विवेकानंद हे योग आणि वेदान्ताचे अर्वाचीन काळातील एक मोठे पुरस्कर्ते होते.  त्यांनी योगशास्त्र म्हणजे एक प्रयोगशास्त्र आहे, त्या तर्कशुध्द बुध्दिप्रामाण्याचे फार महत्त्व आहे, हे वारंवार आग्रहपूर्वक सांगितले आहे.  ते म्हणतात, ''या विविध योगामार्गांत कोणत्याही योगात आपली बुध्दी सोडून आंधळे व्हा, धर्मोपदेश सांगणार्‍याच्या स्वाधीन आपली बुध्दी करा असे सांगितलेले नाही.'' स्वत:च्याच बुध्दीचा आश्रय धरा, बुध्दीला घट्ट धरून ठेवा असेच सारे योग सांगत आहेत.  योग आणि वेदान्त यांतील वृत्ती शास्त्रीय वृत्तीशी जुळती असली तरी त्यांची साधने भिन्नभिन्न आहेत आणि म्हणून महत्त्वाचे फरक हळूहळू पडतात.  योगाप्रमाणे आत्मा केवळ बुध्दिमर्यादित नाही.  तसेच, ''विचार म्हणजेही कर्मच; आणि विचाराला जर काही किंमत येत असेल तर कर्मानेच.''  स्फूर्ती, अंतर्दृष्टी यांना मान्यता दिलेली आहे.  परंतु त्यातून फसवणूक होणेही शक्य नाही का अशी शंका निघते.  विवेकानंद उत्तर देताना म्हणतात की, ''सहजस्फूर्ती ही बुध्दिविरोधी असता कामा नये.''  ज्याला आपण स्फूर्ती म्हणतो ती स्फूर्ती म्हणजे बध्दीचाच विकास. अंत:स्फूर्तीकडे बुध्दीच्याच द्वारा आपण जातो.  खरी अंत:प्रेरणा बुध्दिविरोधी कधीच नसते.  जेथे ती अशी असेल तेथे ती अंत:प्रेरणा नाही असे खुशाल समजावे.  आणखी ते म्हणतात, ''अंत:प्रेरणा ही सर्वांच्या कल्याणासाठीच असते, ती कधीही स्वत:च्या नावासाठी, कीर्तीसाठी, फायद्यासाठी नसते.  अंत:प्रेरणा विश्वहितार्थ असली पाहिजे, केवळ नि:स्वार्थी असली पाहिजे.''

तसेच, ''अनुभूती हेच एक ज्ञानप्राप्तीचे साधन' असे म्हटले आहे.  शास्त्रांच्या बाबतीत, ह्या बाह्य ज्ञानाच्या बाबतीत, ज्या संशोधनपध्दतींचा अवलंब करण्यात येत असतो, त्यांचा धर्माच्याही बाबतीत उपयोग करावा.  विवेकानंद म्हणतात, ''अशा संशोधनामुळे एखादा धर्म नष्ट होत असेल तर खुशाल होऊ दे, कारण तो धर्मच नाही,  काहीतरी निरुपयोगी, क्षुद्र अंधश्रध्देचा विषय आहे.  आणि जितक्या लवकर तो नष्ट होईल तितके चांगले.'' ''बुध्दीच्या मर्यादा आम्ही मानणार नाही असे धर्माने का म्हणावे, असा हक्क त्यांनी का सांगावा ते कोणालाही माहीत नाही.  बुध्दीला मानून लोक नास्तिक झाले, धर्महीन झाले तरी पत्करले; परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून आंधळेपणाने कोट्यवधी देवदेवता मानणे नको.  कधीकधी असे प्रेषित जन्माला येत असतील की इंद्रियातीत प्रदेशात शिरून ज्यांनी पलीकडील अनंताचे दर्शन, अंधुक दर्शन घेतले असेल.  परंतु आपणही जेव्हा तसे करू शकू तेव्हाच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, तोवर नाहीच नाही.'' असे सांगण्यात येते की बुध्दी दुबळी आहे, पदोपदी ती चुका करते, परंतु बुध्दी जर दुबळी असेल तर शेकडो धर्मोपदेशकांचा तांडा अधिक अचूक मार्गदर्शन करील या म्हणण्यात तरी काय अर्थ ?  विवेकानंद म्हणतात, ''मी स्वत:च्याच बुध्दीचा आधार घेईन, तिच्यावरच विसंबेन, कारण ती कितीही दुबळी असली तरी तिच्या द्वाराच सत्याचा शोध लागण्याचा थोडातरी भरंवसा आहे, म्हणून आपण बुध्दीच्याच पाठोपाठ जावे, आणि बुध्दीच्याच पाठोपाठ गेल्यामुळे अश्रध्देय असे ज्यांना काहीच सापडले नाही, जे स्वत:करता म्हणून तुम्ही स्वत: शोधून काढले नसेल त्या कशावरही श्रध्दा ठेवू नका, विश्वास ठेवू नका.'' *

