काँग्रेस राजवट अल्पकाळच होती.  परंतु एक गोष्ट अधिकच स्पष्ट झाली की, हिंदुस्थानच्या प्रगतीच्या मार्गातील खरा अडथळा ब्रिटिशांनी आमच्यावर लादलेल्या राजकीय आणि आर्थिक चौकटीचा आहे.  आमच्या प्रगतीच्या आड अनेक रूढी, परंपरागत आचारविचार येतात आणि त्यांचीही हकालपट्टी केली पाहिजे, ही गोष्ट नि:संशय खरी.  परंतु हिंदी आर्थिक स्थितीच्या विकासाच्या आड आमच्या रूढी किंवा आचारविचार तितके येत नव्हते, जितका ब्रिटिशांनी लावलेला राजकीय आणि आर्थिक गळफास येत होता.  ही पोलादी चौकट नसती तर आर्थिक विकास अपरिहार्यपणे झालाच असता आणि आर्थिक वाढीबरोबर अनेक सामाजिक फेरबदल आले असते आणि जुनाट रूढी, चालीरीती, विधींची अवडंबरे यांचा अस्त झाला असता.  म्हणून ही पोलादी चौकट भंगून टाकण्यावरच सर्व सामर्थ्य एकवटणे आवश्यक होते.  दुसर्‍या सटरफटर गोष्टींवर उत्साहशक्ती खर्च करणे म्हणजे वाळूत नांगर धरण्याप्रमाणे निष्फळ होते.  ही पोलादी चौकट अर्धवट सरंजामशाही पध्दतीच्या जमीनदारी पध्दतीवर आणि अनेक भूतकालीन अवशेषांवर आधारलेली होती.  त्यांचा या चौकटीला आधार आणि चौकटीचा त्यांना अधार.  ही पोलादी चौकट ह्या सर्व सरंजामशाही अवशेषांना रक्षण देत असते.  ब्रिटिशांची ही राजकीय आणि आर्थिक चौकट येथे आहे तोवर कोणत्याही स्वरूपातही लोकशाही हिंदुस्थानात शक्य नाही.  लोकशाहीचे आणि या पोलादी चौकटीचे जमायचे कसे ? दोहोंत संघर्ष अनिवार्य असणार आणि म्हणून १९३७-३९ काळातील अर्धवट लोकशाहीचा तो प्रयोग चालू असताना केव्हा पेचप्रसंग येतो, केव्हा झगडा सुरू होतो अशी चिंता सदैव असे.  आणि हिंदुस्थानात लोकशाहीचा प्रयोग यशस्वी झाला नाही असा ब्रिटिश अधिकार्‍यांचा आरडाओरडा.  त्यांचे लक्ष पोलादी चौकट कशी टिकेल, त्यांनी निर्माण केलेली फल्ये आणि विशिष्ट मिरासदारी हितसंबंध कसे टिकतील इकडेच सारे असे.  येथे लोकशाही यशस्वी होणे शक्य नाही, कधी झाली नाही असेच ते म्हणणार, असाच डांगोरा पिटणार.  ब्रिटिशांना हवी असलेली लुळीपांगळी, लाळघोटी, साहेबधार्जिणी लोकशाही न येता, क्रांतिकारक फरक करू पाहणारी लोकशाही येत आहे असे दिसताच, लोकशाहीचे सारे नाटक बंद करून केवळ हुकूमशाही कारभार सुरू करणे हाच त्यांच्यासमोर आता दुसरा मार्ग होता.  युरोपातील फॅसिझमचा जन्म आणि वाढ आणि हिंदुस्थानातील ब्रिटिशांची ही वाढती दृष्टी यात विलक्षण साम्य आहे.  ज्याचा ब्रिटिश लोक मोठा अभिमान बाळगतात ते कायद्याचे राज्यही हिंदुस्थानातून नाहीसे होऊन त्याच्या जागी वटहुकुमांची, फर्मानांची राजवट सुरू झाली.  वेढा घातलेले राष्ट्र अशी हिंदुस्थानची स्थिती होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel