यंत छापण्याची कला चांगलीच भरभराटली. चिनी आणि हिंदी विद्वानांत इतका घनिष्ठ संबंध असूनही, ग्रंथांची देवाण-घेवाण सुरू असूनही, हिंदुस्थानात ग्रंथ छापण्याचे काम त्या काळी चालू असल्याचा काहीही पुरावा कसा नाही हे चमत्कारिक आहे व त्याचे कारण सांगणे कठीण आहे. चीनमधून ठशावरून छापण्याची कला तिबेटातही फार पूर्वीच गेलेली आहे व अद्यापही तसेच तेथे छापीत असावेत असे वाटते. चीनमधून छापण्याची कला इ.स. १२६०-१२६८ या काळातील युआन राजवटीत युरोपात प्रथम जर्मनीत गेली आणि येथून पंधराव्या शतकात इतर देशांत ती पसरली.
हिंदुस्थानात अफगाण किंवा मोगल राजवट असतानाही मधूनमधून चीन व हिंदुस्थान यांच्यामध्ये राजकीय कारस्थानाचे संबंध दिसून येतात. महंमद तघलक (इ.स. १३२६-७१) दिल्लीचा सुलतान याने इब्न बतूता या विख्यात अरब प्रवाशाला आपला वकील म्हणून चीनला पाठविले होते. त्या वेळेस बंगालने दिल्लीचे प्रभुत्व झुगारून देऊन स्वतंत्र राज्य स्थापिले होते. चौदाव्या शतकाच्या मध्याला चिनी दरबारने दोन वकील बंगालच्या स्वतंत्र सुलतानाकडे पाठविले होते. त्यांची नावे हु-शीन आणि फिन-शीन अशी होती. सुलतान घियासुद्दीनच्या काळात बंगालमधून चीनमध्ये आणि चिनातून बंगालात वकील नेहमी पाठविण्यात येऊ लागले. ही प्रथा बरेच दिवस चालली. चीनमध्ये त्या वेळेस मिंग राजवट होती. इ.स. १४१४ मध्ये सय्यदउद्दीन याने जो वकील पाठविला त्याच्याबरोबर मौल्यवान वस्तूंची भेटही पाठविण्यात आली होती, त्या वस्तूंत एक जिवंत जिराफ होता. जिराफ हिंदुस्थानात कसा आला हे गूढच आहे. कदाचित आफ्रिकेतून कोणी भेट म्हणून पाठविला असेल व दुर्मिळ वस्तू म्हणून ही भेट तिचे कौतुक वाटेल म्हणून पुढे चीनला पाठविण्यात आली असावी. चीन देशात त्याचे खरोखरच कौतुक झाले, कारण कन्फ्यूशियसचे अनुयायी जिराफ म्हणजे एक शुभ चिन्ह मानतात. पाठविलेला प्राणी जिराफच असावा यात शंका नाही, कारण त्याचे चांगले विस्तृत वर्णन केलेले आहे. शिवाय रेशमावर त्याचे एक चिनी चित्र आहे. चिनी दरबारातील कलावंताने ते चित्र काढले. त्या कलावंताने जिराफाची लांबलचक स्तुती लिहून पुढे म्हटले आहे की, ''हे शुभचिन्ह आहे. यामुळे भाग्य येईल.'' तो लिहितो, ''सारे प्रधान आणि सारी जनता या प्राण्याचे दर्शन घ्यायला जमा झाली आणि त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही.''
बौध्दकाळात हिंदुस्थान आणि चीन यांच्यामध्ये जो व्यापार चालत असे, तो पुढे अफगाण-मोगल काळातही सुरू राहिला आणि नाना पदार्थांची अदलाबदल होत राहिली. उत्तरेकडील हिमालयातील रस्त्याने हा खुष्कीचा व्यापार चाले. मध्ये-आशियातील व्यापारी तांड्यांचे जे जुने रस्ते होते, त्याच रस्त्यांनी हे दळणवळण होत होते. दक्षिण हिंदुस्थानातील बंदरामार्फत इंडोनेशियाच्या बेटावरूनही चीनशी दर्यावर्दी व्यापार चालत असे.
जवळजवळ एक हजार वर्षांहून अधिकच चीन व हिंदुस्थान यांचा अन्योन्य संबंध अशा प्रकारे चालला असताना केवळ तत्त्वज्ञानाच्या किंवा विचाराच्या क्षेत्रातच नव्हे, तर जीवनाच्या कलेत, जीवनाच्या शास्त्रातही एकमेकांपासून दोघांनीही पुष्कळ घेतले. चीनवर हिंदुस्थानचा बहुधा अधिक परिणाम झाला; दु:खाची गोष्ट ही की हिंदुस्थानवर चीनचा तितका झाला नाही. चीनपासून काही थोडे व्यवहारज्ञान हिंदुस्थानने घेतले असते तर स्वत:च्या भरमसाट कल्पनांना त्याला थोडा आळा घालता आला असता, चीनची व्यवहारिक अक्कल शिकून हिंदुस्थानला स्वत:चा बराच फायदा करून घेता आला असता. चीनने हिंदुस्थानपासून पुष्कळ घेतले तरी तेही समृध्द राष्ट्र होते. त्याला थोर परंपरा, संस्कृती होती. आत्मविश्वासाने चीन घेत होता आणि जे घेतले त्याला चिनी रंगरूप देऊन स्वत:च्या जीवनविणावटीत ते जिरवून, एकरूप करून टाकीत होता.* बौध्दधर्म आणि त्यातील गुंतागुंतीचे तत्त्वज्ञान यांनाही लोओत्सी आणि कन्फ्यूशियस यांच्या तत्त्वज्ञानांचा व विचारांचा रंग चढला. बौध्द तत्त्वज्ञानातील दु:खवादाने, एक प्रकारच्या निवृत्तिपरायण निराशवादाने. चिनी लोकांची अभिजात आनंदीवृत्ती, त्यांचे जीवनावरील प्रेम ही यत्किंचितही कमी झाली नाहीत, एक जुनी चिनी म्हण पुढीलप्रमाणे आहे. ''सरकारने पकडले तर फटके मारून ठार करतील; बौध्द भिक्षूने पकडले तर तुम्हाला उपवासाने तो ठार करील.''