आव्हान : 'छोडो भारत' ठराव
पंधरा दिवस कुलू येथे राहून परत आलो तो मला असे दिसू लागले की, देशातील अंतर्गत परिस्थिती फार झपाट्याने बदलते आहे. वाटाघाटी नुकत्याच फिसकटल्या होत्या त्याचा परिणाम खूप झाला होता व देशात अशी भावना पसरली होती की, त्या दिशेने काही उपाय निघेल ही आशा व्यर्थ आहे. पार्लमेंटात व अन्यत्र जी ब्रिटिश सरकारची अधिकृत म्हणून विधाने करण्यात आली त्यावरून ती समजूत खरी ठरत गेली व त्यामुळे हिंदी जनतेचा संताप आला होता. आमचे नेहमीचे साधे कार्यक्रमदेखील दडपून टाकायचे असे हिंदुस्थान सरकारचे धोरण स्पष्टच दिसू लागले व आमच्या भोवतालचे पाश जिकडून तिकडून आवळून घट्ट करणे सुरू झाले. क्रिप्स वाटाघाटी सुरू असतानासुध्दा आमचे पुष्कळ कार्यकर्ते पूर्वीपासून तुरुंगात होते ते तेथेच अडकले होते; आता त्या फिसकटल्यावर माझ्या अगदी जवळच्या मोठमोठ्या मित्रांना व सहकार्यांना डिफेन्स ऑफ इंडिया (हिंदुस्थानचे संरक्षण करण्याचा कायदा) हा कायदा चालवून अटक करण्यात आली व त्यांना शिक्षा होऊन त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. रफी अहमद किडवई यांना मे महिन्याच्या आरंभीच अटक झाली. संयुक्तप्रांतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री. कृष्णदत्त पालिवाल यांची त्यानंतर ताबडतोब तीच गत झाली व त्यांच्या मागोमाग अनेक इतर मंडळींनाही अटक झाली. निवडक पुढार्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातून उचलून न्यावे व अशा रीतीने राष्ट्रीय चळवळ बंद पाडून ती हळूहळू विस्कळित करावी असा सरकारचा बेत दिसू लागला. हे सारे आम्ही मुकाट्याने सहन करावयाचे की काय ? आम्हाला मिळालेली शिकवण ही अशी नव्हती, आमचा राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान या प्रकाराविरुध्द उसळून उठला.
पण युध्दात हा आणीबाणीचा प्रसंग आलेला, हिंदुस्थानावर स्वारी होण्याचा संभव निकट आलेला, अशा परिस्थितीत आम्ही काय करणे शक्य होते ? पण आम्ही स्वस्थ बसण्याने देखील तो प्रसंग आणि ती स्वारी टाळायला काही मदत होण्यासारखी नव्हती, कारण आम्ही तसे स्वस्थ राहिलो तर देशभर अशा काही भावना वाढणार की ज्यांची आम्हाला मोठी चिंता व भीती वाटे. सर्वसामान्य जनतेत नाना प्रकारचे मतप्रवाह वाहात होते, देश अवाढव्य व प्रसंग असा आणीबाणीचा असल्यामुळे तसे होणे साहजिकच होते. प्रत्यक्ष जपान्यांना अनुकूल असे कोणाचेच मत नव्हते, कारण एक गेला तरी दुसरा आपल्या डोक्यावर बसायचा हे कोणालाच नको होते. चीनला अनुकूल असे मत मात्र जिकडेतिकडे जोरात पसरले होते. पण जपानची स्वारी हिंदुस्थानवर झाली तर हिंदी स्वातंत्र्यसंपादनाकरिता त्या संधीचा फायदा करून येता येईल असे समजणारा व त्यामुळे अप्रत्यक्षपणे जपानला अनुकूल मत असलेला एक लहान गट होताच. सरकारच्या अटकेतून निसटून गुप्तपणे हिंदुस्थानबाहेर एक वर्षांपूर्वी गेलेले सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओवरून चालविलेल्या जाहीर प्रचारामुळे या गटाचे तसे मत झाले होते. अर्थात देशातील बहुतेक लोक तटस्थ होते, त्यांचे विशिष्ट असे कोणतेच मत नव्हते, पुढे काय घडते त्याची वाट पाहात बहुतेक लोक मुकाट्याने बसले होते. दुर्दैवाने तसेच काही घडले व हिंदुस्थानपैकी काही मुलूख शत्रूच्या ताब्यात गेला तर त्यांना साथीदार, विशेषत: ज्यांचे मिळकतीचे उत्पन्न मोठे आहे त्या वर्गातले मिळणार हे नक्कीच, कारण आपले प्राण व धन कसेही करून वाचवायचे वेड त्या वर्गाला लागलेले होते. ही साथीदारांची अवलाद, ही वार्याबरोबर पाठ फिरविण्याची वृत्ती; यांची आपल्या कार्याकरिता नीट जोपासना करून ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात त्यांना पूर्वीपासून चढवून ठेवले होतेच. जशी वेळ तशी पगडी फिरविणे या जातीचा सहज सोपे होते, कारण त्यांना स्वत:चे हित तेवढे पाहायचे असते, त्यांना विवंचना नेहमी तीच. जर्मनांच्या ताब्यात गेलेल्या युरोपातल्या फ्रान्स, बेल्जम, नॉर्वे वगैरे देशांतून सुध्दा हाच प्रकार दिसून आला होता. जर्मनांचा प्रतिकार करण्याकरता चालविलेल्या चळवळींना जोम चढला तरी त्याच देशात जर्मनांना साथ देणार्यांचा पूर दुथडी भरून वाहात होता. फ्रान्समध्ये जर्मनांचे साथीदार बनलेल्या मंडळींनी व्हिशी येथे फ्रान्सचे एक सरकार स्थापन करून (पर्टिनॅक्स या लेखकाच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे) ''ज्याची लाज वाटावी तेच भूषण म्हणून कसे मिरवावे; भेकडपणाला धैर्य, क्षुद्रबुध्दी व अज्ञान यांना सुज्ञपणा, अपमानाला नम्रतेचा सद्गुण, व जर्मनांच्या विजयी सेनेपुढे शरणागती घेण्याला राष्ट्राचे नैतिक पुररुज्जीवन, अशी अगदी उलट रूपे देऊन फ्रेंच जनतेला कसे फसवावे, या कामातच आपले बुध्दिसर्वस्व वेचणे'' असे चालविले ते आम्हाला दिसले होतेच. क्रांती व उज्ज्वल देशाभिमान या गुणांकरिता प्रसिध्द असलेल्या फ्रान्स देशाची जर ही गत झाली, तर राज्यकर्त्यांना साथ देण्याची वृत्ती ब्रिटिशांच्या छत्राखाली इतकी वर्षानुवर्षे फोफावलेली व त्याबद्दल इतकी बक्षिसे मिळालेली असताना इकडेही त्या वर्गातील काही मंडळी निघून तोच प्रकार घडणे फारसे अशक्य नव्हते. उलट, दाट संभव असा होता की, ज्यांनी आजपर्यंत ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या हातात हात घालून ब्रिटिशांचे राज्य चालविले होते व आपल्या राजनिष्ठेचा पुकारा प्रत्येक चवाट्यावर ओरडून जाहीर केला होता, तेच लोक या नव्या धन्याच्या हातात हात घालायला सर्वांत पुढे धावत जातील व सर्वांत अग्रगण्य राजनिष्ठ बनतील. हाताला हात लावण्याची ही त्यांची कला त्यांनी लाळ घोटून अगदी पुरी तयार केली होती, व त्यांची ही मुळातली तयारी, वरचे एक जाऊन दुसरे आले तरी, कायमच राहणार होती. त्यातून पुन्हा त्यांच्यावरचे वरबशे बदलले तरी काही हरकत होणार नव्हती; त्यांचे जातभाई जे युरोपमध्ये करीत होते तेच त्यांनीही केले असते; त्यालाही त्यांची तयारी होतीच. क्रिप्स वाटाघाटी फिसकटल्यावर अगोदरपासूनच ब्रिटिशांच्या विरुध्द असलेले लोकमत त्या दिशेला आणखी पुढे गेले होते. जरूर पडली तर ह्या लोकमताचाही फायदा हा संधिसाधू लोकांना घेता आला असता. त्यांच्याप्रमाणे संधिसाधू किंवा वैयक्तिक कारणामुळे नसले तरी इतर भिन्नभिन्न हेतू साध्य करण्यकरिता इतरांनाही ह्या प्रक्षुबध लोकमताचा फायदा घेता आला असता; त्यात त्यांना मागच्या पुढच्या गोष्टींचा व इतर गंभीर प्रश्नांचा विसर पडला असता. ही अशी परिस्थिती व हा असा संभव डोळ्यांपुढे दिसत असल्यामुळे आम्ही अगदी भयचकित झालो होतो व आम्हाला वाटू लागले की, ब्रिटिशांनी हे हिंदुस्थानाबाबतचे धोरण असेच शक्तीच्या जोरावर सक्तीने पुढेही चालले व प्रजा आपला संताप गिळून अशीच स्तब्ध राहिली तर नाही नाही ते अनर्थ घडतील व देशातील जनतेचा संपूर्ण अध:पात होईल.