इंडोआर्यांची एकीकडे दिसून येणारी अत्युत्कट व्यक्तिवादी भावना, इतरांना आपल्यापासून अलग ठेवण्याची वृत्ती आणि दुसरीकडे सारे वर्णभेद, जातिभेद, सारे अंतर्बाह्य विरोध यांना झुगारून, त्यांच्यावर स्वार होऊन सर्व विश्वाशी एकरूप होण्याची वृत्ती, या दोहोंतील विरोध ताडून पाहणे, या दोहोंची तुलना करणे मोठे गमतीचे आहे.  ही दुसरी विश्वात्मक वृत्ती म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाही आहे.  ''जो सर्वांमध्ये, सर्व चराचरांमध्ये त्या एका तत्त्वाला पाहतो आणि त्या एकात सारे विश्व पाहतो, त्याला कोणीही प्राणी तुच्छ नाही.'' हे तत्त्वज्ञान झाले; हा विचार झाला.  परंतु आचारात, व्यवहारात या विचाराचा परिणाम खचित झाला असावा.  जीवनावर या तत्त्वज्ञानाचा परिणाम होऊन सर्वत्र एक प्रकारची सहिष्णुता आली; समजूतदारपणा आला; धर्माच्या बाबतीत कडवेपणा न राहता, मोकळ्या विचारांना, स्वतंत्र वृत्तीला वाव राहिला; मला माझे जीवन जगू दे.  तुझे तू जग अशी उदार वृत्ती आणि तिची शक्यता निर्माण झाली; चिनी लोकांप्रमाणेच भारतीय संस्कृतीचेही हे मुख्य विशेष आहेत.  धर्मामध्ये किंवा संस्कृतीत अधिकारवाद, हुकूमशाही वृत्ती कोठेही नव्हती.  त्यावरून या संस्कृतीचे प्राचीनत्व, शहाणपणा व मनाचा अपार मोठेपणा दिसून येतो.

उपनिषदांत एक प्रश्न एके ठिकाणी विचारलेला असून त्याला मोठे मासलेवाईक आणि मार्मिक उत्तर देण्यात आले आहे. प्रश्न असा आहे, ''हे विश्व म्हणजे काय ?  ते कोठून आले ?  ते पुन्हा कशात विलीन होणार ?''  उत्तर असे आहे, ''ते स्वातंत्र्यातून जन्मते, स्वातंत्र्यातच राहते, स्वातंत्र्यातच विलीन होते.''  याचा नक्की अर्थ काय ते माझ्या नीटसे ध्यानात येत नाही; परंतु एक अर्थ असा वाटतो की ते उपनिषदांचे कर्ते स्वातंत्र्याचे परम उपासक होते.  प्रत्येक गोष्ट स्वातंत्र्याच्या मापाने मोजण्याची, स्वतंत्र विचाराने ठरविण्याची त्यांची इच्छा होती.  स्वामी विवेकानंद या मुद्दयावर फार भर देत असत.

कल्पनेनेही स्वत:ला त्या अतिदूरच्या काळात घेऊन जाणे आणि त्या काळच्या वैचारिक व मानसिक वातावरणात शिरणे कठिण आहे.  त्या काळातील निवेदनशैली जरा अपरिचितच, एक प्रकारे विचित्र व अनुवादाला कठीण वाटते आणि जीवनाची तत्कालीन पार्श्वभूमीही निराळी, अगदी भिन्न पडते.  हल्लीच्या कितीतरी गोष्टी चमत्कारिक व बुध्दीस न पटणार्‍या असूनही सरावामुळे त्यासुध्दा आपल्याला ठीक दिसतात.  पण ज्यांचा मुळीच सराव नाही त्या गोष्टी उमजून समजणे महाकठीण कर्म आहे.  या अशा अडचणी आणि दुस्तर अडथळे असूनही उपनिषदांचा संदेश आपण सदैव हजारो वर्षे उत्कटपणे, मनापासून ऐकत आलो आहोत असे इतिहास सांगत आहे व हिंदी राष्ट्राचा स्वभाव, हिंदी राष्ट्राचे शील यांच्यावर त्या संदेशाचा अपार परिणाम होऊन त्याने त्यांचा विशिष्ट वळण दिले आहे,  आकार दिला आहे.  एक पाश्चिमात्य पंडित ब्लूमफिल्ड म्हणतो, ''कोणताही महत्त्वाचा हिंदी विचार पाहा, वेद न मानणारा बौध्दधर्मही पाहा, ज्यांची मुळे उपनिषदांत सापडत नाहीत असा एकही विचार, असे एकही महत्त्वाचे तत्त्वज्ञान हिंदी संस्कृतीत नाही.''  हे प्राचीन भारतीय विचार इराणच्या मार्गे ग्रीस देशातही खोल शिरून, तेथील तत्त्वज्ञान्यांवर व विचारवंतांवर त्यांचा परिणाम झाला.  पुढे तर प्लॅटिनस हा ग्रीक तत्त्वज्ञानी इराणी व हिंदी तत्त्वज्ञानांचा अभ्यास करायला पूर्वेकडे आला.  उपनिषदांतील गूढ वादाचा त्याच्यावर विशेष परिणाम झाला.  प्लॅटिनसपासून हे पुष्कळसे विचार पुढे सेंट ऑगस्टाइनने उचलले; आणि त्याच्यामुळे तत्कालीन ख्रिश्चन धर्मावरही त्यांचा परिणाम झाला आहे, असेही समजले जाते. *

-----------------------

* रोमाँ रोलाँ यांनी विवेकानंदांवरील आपल्या ग्रंथाच्या अखेरीस एक विस्तृत टीप म्हणजे एक परिशिष्टच ''ख्रिस्ती सनाच्या पहिल्या काही शतकांतील ग्रीक-ख्रिस्ती गूढवाद व त्याचा हिंदू गूढवादाशी संबंध'' यावर दिलेले आहे.  त्यांचे म्हणणे असे की, ''ख्रिस्ती सनाच्या पहिल्या-दुसर्‍या शतकात पूर्वेकडील विचार ग्रीक विचारांत येऊन किती मोठ्या प्रमाणात मिसळले होते ते शेकडो प्रमाणांवरून सिध्द होते.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel