खरे आहे, सरकार म्हणजे नफा-तोटा पाहात बसणारे दुकान नव्हे हे खेरे, पण काय असेल ते असो, सरकारला असल्या दुकानांचा, व्यापारी कंपन्यांचा मोठा उमाळा येई, आणि असली एक कंपनी म्हणजे 'इंपिरीयल केमिकल्स', औषधी द्रव्ये तयार करणार्‍या विलायती कारखान्यांचा एक संघ.  या प्रचंड संघाला हिंदुस्थानात अनेक सवलती मिळत होत्या.  अशा सवलती नसत्या तरीसुध्दा त्यांच्याजवळ असे अजस्त्र भांडवल होते की, टाटाखेरीज दुसर्‍या कोणत्याही हिंदी कंपनीला त्यांची बरोबरी करू पाहणे शक्यच नव्हते, व टाटा कंपनीलासुध्दा ते फारसे जमले नसते.  हिंदुस्थानात तर या सवली 'इंपिरीयल केमिकल्स' ला मिळतच, पण त्याखेरीज हिंदुस्थानातील व इंग्लंडमधील मोठमोठ्या सत्ताधार्‍यांचेही तिला पाठबळ होते.  हिंदुस्थानचे व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड लिनलिथगो यांचा जो अवतार होता तो समाप्त झाल्यावर, त्यांचा नव्याने अवतार या इंपिरीयल केमिकल्सचे डायरेक्टर या रूपाने झाला.  इंग्लंडमधील करोडोपती श्रेष्ठी व हिंदुस्थान सरकार यांचे संबंध किती घनिष्ठ होते हे ह्या उदाहरणावरून स्पष्ट होते व असे घनिष्ठ संबंध असले म्हणजे त्यांचा सरकाकरी धोरणावर नक्की परिणाम व्हायचाच हेही उघड दिसते.  हिंदुस्थानचे व्हाईसरॉय असतानाच लॉर्ड लिनलिथगो यांच्या मालकीचे शेअर या कंपनीत खूप असावेत.  ते काहीही असो वा नसो, हिंदुस्थानात पडलेले आपले वळण व व्हाईसरायचे काम करीत असताना आपल्याला मिळालेली खास माहिती यांचा फायदा घेण्याची मोकळीक लॉर्ड लिनलिथगो यांनी आता तरी त्या कंपनीला करून दिली आहे.

व्हाईसरॉय या नात्याने १९४२ साली लॉर्ड लिनलिथगो म्हणाले, ''युध्दाच्या कामी सामग्री पुरविण्यात आम्ही मोठी प्रचंड कामगिरी करून दाखविली आहे.  हिंदुस्थानने युध्दाच्या कामाचा उचललेला वाटा मोठा महत्त्वाचा, बहुमोल आहे.  युध्दाला सुरूवात झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जवळजवळ एकोणतीस लक्ष रुपयांची मालाची कंत्राटे आम्ही दिली.  एप्रिल ते ऑक्टोबर १९४२ या महिन्यांच्या अवधीत दिलेली कंत्राटे १३७ कोटींची होती.  ऑक्टोबर १९४२ अखेरपावेतोची सबंध मुदत हिशेबात घेतली तर ही रक्कम ४२८ कोटींपेक्षा कमी भरणार नाही, आणि याशिवाय युध्देपयोगी सामानाच्या सरकारी कारखान्यातून जे खूप काम झालो ते वेगळेच.''*  ही सर्व विधाने खरी, अगदी बराबर आहेत व ती त्यांनी केल्यानंतरच्या काळात या युध्दाच्याकामी हिंदुस्थानने उचललेला कामाचा भाग अतोनात वाढला आहे.  तेव्हा कोणाचीही अशी समजूत होईल की, हिंदुस्थानातले उद्योगधंद्यांचे कारखाने अगदी भरपूर काम करण्यात गढून जाऊन त्यांचे काम भलतेच वाढले आहे, उत्पादनाचा आकडा खूप फुगला आहे.  पण नवल असे की, युध्दापूर्व काळात व युध्दाच्या या काळात काही मोठासा फरक पडलेला नाही.  १९३५ सालातील उद्योगधंद्यांचा चिन्हांक १०० धरला तर १९३८-३९ साली तो १११.१ झाला होता.  १९३९-४० साली तो ११४.० होता; १९४०-४१ साली तो ११२.१ ते १२७.० ह्या दरम्यान फिरत होता; मार्च १९४२ मध्ये तो ११८.९ तो एप्रिल १९४२ मध्ये १०९.२ पर्यंत खाली आला व नंतर हळूहळू जुलै १९४२ पावेतो वाटत जाऊन त्या जुलैमध्ये ११६.२ झाला.  हे जे आकडे दिले आहेत त्यांत युध्देपयोगी सामान व रासायनिक द्रव्यांचे कारखाने यांचे आकडे आलेले नाहीत त्यामुळे ते पुरे आकडे नाहीत.  पण तरीसुध्दा ते महत्त्वाचे व सूचक आहेत.

हे आकडे सालवार लक्षात घेतले तर त्यांतून एक आश्चर्य बाहेर येते ते हे की, हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांच्या कारखानदारीचा व्याप, सन १९४२ जुलैमध्ये, दारूगोळा वगैरे सामान सोडले तर, युध्दापूर्व काळापेक्षा फारच थोडा वाढला होता.  १९४१ या डिसेंबरमध्ये चिन्हांक १२७.० झाला तेव्हा थोडीफार तात्पुरती तेजी दिसते व नंतर लगेच मंदी दिसू लागते; आणि इकडे पाहावे तर सरकारने मक्तेदारांना दिलेल्या कंत्राटांनी रक्कम सारखी वाढतच गेलेली दिसते.  खुद्द लॉर्ड लिनलिथगो यांच्या म्हणण्याप्रमाणे पाहिले तर १९३९ ऑक्टोबर ते १९४० मार्च पर्यंतच्या सहामाहीत या कंत्राटांची रक्कम ३९ कोट रूपये झाली तर १९४२ च्या एप्रिल ते ऑक्टोबरच्या सहामाहीत ती १३७ कोट रुपये झाली.
------------------------
*  हे सर्व आकडे रुपयांचे आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel