चीन देशात तयार होणार्‍या रेशमी वस्त्रांचा चीनपट्ट, चीनांशुक असा उल्लेख येतो, व हिंदुस्थानातील रेशमी माल व चिनी रेशमी माल यांच्यात भेद करण्यात आलेला आहे.  हिंदी रेशमी माल तितका तलम नसावा असे वाटते.  चिनी रेशमी माल आणि रेशीम हिंदुस्थानात येई यावरुन ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात हिन्दुस्थानात आणि चिनात व्यापारी दळणवळण होते हे सिध्द होते.

राज्याभिषेकाच्यासमयी राजाला प्रजेची सेवा करण्याची शपथ घ्यावी लागे.  ''मी तुमच्यावर जुलूम, तुम्हांला जाच केला तर माझे निसंतान होवो, माझे प्राण जावो, मला स्वर्ग अंतरो''; ''प्रजेच्या कल्याणातच राजाचे कल्याण, प्रजेच्या सुखात त्याचे सुख, आपल्याला प्रिय वाटते ते चांगले असे राजाने कधी समजू नये, तर प्रजेला जे प्रिय ते चांगले असे त्याने सदैव समजावे''; ''राजा उद्योगी असेल तर प्रजाही उद्योगी राहते''; ''राजाच्या लहरीवर सार्वजनिक काम अडून राहता कामा नये, पडेल ते काम करण्याला राजाने सदैव सिध्द असले पाहिजे.'' राजा दुराचारी, दुर्वर्तनी निघाला तर त्याला परच्युत करुन, दुसर्‍याला त्याच्या जागी बसविण्याचा प्रजेला हक्क आहे.

बंदरे, ठिकठिकाणी नदीपार ये-जा करणार्‍या तरी, पूल व नद्यांतून समुद्रापर्यंत व समुद्रावरुन ब्रह्मदेश वगैरे परद्वीपाला खेपा करणार्‍या नौका व मोठी गलबते या सर्वांची व्यवस्था पाहणारी एक नौकानयन शाखाही राज्यव्यवस्थेत होती.  सैन्याला मदत म्हणून काही एक स्वरुपाचे आरमारही होते असे दिसते.

साम्राज्यातील व्यापार भरभराटलेला होता.  दूरदूरच्या प्रदेशांना जोडणारे मोठमोठे रस्ते होते व प्रवाशांसाठी ठिकठिकाणी विश्रांतिगृहे होती.  मुख्य रस्त्याला राजमार्ग असे नाव होते.  तो पाटलिपुत्र राजधानीपासून तो थेट वायव्यसरहद्दीपर्यंत गेला होता.  परदेशच्या व्यापार्‍यांचे विशेष उल्लेख आहेत. त्यांची नीट सरबराई असे, व्यवस्था करण्यात येत असे.  त्यांना काही स्वतंत्र प्रादेशिक हक्क असावेत असे वाटते.  काही उल्लेखांवरुन असे दिसते की, जुने मिसर लोक आपली प्रेते मसाल्यात पुरुन ठेवीत असत, त्या प्रेतांच्याभोवती हिंदुस्थानातील मलमल असे; तसेच मिसर लोक हिंदुस्थानातील नीळ नेऊन आपले कापड रंगवीत असत.  प्राचीन अवशेषांत एक प्रकारची काचही सापडली आहे.  ग्रीक वकील मेग्यास्थेनीस लिहितो की हिंदू लोकांना नीटनीटकेपणाची, सुंदर कपड्यांची, सौंदर्याची आवड होती.  स्वत:च्या उंचीत भर म्हणून एक प्रकारचे चढाव ते वापरीत असाही तो उल्लेख करतो.

मौर्य साम्राज्यात एक प्रकारची ऐष-आरामी वाढत होती.  जीवन अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊन धंदेव्यवसाय व राहणीत भेदाप्रमाणे वर्ग जास्त स्पष्ट व सुसंघटित झाले होते.  ''खानावळी, उपाहारगृहे, घोड्यावरुन प्रवासाकरता अश्वशाला, सराया, जुवा खेळण्याचे अड्डे ठायी ठायी होते; निरनिराळे धर्मसंप्रदाय व धंद्याचे संघ यांची सभास्थाने असत, व धंद्यांचे संघांचे भोजनसमारंभ होत.  करमणुकीच्या धंद्यावर अनेकांचे पोट भरत असे.  नाचणारे, गाणारे नट असे नाना धंदे होते.  हे लोक आपापल्या धंद्याकरता खेड्यातूनही जात.  अर्थशास्त्राचा ग्रंथकार म्हणतो, ''खेड्यापाड्यांतून नाट्य-नृत्य-गायनाकरता, नेहमी उपयोगाकरता म्हणून सार्वजनिक गृहे राहू देणे बरे नाही.  कारण त्यामुळे लोकांचे संसारातील लक्ष व शेतीभातीकडचे लक्ष कमी होऊन अन्यत्र जाते.  परंतु सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करण्यास कोणी मदत नाकारली तर त्याला दंडही होत असे.  राजाने ठिकठिकाणी विशाल अर्धचंद्राकृती रंगशाला बांधल्या होत्या.  त्यांतून नाटके, मुष्टियुध्दे व इतरही खेळांचे सामने, तसेच पशु-पक्ष्यांचे खेळ, हत्ती, बैलांच्या, रेड्यांच्या झुंजी यांचे कार्यक्रम सरकारकडून करण्यात येत.  प्रदर्शने भरविली जात व त्यांतून आश्चर्यकारक वस्तूंची चित्रे ठेवीत.  अनेकदा उत्सवप्रसंगी रस्त्यांवरुन दीपोत्सव करण्यात येत.* तसेच राजाची स्वारी समारंभाने, थाटात मिरवत जाई व मृगया करण्याकरताही सरकारी समारंभ होत.

----------------

* डॉ. एफ. डब्ल्यू. थॉमस-केंब्रिज-' हिंदुस्थानचा इतिहास '-भाग पहिला-पान ४८०.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel