हिंदुस्थानातील मुख्य महत्त्वाची व प्रत्यक्षात प्रचीतीला येणारी वस्तुस्थिती अशी आहे की, संगिनींच्या जोरावर देशाचा ताबा ब्रिटिशांकडे चालतो आहे, त्या सैन्यबलाच्या आधारावर ब्रिटिशांच्या धोरणाने येथील राज्यकारभार चालतो आहे.  त्या धोरणाचा आविष्कार नाना प्रकारे होत आला आहे, वाटेल तो अर्थ लावता येईल अशा सोईस्कर भाषेचे आच्छादन त्या धोरणाला अनेक वेळी चढविण्यात आले आहे, पण अलीकडे सरळ शिपाईबाण्याच्या एका व्हॉइसरॉयने ते स्पष्ट सांगून टाकले आहे.  देशावरचा हा लष्करी अम्मल ब्रिटिशांना शक्य आहे तोवर तसाच चालणार, पण नुसत्या शक्तीचा उपयोग काही एका मर्यादेपर्यंतच होऊ शकतो.  शक्तीचाच उपयोग करीत राहिले तर प्रतिशक्तीही निर्माण होऊ लागते एवढेच नव्हे तर शक्तीवर फार अवलंबून राहणार्‍यांना कल्पना येत नाही असे काही परिणाम त्यामुळे होऊ लागतात.

पण हे सारे विचार झाले ते संभाव्य काय आहे याबद्दलचे, तूर्त हिंदुस्थानच्या विकासाला सक्तीने आळा बसविण्यात आला व देशाची प्रगती मुद्दाम खुंटविली गेली.  याचे परिणाम प्रत्यक्षच दिसत आहेत.  हिंदुस्थानवरची ब्रिटिश राजवट वांझोटी आहे, तिच्यामुळे हिंदी जीवनात विफलता आली आहे हे सत्य अगदी स्पष्ट आहे.  राष्ट्राला कल्याणकारक अशी नवनिर्मिती करणारे जे शक्तिप्रवाह राष्ट्रात वाहात असतात त्यांचा संगम राष्ट्रावरच्या राजवटीशी होणे, ती राजवट परकीयांची असली तर अशक्य होऊन बसते.  ह्या परकीय सत्तेचे आर्थिक केंद्र व तिच्या संस्कृतीचा गाभा हे अंकित राष्ट्रापासून फार दूरवर असले व ह्या भिन्नत्वाच्या जोडीला वंशश्रेष्ठत्वाच्या दुरभिमानाची भर पडली म्हणजे ही ताटातूट पक्की होऊन बसते, व त्यामुळे त्या अंकित राष्ट्रातील प्रजेच्या स्थितीला सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या उतरती कळा लागते.  राष्ट्राच्या निर्माणशक्तीला आपले सामर्थ्य उपयोगात आणायची संधी त्या परकीय सत्तेला कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोध करण्याच्या क्षेत्रात मिळते, पण नुसता विरोध करीत राहण्यापुरतेच ते क्षेत्र मर्यादित असल्यामुळे राष्ट्राची दृष्टी संकुचित होते, ती त्याच दिशेकडे वळलेली राहते. आपल्याला जखडून टाकणार्‍या परकीय सत्तेचे कठीण कवच फोडून बाहेर पडण्याच्या राष्ट्रातील जिवंत व वाढत्या शक्तिप्रवाहाचा जो हेतुपूर्वक किंवा आपोआप प्रयत्न चाललेला असतो तो या परकीय सत्ताविरोधाच्या रूपाने प्रगट होतो, व म्हणून ही विरोधवृत्तीही एका अपरिहार्य परंतु चांगल्या प्रवृत्तीचे लक्षण आहे.  पण ही प्रवृत्ती अगदीच एकांगी व अकरणात्मक असल्यामुळे व प्रत्यक्ष जीवनाला वास्तविक अनेक अंगे असल्यामुळे त्यांपैकी पुष्कळशी अंगे या प्रवृत्तीच्या कक्षेबाहेर राहतात.  या प्रवृत्तीचा त्यांच्याशी पुरेसा संबंध राहू शकत नाही.  त्यामुळे या प्रवृत्तीने अनेक मनोगंड निर्माण होतात, पूर्वग्रह व अनेक मनोविकृती बळावून मन गढूळ होऊन जाते, वर्ग व जात ह्या कल्पना साकार होऊन त्यांच्या मनोमय मूर्ती बनतात, व प्रत्यक्षातील समस्या कशी सोडवावी त्याचा शोध करण्याऐवजी मनाची प्रवृत्ती ठरीव निरर्थक बडबड व पोकळ घोषणा आणि गर्जना करण्याकडे होते.  त्या समस्यांची उत्तरे, परकीय राजवटीच्या रुक्ष सांगाड्याच्या चौकटीची मर्यादा संभाळून सापडणे शक्य नसते आणि राष्ट्रापुढील समस्या तशाच पडून राहून त्या अधिक बिकट मात्र होत असतात.  हिंदुस्थानात आता अशी स्थिती आलेली आहे की, अर्धवट उपाय योजून आमच्या समस्यांची उत्तरे सापडणे शक्य नाही.  एखाद्याच भागापुरती सुधारणा करून चालणार नाही.  जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत राष्ट्राचे पाऊल पुढे पडले पाहिजे, आणि तेही नुसते पुढे पाऊल न टाकता उडी टाकली पाहिजे, नाहीतर सर्वच बाजूंनी राष्ट्रावर अनर्थ कोसळण्याचा संभव आहे.

प्रस्तुत काली सर्व जगभर जे चालले आहे तेच हिंदुस्थानातही घडते आहे, शांततामय मार्गाने चालून प्रगती व विधायक कार्य चालविणार्‍या शक्ती व विध्वंस करून अनर्थ ओढवून आणणार्‍या शक्ती यांची चढाओढ चालली आहे.  येतो तो नवानवा अनर्थ मागच्या जुन्या अनर्थाच्या शतपटीने अधिक मोठा येतो आहे.  ह्या चालू घटनांचा अर्थ आपल्या मनोरचनेनुसार जिकडे ज्याचा ओढा असेल तिकडे लावण्याला जो तो मोकळा आहे. विश्वाचा व्यवहार ईश्वरी न्यायनीतिनियमाने बांधलेला आहे.  अखेर जय नीतीचाच होतो अशी ज्यांची श्रध्दा आहे त्यांना आपल्या चिंतेचे ओझे ईश्वराकडे सोपवून स्वस्थपणे नुसते तटस्थ राहण्याचे किंवा ईश्वरी कार्याचे साधन होऊन काय करीत राहण्याचे सद्भाग्य लाभते.  ज्यांना ते भाग्य लाभले नाही त्यांना आपल्या दुबळ्या खांद्यांवर हा भार घेऊन, भविष्यकाळ चांगला येईल अशी आशा धरून, पण वाईट आलाच तर त्याचीही तयारी करून, चालणे भाग आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel