काश्मीरात मुस्लिम धर्मप्रचार अखंड चालत आल्यामुळे आज शेकडा ९५ लोक तेथे मुसलमान आहेत, परंतु कितीतरी हिंदू चालीरीती त्यांच्यात शिल्लक आहेत.  एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला तेथील हिंदू राजाला असे आढळून आले की, एकजात सारे हिंदू होण्यासाठी उत्सुक आहेत.  तेव्हा त्याने काशीच्या पंडितांकडे एक शिष्टमंडळ पाठवून त्यांना हिंदूकरून घेता येईल का म्हणून चौकशी केली, परंतु काशीच्या पंडितांनी धर्मांतर करता येत नाही असा निकाल दिला, आणि तेथेच ते प्रकरण संपले.

हिंदुस्थानात जे मुसलमान आले त्यांनी एखादे नवीन यंत्र, एखादी राजकीय किंवा आर्थिक नवी योजना आणली नव्हती.  इस्लाममधील बंधुभावावर त्यांचा विश्वास असला तरी त्यांची दृष्टी जाति-जमातीपुरतीच मर्यादित असे.  ती दृष्टी सरंजामशाही वृत्तीची होती.  उत्पादनाच्या पध्दती, औद्योगिक संघटना, एकंदर सारे तंत्र यात तत्कालीन हिंदी लोकांहून ते मागासलेले होते.  हिंदी आर्थिक जीवनावर, सामाजिक रचनेवर मुसलमानांचा परिणाम फारसा झाला नाही.  हे जीवन पूर्ववत चालू राहिले आणि हिंदू, मुसलमान व इतर सगळे त्यात नीट बसले.

स्त्रियांची स्थिती अधिकच अवनत झाली.  वारशाच्या बाबतीत आणि घरातील दर्जासंबंधी प्राचीन कायदेही अनुदारच होते.  असे असूनही एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांसंबंधीच्या ब्रिटिश कायद्याहून ते अधिक उदार होते.  एकत्र कुटुंबपध्दतीच्या प्रयोगातून वारशाचा हिंदू कायदा निघालेला होता.  एकत्र मिळकत दुसर्‍या कुटुंबात जाऊ नये हे उद्दिष्ट असे.  आर्थिक दृष्ट्या स्त्री पित्यावर, पतीवर किंवा पुत्रावर अवलंबून असे. परंतु स्वत:च्या हक्कानेही ती मिळकत राखू शकत नसे, राखीही. तसे तिचे घरात अनेक गोष्टींत मानाचे स्थान असे.  तिची प्रतिष्ठा सांभाळली जाई, मान दिला जाई, काहीसे स्वातंत्र्यही तिला असे.  सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत ती भाग घेऊ शके.  हिंदी इतिहास विख्यात स्त्रियांच्या नावांनी भरलेला आहे.  त्या तत्त्वज्ञानी होत्या, विचारकर्त्या होत्या; त्या लढाईला जात; त्या राज्ये चालवीत.  परंतु हे स्वातंत्र्य पुढे पुढे कमी होत गेले.  इस्लामी धर्मात स्त्रियांना वारसा हक्क आहे, परंतु हिंदुधर्मावर या गोष्टीचा परिणाम झाला नाही.  परिणाम झाला तो दुसर्‍याच अनिष्ट चालीचा.  स्त्रियांना दिवसेंदिवस मागे ठेवणे, अलग ठेवणे ही वृत्ती मात्र वाढत गेली.  सर्व उत्तर हिंदुस्थानभवर व बंगालमध्ये ही अनिष्ट प्रथा पसरली.  दक्षिण व पश्चिम हिंदुस्थान मात्र या अध:पतित प्रथेपासून वाचला.  उत्तरेकडेही वरिष्ठ वर्गातच ही गोषाची पध्दती राहिली.  सुदैवाने बहुजनसमाज यापासून मुक्त राहिला.  स्त्रियांना शिक्षणाची कमी संधी मिळू लागली आणि त्यांचे कर्मक्षेत्र घरापुरते मर्यादित झाले. *  स्वत:च्या अंगचे कर्तृत्व दाखवायला त्यांना क्षेत्रच उरले नाही, घरातील मर्यादित कोंडलेले जीवन झाले व त्यांना सांगण्यात आले की, पातिव्रत्य हा त्यांचा परधर्म आणि त्यापासून ढळणे म्हणजे महापाप.  अशी ही पुरुषकृत नीती होती.  परंतु पुरुषांनी ही नीती, हे तत्त्व स्वत:ला लावले नाही.  तुलसीदासाचे रामायण प्रसिध्द आहे, तशी त्याची योग्यताही आहे.  परंतु स्त्रीचे त्यात केलेले चित्रण हे अनुदार आणि उघडउघड पूर्वग्रहदूषित आणि पक्षपाती आहे.

-------------------
*  असे असूनही या काळात कितीतरी थोर स्त्रिया होऊन गेल्या, विदुषी होऊन गेल्या, राज्यकर्त्याही झाल्या. अठराव्या शतकात लक्ष्मीदेवीने मध्ययुगातील प्रसिध्द अशी स्मृतिटीका जी 'मिताक्षरा' तिच्यावर पांडित्यपूर्ण अशी कायद्याची टीका लिहिली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel