कोणत्याही देशात तेथील राज्यकारभार चालविणारे जे सरकार असते, ते आपल्या भल्याबुर्या कृत्यावर लोकव्यवहारातल्या कसल्याही शिष्टाचाराचे, कसल्यातरी युक्तीचे पांघरूण निदान आपली लाज राखण्याकरिता तरी घालते, पण प्रस्तुत प्रसंगी हिंदुस्थान सरकारने तेही वस्त्र ओढून काढून झुगारून दिले आणि आपली सत्ता व सामर्थ्य निवळ अत्याचाराच्या जोरावर लोकांना पटवून देण्याचा नंगा कारभार सुरू ठेवला. लपवालपवीचे सरकारला काही कारणच उरले नव्हते, कारण हिंसाबलाने किंवा अहिंसेच्या मार्गाने देशात ब्रिटिशसत्तेच्या ऐवजी राष्ट्रीय सत्ता स्थापन करण्याचे सारे प्रयत्न चिरडून टाकण्यात ब्रिटिश सत्तेला यश आले होते, हिंदुस्थानात तिला तोंड द्यायला कोणी उरलेच नव्हते. ज्या अखेरच्या कसोटीत शेवटी सामर्थ्य व सत्ता यांचाच विजय होतो जेथे अंगात सामर्थ्य व हातात सत्ता नसली तर बाकी सारे काही निरर्थक काथ्याकूट ठरते त्या कसोटीला हिंदुस्थान उतरला नव्हता. हिंदुस्थानच्या पदरी अपयश आले याची कारणे ब्रिटिश सरकारचे सशस्त्र सैन्यबळ व या महायुध्दामुळे आलेल्या परिस्थितीने लोकांच्या मनात उडालेला गोंधळ, एवढीच नव्हती. स्वातंत्र्याकरिता सर्वस्वाचा होम करून त्यात शेवटची आहुती प्राणाची देणे अवश्य आहे, तो त्याग करायला खुद्द हिंदुस्थानातलेच पुष्कळ लोक सिध्द झाले नव्हते हेही आणखी एक कारण त्या अपयशाला होते. म्हणूनच ब्रिटिशांना आपली सत्ता हिंदुस्थानात पुन्हा एकदा स्थिर झाली असे वाटायला लागले व त्यांना ती सत्ता सोडायला काही कारण आढळले नाही.
सन १९४२ च्या प्रकारांचे बाहेरच्या देशावर झालेले परिणाम
हिंदुस्थानात जे काही प्रकार चालले होते त्यावर सरकारने कडक वार्ता-नियंत्रणाचा जाड पडदा सोडून ते जगाच्या दृष्टिआड केले होते. रोजच्या रोज घडत असलेले कितीतरी प्रकार होते, पण त्यातले फारसे हिंदुस्थानातल्या वर्तमानपत्रांतूनसुध्दा येत नव्हते, कारण ते प्रसिध्द करायला या वार्तानियंत्रणाची बंदी होती आणि बाहेर देशाला पाठवायच्या वार्तेवर तर त्याहूनही अधिक नियंत्रण होते. त्याच कालात सरकारने मात्र बाहेरदेशांतून आपल्या पक्षाचा प्रचार मोकळ्या हाताने चालविला होता व सर्वस्वी खोटेनाटे विकृत वृत्तान्त बाहेरदेशांतून पसरविले जात होते. अमेरिकन लोकमताची सरकारला विशेष आस्था वाटत असल्यामुळे अमेरिकेवर या अपप्रचाराचा लोंढा सरकारने सोडला व तेवढ्याकरिता त्या देशात दौरा काढून जिकडे तिकडे व्याख्याने देण्याकरिता व तसली कामगिरी करण्याकरिता शेकडो इंग्रज व हिंदी लोकांना अमेरिकेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
हा एवढा प्रचार सरकारतर्फे चालला नसता तरीसुध्दा इंग्लंडातले लोक या युध्दात पुढे काय होणार ह्याची चिंता लागल्यामुळे व युध्दकाळात त्यांच्यावर ताण पडल्यामुळे अगोदरच त्रासले होते, त्यांना हिंदी लोकांचा, आणि विशेषत: ज्यांनी या आणीबाणीच्या प्रसंगी त्यांच्या स्वत:च्या अडचणीत भरीला भर घातली त्यांचा राग येणे स्वाभाविक होते. त्यातच या एकतर्फी प्रचाराची व आपण जे काही करतो ते न्यायाचेच असते अशी ब्रिटिशांची नेहमीच खात्री असते, या आपले ते खरे मानण्याच्या वृत्तीची आणखी भर पडली. इतरांना काय वाटते याची जाणीव मनाला नसायची या वृत्तीतच ब्रिटिशांचे सारे बळ साठवलेले होते. ब्रिटिशांकरिता म्हणून कोणी काहीही केले तरी ते न्यायाचेच असणार अशी त्यांच्या मनाला ग्वाही द्यायला ही वृत्ती समर्थ होती. तसेच, काही वेडावाकडा प्रकार आपल्याकरिता खटपट करताना कोणाच्या हातून घडला तर त्या दोषाचे खापर, आम्हा ब्रिटिशांच्या एवढा ढळढळीत दिसणारा चांगुलपणा पाहायलासुध्दा ज्यांची तयारी नाही त्यांच्या दुष्ट मनोवृत्तीवर फोडायलाही ब्रिटिशांची ही (आपली ते खरी मानण्याची) मनोवृत्ती पुरेशी होती. ब्रिटिशांच्या चांगुलपणाबद्दल संशय घेण्याचे धाडस ज्या कोणी केले त्यांना ब्रिटिशांच्या फौजेने व हिंदी पोलिसांनी ठेचून काढले, तेव्हा ब्रिटिशांचा चांगुलपणा पुन्हा एकवार सिध्दच झाला होता. साम्राज्यशाही हीच राज्यपध्दती उत्तम असेही हे बंड शमले यावरून ठरले, आणि मि. विन्स्टन चर्चिल यांनी साम्राज्यासंबंधी, विशेषत: हिंदुस्थानला उद्देशून असे उद्गार काढले की ''मी राजेसाहेबांचा पंतप्रधान झालो तो काही ब्रिटिश साम्राज्याच्या विसर्जन-समारंभाचा अध्यक्ष व्हायला झालो नाही.'' मिस्टर चर्चिल हे बोलले तेव्हा त्यांनी त्यांच्या देशबांधवांच्यापैकी बहुतेकांच्या जे मनात होते तेच बोलून दाखविले यात शंका नाही. ज्यांनी यापूर्वी साम्राज्यशाहीचे तत्त्व व आचार यावर टीकेची झोड उठविली होती अशाही ब्रिटिश लोकांपैकी बहुतेकांचे मत या प्रसंगी मिस्टर चर्चिल यांच्या मुखातून निघाले. ब्रिटिश कामगार पक्षाच्या नेत्यांना साम्राज्यशाही परंपरेवरची आपली निष्ठा इतर कोणत्याही ब्रिटिश पक्षापेक्षा कमी नाही असे दाखविण्याकरिता काही तरी करून दाखविण्याची फार तळमळ लागली होती. त्यांनी चर्चिलसाहेबांच्या या वक्तव्याला अनुमोदन देऊन युध्दोत्तर कालात ब्रिटिश साम्राज्य अखंड राखण्याचा सर्व ब्रिटिश लोकांचा निर्धार आहे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले.''