अशा रीतीने १९२० मध्ये राष्ट्रसभेने, बहुतेक सर्व राष्ट्रानेच या नवीन, अननुभूत मार्गाचा अवलंब केला आणि ब्रिटिश सत्तेशी पुन:पुन्हा लढे, झगडे झाले. जी नवीन परिस्थिती उत्पन्न झाली होती तिच्यामुळे आणि जो नवीन मार्ग घेतला होता त्यामुळे लढा अपरिहार्य होता. परंतु या सर्व गोष्टींच्या पाठीमागे राजकीय डावपेच किंवा मुत्सद्देगिरीचे खेळ नव्हते-कारस्थाने नव्हती. हिंदी जनतेचे सामर्थ्य वाढावे हाच एक हेतू असे. कारण त्या सामर्थ्यानेच जनता स्वातंत्र्य मिळवू शकणार हाती, मिळाले तर टिकवणार होती. सविनय कायदेभंगाचे लढे वरचेवर आले. अपार हालअपेष्टांतून जनतेला जावे लागले. क्लेश आपत्ती भोगाव्या लागल्या. परंतु आम्ही आपण होऊन त्या छळांना, जाचांना कवटाळले होते आणि म्हणून त्यांतून सामर्थ्यसंपन्न होऊनच आम्ही बाहेर पडलो. ज्या वेळेस हालअपेष्टा भोगायची आपली तयारी नसते त्या वेळेस निराशा आणि पराभूत भावना त्यांतून जन्माला येतात. परंतु आमची तशी स्थिती नव्हती. अर्थात सरकारच्या जबरदस्त वरवंट्याखाली दूर राहणारेही भरडले गेले. ज्यांची तयारी नव्हती त्यांनाही भोगावे लागले, आणि ज्यांची तयारी होती असेही काही गडबडले आणि गडगडले. परंतु पुष्कळजण दृढ राहिले, खंबीर-गंभीर राहिले. आगीतून जाऊन ते अधिकच बलवान झाले. परिस्थिती बिकट असूनही कधीकधी हतबल असतानाही राष्ट्रसभा वरचढ सत्तेसमोर कधी नमली नाही, परकीयांच्या अधिकारापुढे वाकली नाही. हिंदी जनतेच्या स्वातंत्र्याच्या उत्कट आकांक्षेचे प्रतीक म्हणून मी सदैव शोभून राहिली. परकीय सत्तेशी अविरत झगडणारी म्हणून ती सदैव उभी राहिली आणि म्हणून कोट्यवधी हिंदी जनतेची तिला सहानुभूती मिळे. तिच्या नेतृत्वाकडे जनता आदराने बघे. कोणाला परिस्थितीमुळे स्वत: काही करता येत नसले, कोणी दुबळे असले तरी त्यांचे मन राष्ट्रसभेकडे असे. काही अंशी राष्ट्रसभा म्हणजे एक पक्ष जणू होती, परंतु अनेक पक्षोपक्षांचे हे संयुक्त व्यासपीठही होते. परंतु तिच्यात काहीतरी अधिक होते. हिंदी जनतेतील काट्यवधी लोकांच्या हदयातील आशाआकांक्षांची ती प्रतिनिधी होती. तिच्या पटावरील सभासदांच्या संख्येवरून तिच्या या देशव्याप्ती प्रतिनिधीतून स्वरूपाची नीटशी कल्पना येणार नाही, कारण लोकांच्या इच्छेवर सभासदत्व अवलंबून नसून आम्ही खेड्यापाड्यांत किती दूरवर जाऊन पोचतो त्यावर ती गोष्ट अवलंबून होती. पुष्कळ वेळा राष्ट्रसभा बेकायदाही असे. कायद्याच्या दृष्टीने आम्हाला अस्तित्व नसे, आणि आमचे कागदपत्र, अहवाल, पुस्तके पोलिस घेऊन जात.
सविनय कायदेभंगाचा लढा चालू नसला तरीही हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारशी असहकार करण्याची सर्वसामान्य वृत्ती सदैव जिवंतच असे. तिच्यातील चढाऊवृत्ती तात्पुरती थांबे एवढेच. असहकाराचा अर्थ एकजात इंग्रज जनतेशी असहकार असा अर्थात कधीही नसे. जेव्हा राष्ट्रसभेची सरकारे अनेक प्रांतांत अस्तित्वात आली तेव्हा सरकारी कामकाजात अपरिहार्यपणे पुष्कळसे सहकार्य करावेच लागे. परंतु जेव्हा सुध्दा अहसकाराची पार्श्वभूमी फारशी बदललेली नव्हती, आणि कचेरीच्या कामकाजाव्यतिरिक्त राष्ट्रसभेच्या मंडळींनी कसे वागावे यासंबंधी सूचना, नियम करण्यात आले होते. हिंदी राष्ट्रवाद आणि परकी साम्राज्यवाद यांच्यातही आता शेवटी तडजोड, हा अखेरचा तह असे कधीच होणे शक्य नाही. तात्पुरत्या तडजोडी, तात्पुरते जुळवून घेणे अशा गोष्टी अपरिहार्य असतात. स्वतंत्र हिंदुस्थानच समान भूमिकेवरून इंग्लंडशी सहकार्य करू शकेल.