वाटाघाटी फिसकटल्यामुळे तडजोड होण्याची काहीच शक्यता उरली नव्हती.  परंतु त्यातूनही काही मार्ग आपण शोधून काढू अशी जी आशा गांधीजींना वाटत होती तशी इतर कोणालाच फारशी नव्हती.  आतापर्यंत या बाबतीत जे काही घडत गेले, व त्यावरून त्याला जे काही फाटे फुटलेले दिसले त्यावरून सरकार व हिंदुस्थानातील राष्ट्रीय पक्ष यांच्या दरम्यान झुंज लागणार हे निश्चित, अटळ, दिसत होते.  गोष्टी या थराला येऊन पोचल्यानंतर या दोन्ही पक्षांच्या दरम्यान काही मधला एक पक्ष कोणी घेऊ म्हटले तर याला काही महत्त्व राहात नाही, व्यक्तिश: प्रत्येकाला या दोन्ही पक्षांपैकी कोणत्या बाजूला आपण उभे राहणार एवढेच काय ते ठरवायचे शिलक राहते.  खुद्द काँग्रेसमधील लोकांना, व या बाबतीत ज्यांची भावना काँग्रेससारखीच होती अशा बाहेरच्या लोकांना, यापुढे कोणता पक्ष स्वीकारावा असा प्रश्नच पडत नव्हता; एवढ्या मोठ्या बलिष्ठ राज्याने आपले सारे सामर्थ्य उपयोगात आणून आमच्या देशबांधवांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न चालविलेला असताना व हिंदुस्थानचे स्वातंत्र्य पणाला लागलेले असताना आमच्यापैकी कोणीही तटस्थपणे नुसता दुरून प्रेक्षकासारखा पाहात बसेल हे स्वप्नात सुध्दा शक्य नव्हते.  अर्थात असे पुष्कळसे लोक निघतात की, ज्यांना राष्ट्रकार्य प्रिय असले तरी ते नुसते स्वस्थ उभे राहतात, पण आपण जे आजवर कार्य केले त्याचा परिणाम चुकवून सरकारशी लढा करणे टाळण्याचा व आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न कोणी काँग्रेसश्रेष्ठी करता तर ते अत्यंत लाजिरवाणे व विश्वासघाताचे झाले असते.  पण तो विचार बाजूला ठेवला तरीसुध्दा काँग्रेसच्या नेत्यांना सरकारशी असा काही लढा दिल्यावाचून गत्यंतर उरले नव्हते.  हिंदुस्थानात आजपर्यंत जे जे काही घडत गेले त्याचा सारा इतिहास, आजच्या घटकेला जे काही घडत होते त्याच्या यातना, व जे भाविकालात घडावे असे मनाला वाटे त्याची आशा, ही सारी एकवटून त्यांची निकड काँग्रेसनेत्यांच्या मागे लागली होती, त्यांनी चालविलेल्या ह्या निकडीच्या पाठलागाच्या अनुरोधानेच जे काही करावयाचे ते काँग्रेसनेत्यांना करणे भाग होते.  बर्गसन या तत्त्वज्ञानी ग्रंथकाराने आपल्या ''क्रिएटिव्ह एव्होल्युशन'' (निर्मितीकारक उत्क्रांती) या ग्रंथात म्हटले आहे - ''जे काही पूर्वी घडून गेले त्याच्या थरावर जे नुकतेच घडले त्याचा थर चढतो व ही थरावर थर चढण्याची क्रिया सतत चाललेली असते, त्यात खंड कधीच पडत नाही.  वस्तुस्थिती अशी आहे की, भूतकाल आपोआप स्वत:च जसाच्या तसा अबाधित राखतो.  आपल्या पाठीशी प्रत्येक क्षणाला हा बहुतेक सारा भूतकाल चिकटून चाललेला असतो.  या भूताकालापैकी फारच थोडा भाग आपण विचार करताना वापरतो हे खरे, पण थरावर थर साचून एकजीव बनलेल्या व आपल्या व्यक्तिमत्त्वाशी एकरूप पावलेल्या या भूतकालाच्या व आपल्या स्वत:च्या मूळ आत्मप्रवृत्तीच्या ओघातच आपल्या सार्‍या भावना उगम पावतात, आपले सारे संकल्प निश्चित होतात व प्रत्यक्ष कृती आपल्या हातून घडते.''

