भारताच्या भूतकाळाचे विहंगम दृश्य
विचार करीत करीत काम करता करता वर्षानुवर्षे खरा भारत म्हणजे काय ते समजून घेण्याचा व माझ्यावर भारताचा काय परिणाम झाला त्याची छाननी करण्याचा माझ्या मनावर छंद जडला होता. मी माझे बाळपण आठवले. त्या वेळेस मला काय वाटे, वाढत्या समजुतीबरोबर भारतासंबंधीचे कोणते अस्पष्ट विचार स्पष्ट आकार घेत होते, नवीन अनुभवांना, त्या आकारांना कसे वळण मिळत गेले ते सारे मी आठवू लागलो. प्राचीन इतिहास-पुराणांतल्या कथा व अर्वाचीन वस्तुस्थिती यांचे विचित्र मिश्रण होत होत सारखी बदलत चाललेली ती मूर्ती केव्हा केव्हा दूर मागे सरकली असे वाटे, पण ती दिसेनाशी कधीच झाली नाही. या मूर्तीचा मला अभिमान वाटे, तशी लाजही वाटे. कारण माझ्या अवतीभोवती धर्माच्या नावाघर चाललेले खुळे आचार व निरूपयोगी झालेल्या धर्मसमजुती दिसत. त्यांची व विशेषत: आपल्या देशाच्या गुलामगिरीची व कंगाल स्थितीची शरम वाटे.
मी वाढत चाललो व भारताला स्वातंत्र्य मिळविण्याच्या आशेने चाललेल्या चळवळीत पडलो असताना भारताच्या विचाराचा मनाने ध्यास घेतला. ज्या भारताने मला पछाडले होते, जो भारत मला सारखी हाक मारीत होता, त्या भारताचे स्वरूप काय ? आमच्या हृदयातील काही खोल, अस्पष्ट अशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून कर्माकडे मला ओढणारा हा हिंदुस्थान, हा भारत म्हणजे एकंदरीत काय ?
मला वाटते आरंभी तरी वैयक्तिक नि राष्ट्रीय स्वाभिमानामुळे दुसर्याची सत्ता झुगारून देऊन स्वेच्छेप्रमाणे स्वतंत्र जीवन जगण्याची प्रत्येकाला इच्छा असते. त्या इच्छेनेच मी प्रेरित झालो होतो. मानवी स्मृतीच्या आरंभाअगोदरच्या अंधुक कालापासून चाललेला अखंड भरगच्च इतिहास असलेला आपला हा देश, आणि त्याचे हातपाय सहा हजार मैलांवरच्या एका लहानशा बेटावरील राजसत्तेने बांधून टाकावे व परक्या सत्तेने या देशावर आपली मन मानेल तशी सत्ता चालवावी ही गोष्ट मला राक्षसी वाटे. आणि त्या सक्तीच्या प्रबंधाने जे अपार दारिद्र्य आले व जो अपार अध:पात झाला त्यामुळे तर ही गोष्ट अधिकच भयंकर नि सैतानी वाटली. मला काय किंवा इतरांना काय स्वातंत्र्याच्या लढ्यात पडायला हे कारण पुरेसे होते.
परंतु माझ्या मनात उभ्या राहणार्या प्रश्नांचे एवढ्याने समाधान होत नव्हते. हा हिंदुस्थान देश म्हणजे काय ? भारतवर्ष म्हणजे काय ? हे प्रत्यक्ष भौतिक स्वरूप तूर्त सोडून दिले, भौगोलिक स्वरूप बाजूला ठेवले, तर त्याशिवाय भारत म्हणजे काय ? भूतकाळात भारत म्हणताच कोणत्या गोष्टी डोळ्यांसमोर येत असत ? त्या काळात कशामुळे भारताला सामर्थ्य लाभले होते ? ते सामर्थ्य त्याने कसे गमावले ? ते सामर्थ्य आज संपूर्णपणे लुप्त झाले आहे का ? फार विशाल संख्या भरेल इतके मनुष्यप्राणी या भारतात वस्ती करून जगत आहेत यापलीकडे या भारतात आजकाल काही जिवंतपणा, काही तत्त्व आहे का ? आजच्या जगात भारताचा उपयोग काय व कसा आहे ?
आजकाल जगापासून अलग राहता येणार नाही, आणि ते इष्टही नाही, हा विचार माझ्या मनात जसजसा पक्का होत गेला तसतसे या प्रश्नाचे व्यापक आंतरराष्ट्रीय स्वरूप माझ्यासमोर अधिक अधिक उभे राहात गेले. हिंदुस्थान नि जगातील इतर देश यांच्यामध्ये राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सहकार्य मनमोकळेपणाने, एकविचाराने, होत आहे असे भविष्यासंबंधीचे चित्र माझ्या मनात येत होते. परंतु भविष्य येण्याआधी आज हा वर्तमान आहे. आणि या वर्तमानकाळापलीकडे, त्याच्या पाठीमागे तो प्राचीन गुंतागुंतीचा दीर्घ इतिहास आहे. त्या भूतकाळातूनच आजचा वर्तमानकाळ जन्माला आला आहे. म्हणून सारे समजून घेण्यासाठी मी भूतकाळाकडे वळलो.