विवेकानंदांनी वारंवार बुध्दिप्रामाण्यावर भर दिला, नुसत्या श्रध्देवर काहीही खरे मानायची त्यांची तयारी नाही, याचे कारण प्रत्येकाला आत्मस्वातंत्र्य पाहिजे अशी त्यांची तळमळीची श्रध्दा होती व श्रध्दाप्रामाण्यामुळे आपल्या देशाची झालेली हानी त्यांना डोळ्यांसमोर दिसत होती.  ''प्रामाण्यवादाच्या पराकोटीला पोचलेल्या देशात माझा जन्म झाला आहे, म्हणून'' असे ते याबाबत म्हणत.  प्राचीन योग आणि वेदान्तशास्त्रांचा स्वत:च्या बुध्दीप्रमाणे त्यांनी अर्थ केला आणि त्यांचा तसा अधिकारही होता.  परंतु प्रयोग आणि बुध्दी यांवरच जरी योग आणि वेदान्ताची पार्श्वभूमी उभी असली तरी योग आणि वेदान्त यांचा विषयच असा आहे की, त्या प्रान्तात सामान्य मनुष्याची बुध्दी अपुरी पडते.  ज्या जगात आपण वावरतो, ज्या जगाचे आपणांस ज्ञान असते अशा या जगाहून अजिबात निराळ्या अशा अतींद्रिय, मानसिक विषयाचा तो प्रान्त आहे.  निराळ्याच अनुभूतींचे ते जग आहे.  ते प्रयोग आणि ती अनुभूती हिंदुस्थानपुरतीच मर्यादित नव्हती.  ख्रिस्ती गूढवादी, पर्शियन, सुफी यांच्याही चरित्रांतून, आख्यायिकांतून अशा अनुभूतींच्या कथा आहेत. निरनिराळ्या काळातील आणि देशांतील या लोकांच्या अनुभवात एक विलक्षण साम्य आढळते व त्यामुळे रोमा रोलाँ यांचे म्हणणे सिध्द होते. ते म्हणतात, ''धर्मद्वारा झालेल्या आत्मानुभूतीची खरी उदाहरणे जगभर वर्षानुवर्षे घडत आली आहेत, वंश किंवा काळ यांच्या बाह्यरूपात अंतर्यामी ही सर्व सारखीच आहेत त्यामुळे सदैव सर्वत्र मनुष्याचा आत्मा येथूनतेथून एक आहे याचा दाखला मिळतो, किंवा मनुष्याचा आत्मा म्हणण्यापेक्षा मानवजात ज्या काही वस्तू, जी काही द्रव्ये यांच्या साधनाने निर्माण झाली ती साधने म्हणजे जास्त सयुक्तिक.  कारण मनुष्याच्या आत्म्यालाच आली मूळ साधने शोधण्याकरता खोल शोध घ्यावा लागतो.

सारांश, योग म्हणजे व्यक्तीभोवती असलेल्या परंतु इंद्रियांना गोचर होत नसलेल्या अतींद्रिय सृष्टीच्या पार्श्वभूमीत इकडून तिकडून शिरून त्या योगाने काही अनुभूती शक्तींचा विकास करणे व मनोनिग्रह करणे, ही साध्य करण्याचे एक प्रयोगशास्त्र आहे.  अर्वाचीन मानसशास्त्राला योगशास्त्राचा कितपत उपयोग करून घेता येईल ते मला सांगता येणार नाही.  परंतु असे करणे उपयुक्त ठरेल असे वाटते.  अरविंद घोषांनी योगाची पुढीलप्रमाणे
------------------------
* विवेकानंदांचे हे बरेचसे उतारे रोमा रोलाँ यांनी लिहिलेल्या विवेकानंदांच्या चरित्र्यातून घेतले आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel