मला फ्रान्समधील बुध्दिमान वर्गातील एका कार्यकर्त्या व्यक्तीने विचारलेला हा प्रश्न मोठा नमुनेदान वाटला. परंतु युरोप-अमेरिकेत क्वचितच कोणी असल्या गोष्टींत डोके घालील. आजकालच्या प्रश्नांनीच त्यांचे डोके सुन्न झालेले असते. मालरोंच्या डोक्यातही हे जागतिक प्रश्न थैमान घालीत होते व म्हणूनच त्यांचे उत्तर शोधण्याकरता त्यांची प्रबळ आणि चिकित्सक बुध्दी जेथे जेथे म्हणून काही प्रकाश मिळेल, भूतकाळ असो की वर्तमानकाळ असो, जेथे जेथे विचाररूपाने लेखनात व भाषणात, सर्वांत उत्तम म्हणजे कृतीच्या रूपाने जीवनमरणाच्या खेळात प्रकाश मिळेल, तेथे तेथे तो घ्यायला सिध्द होती.
केवळ चर्चेसाठी म्हणून मालरोंनी तो प्रश्न विचारला नव्हता. त्यांच्या डोक्यात तो प्रश्न शिरला होता, आणि आमची भेट होताक्षणी एकदम तोच प्रश्न त्यांनी विचारला. माझ्या मनातलाच तो प्रश्न होता, किंवा खरे म्हणजे माझ्या मनातही अशाच प्रकारच्या स्वरूपाचा प्रश्न सारखा येत होता. परंतु त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्याला किंवा मला स्वत:ला मी देऊ शकलो नाही. या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत. खुलासे, विवेचने, विवरणाचे भारेच्या भारे आहेत. परंतु प्रश्नाच्या मुळाशी कोणी हात घातला आहे असे दिसत नाही.
हिंदुस्थानातून बौध्दधर्माचे उच्चाटन केले गेले असे नाही, छळ करून त्याला हद्दपार करण्यात आले असेही नाही. कधीकधी हिंदू राजा आणि त्याच्या राज्यातील प्रबळ झालेल्या संघारामातील बौध्दभिक्षू यांची तात्पुरती किरकोळ भांडणे होत. परंतु ही भांडणे धार्मिक नसून राजकीय असत आणि त्यामुळे काही मोठा परिणाम होत नसे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, हिंदुधर्म अगदी पूर्ण नाहीसा होऊन त्याच्या जागी बौध्दधर्म आला असे कधीच झाले नव्हते. हिंदुस्थानात बौध्दधर्म अगदी कळसाला पोचला होता, त्या वेळेसही हिंदुधर्म सर्वत्र प्रचलित होता. बौध्दधर्माला हिंदुस्थानात स्वाभाविक मरण आले; किंवा अगदी बरोबर वर्णन करायचे म्हणजे तो हळूहळू अस्तंगत होत गेला. एका नवीन स्वरूपात त्याचे रूपांतर झाले. कीथ म्हणतो, ''नवीन गोष्टींना, उसन्या घेतलेल्या तत्त्वांना आपल्यात मिळवून घेण्याची एक अपूर्व शक्ती हिंदुस्थानजवळ आहे.'' दुसर्या देशापासून विजातियांपासून उसन्या घेतलेल्या गोष्टींच्याबाबत जर हे सत्य असेल तर मग जे भारतातच जन्मले, येथील मनोबुध्दीतूनच जे प्रकट झाले, ते आत्मसात करणे किती सोपे गेले असेल याची कल्पना करावी. बौध्दधर्मच केवळ हिंदुस्थानचे लेकरू होते असे नव्हे, तर त्याचे तत्त्वज्ञानही पूर्वीच्या औपनिषदिक विचारांशी, वेदान्ताशी मिळतेजुळते होते. उपनिषदांनी सुध्दा उपाध्ये, विधींचे अवडंबर यांची थट्टा केली आहे; जातीचे, वर्णाचे महत्त्व कमी केले आहे.