उपनिषदांतील निरनिराळ्या प्रश्नांसंबंधीची आध्यात्मिक चर्चा मला समजायला कठीण आहे. परंतु अंधश्रध्दा आणि हटवाद यांच्यात गुरफटलेल्या या प्रश्नाकडे पाहण्याची उपनिषदांची दृष्टी, तो प्रश्न सोडविण्याची पध्दत मला फार पटली आहे. ती दृष्टी, ती पध्दत विशिष्ट धर्ममताची, कर्मकाण्डाची नाही, तत्त्वज्ञानाची आहे. विचारांचा ओजस्वी ओघ, शंका असेल तेथला निर्भीड मोकळेपणा व या सर्वांची तर्कशुध्द पार्श्वभूमी मला आवडते. विषयाची मांडणी करण्याची पध्दत फार आटोपशीर, सूत्ररूप तर कधीकधी गुरु-शिष्यांचे प्रश्नोत्तररूप आहे. असे म्हणतात की, उपनिषदे म्हणजे गुरुने शिष्यांसाठी केलेली किंवा शिष्यांनी गुरुच्या प्रवचनाची लिहून ठेवलेली ही टाचणे असावीत. 'भारताचा जगाला वारसा' या आपल्या ग्रंथात प्रोफेसर एफ. डब्ल्यू. थॉमस लिहितात, ''जिवलग मित्रांनी त्यांना सर्वांना तळमळ लागलेल्या एखाद्या गंभीर प्रश्नाची चर्चा करताना जी मनमोकळी आस्था दिसते ती आस्था हेच उपनिषदांचे वैशिष्ट्य आहे व यामुळेच त्यांच्याकडे मनुष्यमात्राचे लक्ष जाते.'' आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी वक्तृत्वपूर्ण भाषेत म्हणतात, ''शाश्वत सत्य शोधून काढण्याच्या तहानेने तळमळलेले उपनिषदांतले गुरु व शिष्य या विश्वाचे 'प्रकट गूढ' खणून काढताना दिसून येणारी त्यांची विशाल प्रतिभा, त्यांच्या विचारांचा भव्य स्वैरसंचार व शोध करताना कशाचीही पर्वा न करण्याची धाडशी वृत्ती, यामुळे जगातील अतिप्राचीन असे हे ग्रंथ आजच्या कालातही अद्ययावत, अर्वाचीन व हृदयंगम वाटतात.''
सत्यावलंबन हा उपनिषदांचा प्रभावी विशेष आहे. ''सत्यच विजयी होते; अनृत नाही, परब्रह्माकडे जाणारा रस्ता सत्याने बांधलेला आहे''. एक अतिप्रसिध्द प्रार्थना आहे ती दिव्यदृष्टी, दिव्यज्ञान प्राप्त होण्याकरता आहे ती ही- ''असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।''
पुन्हा पुन्हा अस्वस्थ मन परब्रह्माकडे सारखे डोकावताना दिसते. सदैव धडपड, सदैव जिज्ञासा, सदैव प्रश्न सुरू आहेत. ''कोणाच्या आज्ञेने मन आपल्या घरट्यात येऊन बसले आहे ? कोणाच्या आज्ञेने हा प्राण प्रथम स्फुरला ? कोणाच्या आज्ञेने ह्या वाणीचे उद्गार निघतात ? कोणत्या देवाने या डोळ्यांना व कानांना प्रेरणा देऊन दिशा दाखवली ?'' आणि पुन्हा ''वार्याला का थांबता येत नाही ? मानवी मनाला विसावा का नाही ? हे पाणी का धावते ? आणि कशाच्या शोधात ? त्याला आपला ओघ क्षणभरही का आवरत नाही ?'' असे हे प्रश्न, हे धाडस करायला निघालेले मानव सारखे विचारीत आहेत. त्यांना मार्गावर विश्रांती नाही, त्यांचा प्रवास संपत नाही. ऐतरेय ब्राह्मणात या अनंत— न संपणार्या परंतु सर्वांनी करावी अशा या यात्रेचे एक सूक्त आहे आणि प्रत्येक श्लोकाच्या शेवटी, ''चरैवेति, चरैवेति'', ''म्हणून हे पांथस्था, चल, पाऊल उचल'', असे पालुपद आहे.
बहुतेक धर्म म्हटला की सर्वशक्तिमान ईश्वर आलाच व त्याच्यापुढे भक्ताचे दीन होऊन लोटांगण ठरलेले. पण उपनिषदांत मानवी मन परिस्थितीवर मात करून विजयी झालेले दिसते. ''माझ्या शरीराचे भस्म होईल; माझ्या प्राणवायूचा शेवटचा श्वास विश्रांतिहीन अमर महाप्राणात विलीन होईल; परंतु मी आणि माझी कर्मे अविनाशी आहोत. हे मना, हे सदैव ध्यानात ठेव, कधी विसरू नकोस.'' एका प्रात:संध्येच्या प्रार्थनेत सूर्याला उद्देशून म्हटले आहे, ''हे दैदीप्यमान सूर्या, तुला ज्याने अशा रूपाने निर्माण केले तो जो पुरुष तोच मी.'' केवढा मोठा आत्मविश्वास हा !
आत्मा म्हणजे काय ? त्याचे अकारात्मक, हा असा आहे, असे वर्णन शक्य नाही. फार तर नकारात्मक, नेति नेति, एवढेच सांगणे शक्य आहे, किंवा सांगू म्हटलेच तर फारतर ''तत् त्वमसि'' ''तूच तो आहेस'' एवढेच. अग्नीतून ठिणगी उडावी व ती पुन्हा अग्नीतच पडून विलीन व्हावी तशी जीवात्म्याची ठिणगी परमात्म्यातून निघून परमात्म्यातच विलीन होते. ''विश्वात प्रवेश करताना वैश्वावर अग्नी जसा मुळात एकच परंतु जी जी वस्तू तो जाळतो, तिच्या तिच्या रूपाने तो पृथक दिसतो, त्याप्रमाणे अंतरात्मा स्वत: अमुक एक आकाराचा असा नसूनही, निराकार असूनही, ज्या वस्तूत शिरतो, त्या वस्तूच्या रूपाने सर्वत्र पृथ पृथ दिसतो. सर्व चराचरात, वस्तुमात्रात एकच तत्त्व भरून राहिले आहे या सत्याचा साक्षात्कार झाला तर इतरांपासून आपल्याला ह्या नामरूपधारी बाह्य जगाची विविधता व अनेकता यांच्यात मूळ अंतर्भूत असलेली एकता पटून मानवजातीशी, सृष्टीशी आपण एकजीव होतो. ''हे सारे आत्मा आहे असे जो जाणतो; त्या एकतेवर ज्याची दृष्टी स्थिर झाली, त्याला मग शोक कशाचा, कोठला आहे ?'' खरोखर हा आत्माच जो सर्वत्र पाहतो आणि सारे ह्या आत्म्यातच ज्याला दिसते, त्याचा लपंडाव संपला, तो परमात्म्याला भिडला.