तारीख ७ व ८ ऑगस्ट सन १९४२ या दोन दिवशी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या जाहीर रीतीने जमलेल्या प्रेक्षकांसमोर, 'छोडो भारत' असे ज्या ठरावाचे नाव पुढे रूढ झाले, त्या ठरावावर साधकबाधक चर्चा चालवून त्या ठरावाचा विचार केला.  तो ठराव खूप मोठा व सांगोपांग असून त्यात हिंदुस्थानचे स्वातंत्र्य ताबडतोब मान्य का झाले पाहिजे याबद्दल तर्कशुध्द कोटिक्रम केलेला होता.  ब्रिटिशांची हिंदुस्थानवरची सत्ता 'केवळ हिंदुस्थानकरताच नव्हे, तर संयुक्त राष्ट्राच्या पक्षाचा युध्दात जय व्हावा म्हणूनही' संपुष्टात आणली पाहिजे.  ती सत्ता यापुढे चालत राहणे हा हिंदुस्थानचा अपमान आहे.  त्यामुळे हिंदुस्थान नि:सत्त्व होत चालला आहे, स्वत:चे संरक्षण करणे व जगातील सार्‍या राष्ट्रांच्या स्वातंत्र्याला साहाय्य करणे याकरिता लागणारी शक्ती त्या देशात उत्तरोत्तर कमी होत जाते आहे.'  'साम्राज्यावर सत्ता चालवता येते म्हणून अधिराज्याचे सामर्थ्य वाढावे, पण त्याऐवजी हे साम्राज्य म्हणजे इंग्लंडला एक ओझे, एक शाप होऊन बसले आहे.  आधुनिक साम्राज्यवादाचे सर्वमान्य उदाहरण म्हणून गणला जाणारा हा हिंदुस्थान देश, जगापुढे असलेल्या आजच्या प्रश्नातले मर्म ठरला आहे,  कारण ब्रिटन व संयुक्त राष्ट्रे यांची खरी परिक्षा हिंदुस्थानाला स्वातंत्र्य देण्यातच होणार आहे, आशिया व आफ्रिका खंडातील सार्‍या देशांतील जनतेला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे स्वत:बद्दल काही आशा वाटू लागेल, त्यांना उत्साह येईल.' ठरावात पुढे असे सुचविले होते की, हिंदुस्थानातील सार्‍या प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी असलेले, संमिश्र स्वरूपाचे एक तात्पुरते राष्ट्रीय सरकार स्थापन करावे.  त्या सरकारचे 'मुख्य कर्तव्य हिंदुस्थानचे संरक्षण करणे आणि आपल्या आज्ञेत असलेल्या सर्व सशस्त्र सैन्यबलाचा व त्याव्यतिरिक्त असलेल्या अहिंसक बलाचाही उपयोग, परचक्राचा प्रतिकार व मित्रराष्ट्रांशी सहकाय करणे, हे असावे.' ह्या तात्पुरत्या सरकारने देशाची राज्यघटना काय असावी हे ठरविण्याकरिता एक घटना परिषद भरविण्याची योजना तयार करावी व त्या घटना परिषदेने हिंदुस्थानातील सर्व वर्गांच्या लोकांना पटेल अशा तर्‍हेची हिंदुस्थानची राज्यघटना तयार करावी.  ही राज्यघटना वेगवेगळ्या घटक राज्यांचे मिळून सर्व हिंदुस्थानचे एक संयुक्त राष्ट्र होईल अशी असावी.  या घटकराज्यांना स्वयंशासनाचे शक्य तितके अधिकात अधिक अधिकार ठेवावेत व शेष राहिलेले अधिकारही ह्या घटक राज्यांकडेच ठेवावे. ''स्वातंत्र्य आले म्हणजे जनतेच्या सर्वसंमत संयकल्पाच्या व सामर्थ्याच्या बळावर विसंबून परचक्राचा प्रतिकार करण्याची शक्ती हिंदुस्थानच्या अंगी संचरेल.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel