आमच्या अलाहाबाद शहरात व जिल्ह्यात तसेच आजूबाजूला जनरल नील यांचे 'फाशीचे सूड कोर्ट' भरत होते. सैन्यातले अधिकारी व दिवाणी अधिकारी यांनी हा चौकशीचा फार्स चालविला होता व काही वेळा तेही न करता, स्त्री-पुरुष किंवा वयाने केवढे वगैरे काही न पाहता नेटिव्ह लोकांना देहान्त शिक्षा केली जात होती. गव्हर्नर-जनरलने जे खलिते इंग्लंडात पाठविले, जी खते-पत्रे पार्लमेंटच्या संग्रहात आहेत, त्यांत त्याने स्वच्छ लिहिले आहे, ''अपराध्याबरोबर निरपराध्यांचीही कत्तल होत आहे. वृध्द स्त्रिया-मुले यांचेही बळी घेतले जात आहेत. त्यांना जाणूनबुजून फासावर चढविले असे नाही, परंतु सबंध गावेच्या गावे पेटवून त्यांचे त्यात भस्म केले. त्यातून कोणी आगीतून निसटू लागला तर 'चुकून' त्याला गोळी लागून मरण येई.'' फाशी देणार्या स्वयंसेवकांची पथके जिल्ह्याजिल्ह्यांतून हिंडत होती व फाशीचा खेळ खेळण्याला तयार झालेल्या हौशी जवानांचा तोटा नव्हता. त्यांपैकीच एक मेहेरबानसाहेब, लोकांना फाशी देताना आपण काय चतुराई करून सफाईने फासावर चढवतो त्याची फुशारकी सांगत. आंब्याच्या झाडाला दोरी टांगून तिचा फास कैद्याच्या गळ्याभोवती चढवीत. कैद्याला हत्तीवर बसवूनच झाडाखाली अगोदर आणलेला असे. मग फासावर चढवून झाला म्हणजे नुसता हत्ती पुढे हाकलला की वरचा कैदी त्याच्या पाठीवरून पडतापडता फासावर लटके. त्यातच गंमत म्हणून की काय इंग्रजी आठचा आकार साधावा अशा योजनेने फांद्या निवडून अनेकांना पाठोपाठ फाशी देत.'' हेच अलाहाबादकडे चाललेले प्रकार कानपूर, लखनौ वगैरे सगळीकडे प्रांतभर चालले होते.
जनरल नीलचा पुतळा त्याच्या उपकारांनी भारावलेल्या कृतज्ञ देशबांधवांनी (मात्र आमच्या खर्चाने) उभारला आहे त्याची अजूनही आमच्यावर नजर आहेच. ब्रिटिशांची राजवट कशी होती व कशी चालली याचे हा पुतळाच खरे प्रतीक आहे. उगारलेली तरवार हाती असलेला निकल्सनचा दिल्ली येथील पुतळा अद्याप जुन्या दिल्लीला धमकी देत उभा आहेच.
इतिहासातल्या जुना घटना सांगणे मोठे जिवावर येते, परंतु नाईलाज आहे म्हणून त्या सांगितल्या, कारण या घटनांपाठीमागील वृत्ती तेथेच संपली नाही, ती जिवंत आहे; आणि जेव्हा जेव्हा आणीबाणीची वेळ येते, ब्रिटिशांचा धीर सुटतो तेव्हा तेव्हा ती वृत्ती पुन्हा डोके वर काढते. जगाला अमृतसर आणि जालियनवाला बाग माहीत झाली आहेत. परंतु १८५७ सालापासून काय काय या देशात झाले ते बरेचसे जगाला माहीत नाही. अलीकडे अलीकडे घडलेल्या कितीतरी गोष्टी, आजच्या पिढीचे मन कटू करणार्या, संताप आणणार्या कितीतरी गोष्टी जगाला माहीत नाहीत. साम्राज्यवाद, एका राष्ट्राने दुसर्यावर सत्ता चालविणे या गोष्टी वाईटच. त्याचप्रमाणे वंशभेदाचे स्तोम करणे वाईटच. परंतु साम्राज्यवाद व वंशाभिमान या दोहोंची जेव्हा युती होते तेव्हा अघोरी प्रकार जन्माला येतात, आणि त्यांच्याशी संबध्द असलेल्या सर्वांचाच अध:पात होतो. आपल्या मानाच्या उच्च स्थानावरून इंग्लंड घसरले याला इंग्लंडचे साम्राज्यशाही धोरण कितपत कारणीभूत आणि वंशाभिमानाचे धोरण कितपत कारणीभूत याचा भावी इंग्रज इतिहासकाराला विचार करावा लागेल. साम्राज्यवाद आणि वंशाभिमान यामुळे इंग्रजांचे राष्ट्रीय जीवन भ्रष्ट झाले व स्वत:च्या इतिहासाचे आणि साहित्याचे धडे त्यामुळे इंग्रज विसरून गेले.