या योजनेत चालू प्रसंगी लवकर अमलात येण्याकरिता काही आहे की काय हे पाहू गेले तर त्याबद्दलचा उल्लेख अगदी मोघम व अर्धवट होता. स्पष्ट होते ते हे की हिंदुस्थानच्या संरक्षणाबाबत काहीही करावयाचे असेल तर ती संरक्षणबाब फक्त ब्रिटिश सरकारच्याच हाती राहावी. सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी वारंवार जी विधाने केली त्यावरून असे दिसत होते की, संरक्षणाची बाब सोडून बाकीच्या राज्यकारभाराच्या इतर सर्व खात्यांवर हिंदी नियंत्रण पूर्णपणे चालावे, ती सर्व खाती हिंदुस्थानच्या हाती सोपविण्यात येणार. इंग्लंडच्या राजाला जसे राज्यघटनेने बंधने घालून नुसते राजप्रमुख एवढेच स्थान आहे तसेच व्हॉइसरॉयचे अधिकार मर्यादित करावयाचे, त्यांच्याकडे नुसती नावापुरती सत्ता ठेवावयाची आहे असेसुध्दा आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आमची अशी कल्पना झाली की, आता वाद उरला तो फक्त संरक्षणाच्या बाबीचा, त्यावर अधिकार कोणाचा चालावयाचा एवढ्याबद्दलच काय तो मतभेद उरला आहे. आमचे म्हणणे असे होते, युध्दकाल म्हणून युध्दाची सबब पुढे करून संरक्षणाच्या नावाखाली राष्ट्रीय सरकारचे सर्व कामकाज व सर्वच अधिकार व्यापले जातील, व नुसती सबब म्हणून नव्हे तर बव्हंशी ते प्रत्यक्ष खरेही होते. राष्ट्रीय सरकारच्या कार्यक्षेत्रातून संरक्षणाची बाब म्हणून जे काही वगळले जाचे ते सोडल्यास राष्ट्रीय सरकारचे अधिकार व कार्यक्षेत्र फारच थोडे उरत होते. सर्व प्रकारच्या सेनेवर व सैन्यव्यवस्था, सेनांची हालचाल वगैरे युध्दकार्यावर आजपावेतो जशी ब्रिटिश सरसेनापतींची सत्ता चालत आली तशीच ती पुढे चालू ठेवावी हे उभयतांना मान्य होते. युध्दाचा सगळीकडचा रागरंग पाहून तद्नुरूप व्यापक सैन्यबल योजना करण्याचा अधिकार साम्राज्याच्या सेनापतिमंडळाकडे असावा हेही मान्य होते. परंतु याखेरीज आमची अशी मागणी होती की, राष्ट्रीय सरकारात एक संरक्षणमंत्री असावा.
या मुद्दयावर थोडी वाटाघाट झाल्यावर सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी असेही मान्य केले की, एका हिंदी अधिकार्याच्या हातात असलेले एक संरक्षण खातो काढणे शक्य होईल, परंतु संरक्षण खात्याच्या अधिकारक्षेत्रात येणार्या कामाची यादी अशी, जनतासंबंध, पेट्रोल, सैनिकाकरता खाद्यपेये व इतर वस्तू व सुखसोयी पुरवण्याकरता चालविलेली भांडारे, लेखनोपयोगी सर्व प्रकारचे सामान व छपाईची व्यवस्था, परदेशातून येथे काही सार्वजनिक कामगिरी करण्याकरिता आलेल्या मंडळांची येथील समाजात ओळखपाळख व्हावी, त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून काही कार्यक्रमांची योजना करणे, लष्करी लोकांकरिता सुखसोयींची व्यवस्था करणे, वगैरे वगैरे. ही यादी काही और होती व तिच्यामुळे हिंदी संरक्षणमंत्र्याचा हुद्दा म्हणजे एक मस्करी होत होती. आणखी काही वाटाघाट झाल्यावर वादविषयाला दुसरी एक बाजू दिसू लागली. आमच्यामध्ये अद्याप मोठी खिंड आडवी येत होती, पण आम्ही एकमेकाजवळ येत चाललो आहोत असे वाटे. तेव्हा मला व इतरांनाही या सुमारास प्रथमच वाटू लागले की, काहीतरी तडजोड निघणे शक्य आहे. युध्दातील निकडीचा प्रसंग अधिकाधिक बिकट होऊ लागला होता त्याची आम्हा सर्वांनाच सारखी टोचणी लागली होती, व काहीतरी तडजोड काढणे अगत्य झाले होते.
हिंदुस्थानावर हल्ला होण्याचा व येथे युध्द पेटण्याचा फार मोठा धोका जवळ आला होता व काहीही झालो तरी त्याला तोंड देणे प्राप्त होते. तसे करण्याचे मार्ग अनेक होते, पण तसा विचारच केला तर खरोखर चालू काळात लागू पडेल व विशेषत: भविष्यकाळी विशेषच गुणकारी होईल असा उपाय एकच होता. जे घडावे असे आमच्या मनात होते ते घडण्याची ही ऐनवेळ कदाचित तशीच, काही न घडता, निघून गेली तर तिच्या पाठोपाठ चालू काळात नाना संकटे येतील ती येतीलच, पण शिवाय भविष्यकाळात त्याहीपेक्षा मोठी संकटे आमच्यावर ओढवतील असे आम्हाला वाटे, ह्या एकमेज्ञा गुणकारी उपायाकरता जुनी साधने तर पाहिजे होतीच, पण त्याखेरीज नव्या साधनांचीही जरूर होती. ही नवी-जुनी साधने वापरण्याची नवी हातोटी पाहिजे होती, नवे संचार अंगात यायला पाहिजे होते, भूतकाळ व वर्तमानकाळ याहून वेगळी परिस्थिती आणणारा भविष्यकाळ नक्की येणार अशी श्रध्दा उत्पन्न होणे अवश्य होते, व तशी श्रध्दा बसायला पुरावा म्हणून तूर्त हल्लीच्या परिस्थितीत ठळक फरक दिवायला पाहिजे होता. कदाचित असेही झालो असेल की, आमच्या मनाच्या उत्सुकतेमुळे आम्हाला सगळे शुभ घडणार असे आमच्या डोळ्यांना दिसू लागले. ब्रिटनचे राज्यकर्ते व हिंदुस्थानातले आम्ही लोक यांच्या दरम्यान जी भयाण दरी पसरली होती तिचा आम्हाला क्षणभर विसर पडला, निदान तिचा विस्तार, तिची खोली कमी वाटू लागली. संकटेच संकटे व त्यांच्या पलीकडे सत्यानाश अशी रांग डोळ्यापुढे उभी राहिली तरी शतकेच्या शतके चाललेला लढा सुटणे सोपे नव्हते, आपल्या अमलाखाली आलेल्या कोणत्याही देशावरची पकड जबरदस्तीने तोडल्याखेरीज सोडणे कोणत्याही साम्राज्यसत्तेला सोपे नव्हते. अशी जबरदस्ती करण्याचे सामर्थ्य परिस्थितीच्या अंगी आले होते का ? वेळ तशीच आलेली आहे असे या साम्राज्यसत्तेला पटले होते का ? आम्हाला नक्की माहीत नव्हते, पण आम्हाला आशा वाटे की, परिस्थिती तशी झालेली आहे, वेळ तशीच आलेली आहे.