मोगल साम्राज्याची इमारत ढासळून पडायला आणखी एक महत्त्वाचे कारण हे होते की, आर्थिक व्यवस्था मोडकळीस आली होती.  शेतकर्‍यांचे उठाव वरचेवर होत होते.  काही काही उठाव तर प्रचंड प्रमाणावर होते.  १६६९ पासून पुढे राजधानी दिल्लीपासून जवळच जाट किसानांनी दिल्लीच्या सरकारविरुध्द पुन:पुन्हा बंडे केली होती.  गरीब लोकांनी केलेले आणखी एक बंड म्हणजे 'सत्नामी' लोकांचे होय.  एका मोगल सरदाराने त्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. ''हे सत्नामी म्हणजे डाकू, खुनी, लुटारूंचा एक कंपू आहे.  सोनार, सुतार, भंगी, चांभार आणि इतर भिकार लोकांचा हा बंडखोर जथा आहे.''  आतापर्यंत राजे, राजपुत्र, अमीरउमराव बंडे करताना दिसत होते.  परंतु आता निराळेच वर्ग बंडाचे प्रयोग करू लागले.

यादवी व बंडे यांनी मोगल साम्राज्य खिळखिळे होत असता नवीन मराठी सत्ता वाढून पश्चिम हिंदुस्थानात दृढमूल होत होती.  इ.स. १६२७ मध्ये शिवाजी जन्मला.  दर्‍याखोर्‍यांतल्या कडेपठारावर वावरणार्‍या कंटक मावळ्यांना पाहिजे तसा गनिमी काव्यात पटाईत हा सेनानी होता.  त्याचे घोडेस्वार लांबलांबच्या मजला मारून कधी इंग्लिशांची वखार असलेले सुरत शहर लुटीत तर कधी मोगल साम्राज्याच्या दूरदूरच्या मुलखातून चौथाई वसूल करीत.  नवनवोन्मेषशाली हिंदू राष्ट्रवादाचे शिवाजी प्रतीक होता.  रामायणमहाभारतातून त्याला स्फूर्ती मिळाली होती.  तो धैर्याचा मेरू होता.  नेतृत्वाला लागणारे लोकोत्तर गुण त्याच्या अंगी होते.  मराठ्यांचे त्याने एक झुंजार राष्ट्र बनविले.  त्यांना त्याने राष्ट्रीय पार्श्वभूमी दिली व प्रबळ मराठी सत्ता उभी करून मोगल साम्राज्याचे तुकडे केले.  शिवाजी १६८० मध्ये मरण पावला.  परंतु मराठी सत्ता वाढतच गेली आणि अखेर सार्‍या हिंदुस्थानभर तिची सत्ता चालू लागली.

मराठे व इंग्रज : प्रभुत्वासाठी झगडा; ब्रिटिशांचा विजय

औरंगजेब १७०७ मध्ये मरण पावला.  त्यानंतर प्रभुत्वासाठी हिंदुस्थानभर जवळजवळ शंभर वर्षे गुंतागुंतीचे आणि पक्षोपपक्षांचे लढे चालले होते.  झपाट्याने मोगली साम्राज्याचे तुकडे झाले व त्या त्या प्रांताचे अधिकारी एक प्रकारे स्वतंत्र राज्यकर्ते या नात्याने वा लागले.  परंतु मोगलांच्या वंशजांची अद्याप एवढी प्रतिष्ठा होती की, बादशहा दुबळा आणि दुसर्‍यांचा बंदा असतानाही हे प्रांताधिपती नाममात्र का होईना, दिल्लीचे सार्वभौमत्व मानीत.  हे जे प्रांताधिपती होते, त्यांच्या हातात खरी सत्ता नसे; त्यांना महत्त्व नसे.  परंतु हिन्दुस्थानचे प्रभुत्व मिळविण्यासाठी जे प्रबळ पक्ष धडपडत होते, त्यांच्या मार्गात अडथळे आणण्याच्या कामी मात्र त्यांचा उपयोग होई.  हैदराबादच्या निजामाची दक्षिणेत मोठी मोक्याची जागा होती.  आरंभी त्याला बरेच महत्त्वही प्राप्त झाले होते, परंतु हे महत्त्व काल्पनिक होते हे लौकरच दिसून आले.  हैदराबादची सत्ता म्हणजे पेंढ्याने भरलेले मढे आहे,  बाह्य शक्तींच्या जोरावर ते मिरवत होते हे कळून चुकले.  दुटप्पी धोरण आखण्यात निजाम मोठा हुषार होता.  धोका-संकट स्वत: न पत्करता दुसर्‍याच्या दुर्दैवापासून स्वत:चा फायदा कसा करून घ्यावा हेही त्याला चांगले साधे.  सर जॉन शोअरने निजामी राज्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे.  ''सुधारण्याच्या पलीकडे गेलेले असे हे नतद्रष्ट राज्य आहे.  ...शक्ती नाही, उत्साही नाही...ते कोणाचे तरी मांडलिकच होऊन राहणार.''  निजामाकडे तो एक दुय्यम सरदारच आहे म्हणून मराठे बघत.  निजाम त्यांना खंडणी देइ.  खंडणी टाळण्याचा आणि स्वतंत्र होण्याचा त्याने आव आणताच, मराठ्यांनी ताबडतोब त्याचे पारिपत्य केले व निजामाची भेकड सेना पळून गेली.  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या सत्तेच्या कृपाछत्राखाली निजाम शेवटी गेला, आणि मांडलिकत्व पत्करून एक संस्थान म्हणून शिल्लक राहिला.  म्हैसूरच्या टिपूचा ब्रिटिशांनी जेव्हा पडाव केला तेव्हा फारसे प्रयास न करता तहाच्या वेळेस निजामानेही अधिक मुलूख आपल्या राज्यास जोडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel