सिंधू नदीच्या खोर्यातील संस्कृती
हिंदुस्थानच्या भूतकाळाचे अतिप्राचीन चित्र सिंधू नदीच्या खोर्यातील संस्कृतीत आढळते. हिंदुस्थानात मोहेंजो-दारो येथे आणि पश्चिम पंजाबात हराप्पा येथे उत्खननात या संस्कृतीचे महत्त्वाचे अवशेष सापडले आहेत. प्राचीन इतिहासासंबंधीच्या कल्पनांत या उत्खननांनी क्रांती केली आहे. या भागात उत्खनन सुरू झाल्यावर ते काही वर्षांनी थांबविण्यात आले ही दु:खाची गोष्ट आहे. गेल्या तेरा वर्षांत महत्त्वाचे असे काहीही काम तेथे करण्यात आले नाही. १९३० साली सर्वत्र मंदीचा काळ होता, त्यामुळे हे काम थांबविण्यात आले असे समजते. उत्खननासाठी पैसे नाहीत असे सरकारकडून सांगण्यात येई. परंतु साम्राज्याच्या वैभवाचे प्रदर्शन करावयाचे असेल तर तेव्हा मात्र काहीही पैशाकरता अडत नव्हते. पुढे तर दुसरे महायुध्द आले आणि सर्व काम थांबले व जे उत्खनन झाले होते त्याच्या रक्षणाचीही नीट काळजी घेतली गेली नाही. मी १९३१ व १९३६ मध्ये दोनदा मोहेंजोदारोला गेलो. जेव्हा मी दुसर्यांदा गेलो तेव्हा असे दिसून आले की, खणून काढलेल्या कितीतरी इमारतींचे पावसाने व कोरड्या वाळवंटाच्या वार्याने नुकसान झाले आहे. वाळू व माती यांच्या आच्छादनाखाली पाच हजार वर्षे हे अवशेष, ही प्राचीन शहरे सुखरूप होती. परंतु आता बाहेर हवापाण्यामुळे झरून झपाट्याने त्यांचा नाश होत आहे; आणि प्राचीन काळाचे हे अनमोल ठेवे सुरक्षित ठेवण्यासाठी, जवळजवळ काहीच करण्यात येत नाही. पुराणवस्तुसंशोधन खात्यातील अधिकारी तक्रार करीत होता की, खणून काढलेल्या या इमारतींचे रक्षण करायला आम्हाला पैसा किंवा साधने, साहाय्य यांचा पुरवठा नाही. आता त्यानंतर आणखी आठ वर्षे गेली, काय झाले आहे ते मला कळले नाही, पण मला वाटते या आठ वर्षांत त्या इमारती अशाच झिजत, पडत जात असतील, आणि आणखी काही वर्षांनी मोहेंजो-दारो येथील हे सारे विशिष्ट अवशेष डोळ्यांना दिसणारही नाहीत.
अखेर असा प्रकार घडला तर त्या नुकसानीला काहीही सबब चालण्यासारखी नाही, कारण हे अवशेष असे गेले तर कायमचेच जातील व ते काय होते ते समजायला नुसती चित्रे व लेखी वर्णनेच काय ती उरतील.
मोहेंजो-दारो आणि हराप्पा ही एकमेकांपासून खूप दूर आहेत. त्या दोन ठिकाणी हे शोध आकस्मिक रीत्या लागले. या दोन स्थळांच्या मधल्या भागातही अशीच पुष्कळ शहरे गडप झाली असण्याचा संभव आहे. प्राचीन माणसांच्या हातचे अनेक नमुने येथे जमिनीत नि:संशय सापडतील. येथे ज्या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत ती संस्कृती हिंदुस्थानच्या बर्याच भागांवर— उत्तर हिंदुस्थानच्या तर नक्कीच— पसरलेली होती. भारताच्या प्राचीन भूतकाळाच्या उत्खननाचे व संशोधनाचे हे काम पुन्हा हाती घेतले जाईल आणि महत्त्वाचे शोध लागतील अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. आजच तिकडे पश्चिमेला काठेवाडात आणि इकडे वर अंबाला वगैरे जिल्ह्यांत या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत व गंगेच्या खोर्यापर्यंत ही संस्कृती पसरली होती असे मानायला सबळ आधार आहे. असे दिसते की, ही संस्कृती केवळ सिंधू नदीच्या खोर्यातीलच नव्हती, ती अधिक विस्तृत होती. मोहेंजो-दारे येथे जे लेख सापडले आहेत त्यांचा पूर्ण उलगडा अद्याप झालेला नाही.