स्वातंत्र्य आणि साम्राज्य
अमेरिका व रशिया या दोन राष्ट्रांकडे भविष्यकाळी जगातील महत्त्वाच्या भूमिका जाण्याचा योग निश्चित दिसतो आहे. पुढारलेल्या कोणत्याही दोन राष्ट्रांमध्ये जेवढे म्हणून भिन्नत्व शक्य असेल तेवढे सारे भिन्नत्व या दोघांमध्ये आहे, त्यांच्यातले दोष सुध्दा एकमेकांच्या अगदी वेगळे, वेगळ्याच प्रकारचे आहेत. केवळ राजकीय लोकशाहीत जे जे म्हणून दुर्गुण असायचे ते सारे अमेरिकेत सापडतात. तर राजकीय लोकशाहीच्या अभावी जे सारे दुर्गुण आढळायचे ते सारे रशियात आढळतात. पण ह्या दोन्ही राष्ट्रांत आढळणार्या समान गोष्टीही खूपच आहेत. दोन्ही राष्ट्रांची दृष्टी प्रवृत्तिपर, प्रयत्नवादी आहे, त्यांची साधनसंपत्ती प्रचंड आहे, समाजात कोणालाही कोणतेही स्थान मिळवावयाची अप्रतिबंध संधी देणारी प्रवाही समाजव्यवस्था आहे. मध्ययुगीन विचारआचारांच्या पार्श्वभूमीची छाया त्यांच्यावर पडलेली नाही, विज्ञानशास्त्रावर विश्वसून चालण्याची व त्या शास्त्राचा उपयोग करून घेण्याची वृत्ती आहे, जनतेत जिकडे तिकडे शिक्षणाचा प्रसार झाला आहे, जनतेच्या कर्तबगारीला भरपूर वाव आहे. अमेरिकन समाजात वेगवेगळ्या व्यक्तींच्या वैयक्तिक उत्पन्नामध्ये भलताच मोठा फरक पडत असला तरी, इतर बहुतेक देशांत समाजात जसे वर्ग निश्चित झालेले आहेत, व्यक्तीचा सामाजिक वर्ग जसा कायमचा होऊन बसतो, तसा प्रकार नाही आणि उच्चनीच भावही कोणाच्या मनात येत नाही. रशियामध्ये गेल्या वीस वर्षात घडून आलेल्या गोष्टींपैकी सर्वांत ठळक उमटून दिसणारी गोष्ट ही की, सर्वसामान्य जनता फार विशेषच सुशिक्षित झाली आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रात तिच्याकडून नाव घेण्याजोगे कार्यही साधले गेले आहे. प्रगतिपर लोकशाही समाजाची उभारणी करायला अवश्य तो मूलभूत पाया अशा प्रकारे या दोन्ही देशांत तयार झालेला दिसतो. तो पाया अवश्य आहे असे म्हणण्याचे कारण हे की, अडाणी व राज्यकारभाराचे काही सुखदु:ख नाही अशी सर्वसामान्य जनता व तिच्यावर पुढारलेल्या बुध्दिव्यवसायी मूठभर लोकांचे राज्य अशी स्थिती असली तर प्रगतिपर लोकशाही समाजाची स्थापना होऊ शकत नाही आणि जनतेत संस्कृतीचा व शिक्षणाचा प्रसार झालेला असला तर अशा निवडक लोकांची सत्ता जनतेवर फार काळ पूर्ववत चालू शकत नाही.
डी. टोकव्हिल या ग्रंथकाराने त्या काळच्या अमेरिकन लोकांसंबंधी चर्चा करताना शंभर वर्षांपूर्वी असे म्हटले आहे की—''लोकशाहीच्या तत्त्वामुळे एक असे घडते की, केवळ ज्ञानाकरिता शास्त्राचा अभ्यास करण्याकडे लोकांची प्रवृत्ती होत नाही खरी, पण त्याबरोबरच दुसरे असेही घडते की, शास्त्राचा अभ्यास करणारांची संख्या वाढता वाढता प्रचंड होते...उच्चनीच स्थितीतील भेद जर कायमचे होऊन बसले तर केवळ तात्विक सत्य तत्त्वांचा निष्फळ शोध अहंकारी वृत्तीने करीत राहण्याकडे काय ती लोकांची प्रवृत्ती वळते, पण समाजव्यवस्था व सामाजिक संस्था यांचे स्वरूप लोकशाहीचे असले तर शास्त्रांच्या अभ्यासातून तत्काळ व्यवहारोपयोगी होण्यासारखे शोध लावण्याची लोकांची तयारी होते. हे असे होणे साहजिक व क्रमप्राप्तच आहे.'' हे लिहिल्यानंतरच्या काळात अमेरिकेची पुष्कळ वाढ झाली आहे, आणि स्थित्यंतरे होता होता आता अमेरिका म्हणजे अनेक मानववंश एके ठिकाणी येऊन अमेरिकन जनता म्हणजे या अनेक वंशांचे एकजीव झालेले एक मिश्रण अशी सध्याची स्थिती आहे, पण त्या अमेरिकन जनतेचे मूळचे गुणविशेष अद्यापही तेच आहेत.
अमेरिकन व रशियन लोकांत आणखी एक साधर्म्य आढळते ते असे की, आशिया व युरोपमधील देशांना स्वत:च्या इतिहासपरंपरांचे जड ओझे वाहावे लागते, व त्या इतिहासाच्या अनुरोधाने त्यांचे बहुतेक उद्योग, त्यांचे एकमेकाशी विरोध चालतात हे गतेतिहासाचे ओझे रशियन व अमेरिकन राष्ट्रांच्या डोक्यावर बसलेले नाही. अर्थात चालू पिढीला जे हल्लीच्या कटकटींचे ओझे वाहावे लागते त्यातून त्यांचीही सुटका नाही, आपली कोणाचीच सुटका नाही. पण इतर राष्ट्रांशी येणार्या संबंधाच्या दृष्टीने त्यांचा इतिहास अधिक निर्मळ आहे, भविष्यकाळात प्रवास करताना त्यांच्या डोक्यावरचे गतकाळचे ओझे इतरांच्या मानाने कमी आहे.